कॅलिफोर्निया येथील जंगलात लागलेल्या आगीने मंगळवारी 1500 चौरस किलोमीटरपेक्षा अधिक भाग गिळंकृत केला असून ती लॉस एंजेलिस शहरापेक्षा मोठी असल्याचे तिथल्या अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले. सॅक्रामेंटोच्या उत्तरेकडील वाळवंटात हजारो अग्निशमन दलाच्या गाड्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
कॅलिफोर्निया आणि इतर राज्यांमधून अग्निशमन दलाच्या 5 हजार 500हून अधिक गाड्या राजधानी सॅक्रामेंटोच्या उत्तरेस सुमारे 145 किमी अंतरावरील सेंट्रल व्हॅलीमधील पार्कला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अहोरात्र काम करत होते. या आगीने 3 लाख 85 हजार 065 एकरांचा (1लाख 55 हजार 830 हेक्टर) परिसर गिळंकृत केला असून, कॅलिफोर्नियाच्या इतिहासातील ही पाचवी सर्वात मोठी आग ठरली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Fighting the #CreekFire in #AlamedaCounty #California. 10 Tanker has dropped 25 percent of the cumulative retardant used across all #firefighting efforts this #wildfireseason.
Video credit: @EBfirephoto#ReadyToServe #inthistogether #calfire #firemappers #VLAT #dc10lovers pic.twitter.com/n6Mjxe1ep2
— 10_Tanker Air Carrier (@Ten_Tanker) July 29, 2024
मंगळवारी या अग्नितांडवाने फ्रेस्नो काउंटीमधील 2020च्या अग्नितांडवाला मागे टाकले. त्यावेळी जवळपास 3 लाख 80 हजार एकर जमिनीवर ही आग पसरली होती, असे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले. पण ती अजूनही राज्यात नोंदवलेल्या सर्वात मोठ्या आगीपेक्षा लहानच आहे. 2020 च्या ऑगस्ट कॉम्प्लेक्स आगीमुळे उत्तर कॅलिफोर्नियातील सात परगण्यांमधील 10 लाख एकरांहून अधिक जमीन भस्मसात झाली होती.
पार्कमध्ये असलेले सुके गवत, खुरटी झुडपे आणि लाकूड यामुळे ही आग झपाट्याने वाढत आहे, असे कॅलिफोर्निया वन आणि अग्नि संरक्षण विभागाचे फायर कॅप्टन डॅन कॉलिन्स (कॅल फायर) यांनी सांगितले.
ते म्हणाले, “ही आग पसरण्यासाठी आजूबाजूला भरपूर इंधन आहे जे ज्वलनशील आहे. त्यामुळे तिथे पोहोचणे कठीण आहे.” “आमची फायर लाइन सुमारे 260 मैलांची म्हणजे तीन लेक ताहोच्या आकाराची आहे. या भूप्रदेशात कर्मचारी आपले कर्तव्य बजावण्यासाठी घटनास्थळी पोहोचायला दोन-तीन तास लागू शकतात.”
राष्ट्रीय हवामान सेवेतील हवामानशास्त्रज्ञ एश्टन रॉबिन्सन कुक यांनी सांगितले की, सध्याच्या अंदाजानुसार मंगळवारी तुरळक वादळ येण्याची थोडीशी शक्यता आहे. त्यानंतर पाऊस दिसत नाही. हवा गरम आणि अत्यंत कोरडी राहील, असे ते म्हणाले.
बुधवारी तापमान 100 अंश फॅरेनहाइटपर्यंत (37.8 अंश सेल्सिअस) पोहोचेल आणि पुढील सोमवारपर्यंत कमाल तापमान त्या पातळीवर राहू शकते, असा अंदाज आहे. सापेक्ष आर्द्रता 7 टक्क्यांपर्यंत खाली घसरेल.
मंगळवारी केवळ 14 टक्के आग आटोक्यात आणायला यश मिळाले आहे. या आगीमुळे परिसरातील 4 हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा लागला आहे. 192हून अधिक बांधकामे नष्ट झाली आहेत किंवा त्यांना नुकसान पोहोचले आहे, असे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले.
सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाल्याचे किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. कॅल फायरचे प्रवक्ते जेरेमी हॉलिंगहेड यांनी सांगितले की, आगीवर पाणी आणि अग्निरोधक रसायने टाकण्यासाठी 41 हेलिकॉप्टर्स वापरली गेली आहेत. मात्र त्यामुळे धुराचे प्रचंड ढग या परिसरात जमा झाले आहेत.
निर्वासितांपैकी सर्वाधिक निर्वासित पॅराडाईज या राज्यातले आहेत. 2018 च्या सर्वात प्राणघातक कॅम्प फायरमुळे उद्ध्वस्त झालेले शहर म्हणून इतिहासात पॅराडाईजची नोंद झाली आहे.
गेल्या बुधवारी बुटे काउंटीच्या गल्लीत जळती कार खाली ढकलल्यामुळे अग्नितांडव सुरू झाल्याचा संशय असणाऱ्या व्यक्तीवर सोमवारी औपचारिकपणे जाळपोळीचा आरोप ठेवण्यात आला. याशिवाय त्याच्यावर आणखी कोणते आरोप लावले जातील याची आम्ही वाट बघत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कॅलिफोर्नियातील चिको येथील 42 वर्षीय रॉनी डीन स्टाउट (दुसरा) या व्यक्तीने सोमवारी आपल्यावरील आरोप नाकारल्याचे बटे काउंटीचे जिल्हा वकील माईक रॅम्से यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले. स्टाउटकडे वकील आहे की नाही हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.
याशिवाय स्टाउटने याचिका दाखल केली नसली तरी त्याला जामीन नाकारण्यात आला. आणखी आरोपांची भर पडू शकते म्हणून गुरुवारपर्यंत त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार आहे, असे रॅम्से यांनी सांगितले.
रामानंद सेनगुप्ता
(रॉयटर्स)