हमासचा प्रमुख इस्माईल हनियेह मंगळवारी सकाळी तेहरानमधील त्याच्या निवासस्थानी झालेल्या विश्वासघातकी झायोनिस्ट हल्ल्यात ठार झाला.
“आपले बंधू, नेते, चळवळीचे प्रमुख मुजाहिद इस्माईल हनियेह (नवीन) इराणी अध्यक्षांच्या शपथविधी समारंभात सहभागी झाल्यानंतर त्यांच्या मुख्यालयावर झायोनिस्टांनी केलेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला,” असे हमासच्या निवेदनात म्हटले आहे.
हिझबुल्ला समर्थक लेबनॉनच्या अल-मायादीन संकेतस्थळानुसार, इराणच्या सीमेबाहेरून करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात हमासचा प्रमुख मारला गेला. त्याच्यासोबत त्याचा अंगरक्षकही मरण पावला. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्डनेही त्याच्या मृत्यूला दुजोरा दिला.
गेल्या ऑक्टोबरमध्ये हमास हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तेल अवीवने हनियेहचा नायनाट करण्याचे वचन दिले असले तरी इस्रायलकडून या हल्ल्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. ऑक्टोबरमधील हल्ल्यामुळे गाझा युद्धाला परत एकदा सुरूवात झाली.
हमासच्या राजकीय कार्यालयाचा प्रमुख मुसा अबू मार्झुक याने या कृत्याचा बदला घेण्याचा विडा उचलला आहे. “आमचे नेते इस्माईल हनियेह यांची हत्या हे भ्याड कृत्य आहे आणि त्याला आम्ही योग्य प्रत्त्युतर देऊ,” असं तो म्हणाला.
2017 मध्ये खालिद मेशालच्या जागी निवडून आल्यापासून हनियेह हमासचे नेतृत्व करत होता. तो अत्यंत व्यवहारी म्हणून ओळखला जात असे. याशिवाय त्याने सर्व पॅलेस्टिनी गटांशी चांगले संबंध प्रस्थापित केले होते.
1983मध्ये इस्रायलविरुद्ध पहिला इंतिफादा सुरू झाल्यानंतर तो हमासमध्ये सामील झाला.
ही हत्या इराणसाठी लाजिरवाणी आणि आव्हानात्मक बाब बनली आहे. यामुळे पाश्चिमात्य देशांशी संबंध सुधारण्याची आणि आर्थिक निर्बंध कमी करण्याची नवीन अध्यक्षांची बांधिलकी अधिक गुंतागुंतीची बनणार आहे.
या हत्येनंतर हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्धबंदीवरील चर्चा धोक्यात येऊ शकते कारण हमास प्रमुख जवळून या सगळ्या प्रक्रियेत सहभागी होता. तो गाझामधील हमासचे नेते आणि इतरांमधील प्रस्ताव तसेच संदेश यांची देवाणघेवाण करत असे.
दुसरीकडे लेबनॉनमध्ये, हिजबुल्लाचा वरिष्ठ कमांडर फुआद शुक्र बेरूतच्या दक्षिणेकडे असलेल्या उपनगरातील एका इमारतीवर झालेल्या इस्रायली हल्ल्यात मारला गेला असावा असे म्हटले जाते. तेल अवीवच्या मते मंगळवारी उशिरा शुक्रला ठार मारले आहे. गोलांग हाइट्सवर गेल्या आठवड्याच्या शेवटी झालेल्या हल्ल्यात त्याचा सहभाग होता. या हल्ल्यात अनेक तरुण मुलांचा मृत्यू झाला.
सूर्या गंगाधरन
(रॉयटर्स)