मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण (एचएडीआर) मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी, केरळमधील वायनाड येथे झालेल्या विनाशकारी भूस्खलनामुळे अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी भारतीय लष्कराने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. 30 जुलै 2024 रोजी भूस्खलनाच्या घटना घडल्या. नागरी प्रशासनाने केलेल्या विनंतीनंतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह सुमारे 500 कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली सहा एचएडीआर पथके, ब्रिजिंग उपकरणे आणि बचावासाठी असणारे श्वानपथक तैनात करण्यात आले. सुमारे 1000 नागरिकांना वाचवण्यात लष्कराला यश मिळाले असून त्यांना आवश्यक ती वैद्यकीय मदतही दिली गेली आहे. याशिवाय त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. बचाव पथकाने 86 मृतदेहही शोधून काढले.
एचएडीआरच्या कामामध्ये समन्वय साधण्यासाठी लष्कराने कोझिकोड येथे ब्रिगेडियर अर्जुन सेगन यांच्यासह मेजर जनरल व्ही. टी. मॅथ्यू, जनरल ऑफिसर कमांडिंग, कर्नाटक आणि केरळ उपक्षेत्र यांच्या नेतृत्वाखाली ‘कमांड अँड कंट्रोल सेंटर’ची स्थापना केली आहे. ब्रिगेडियर सेगन यांनी काल पहाटे प्रभावित भागांची पाहणी केली आणि बचावकार्य पुढे नेण्यासाठी लष्कराच्या तुकड्यांना मार्गदर्शन केले. भूस्खलनामुळे प्रभावित झालेल्या सहा किलोमीटरच्या भागात लष्कराचे बचावकार्य सुरू आहे.
एचएडीआर टीममधील सैनिक कन्नूर, कोझिकोड आणि तिरुवनंतपुरम येथून तैनात करण्यात आले. डीएससी सेंटर, कन्नूर आणि 122 इन्फंट्री बटालियन (टेरिटोरियल आर्मी) मद्रास, कोझिकोडशी संबंधित प्रत्येकी दोन तुकड्या आणि एकूण 225 कर्मचाऱ्यांचा सहभाग असलेल्या दलाने बचाव कार्यासाठी नागरी संस्थांकडून मागितल्या गेलेल्या मदतीला पहिल्यांदा प्रतिसाद दिला. नंतर एनडीआरएफ आणि इतर संस्थांच्या सहकार्याने बचावकार्य सुरू करण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचले. बचाव आणि मदत कार्याला आणखी हातभार लावण्यासाठी एएन – 32 आणि सी-130 विमानांद्वारे 135 कर्मचाऱ्यांच्या दोन वैद्यकीय पथकांबरोबर दोन अतिरिक्त एचएडीआरच्या तुकड्या त्रिवेंद्रमहून कोझिकोडला पाठवण्यात आल्या.
केरळ सरकारने लष्कराला पूल बांधण्याची विनंती केली होती. त्यानुसार, मद्रास अभियंता गट आणि केंद्र (एमईजी आणि केंद्र) यांच्यातील लष्कराच्या अभियंता कृती दलाला 123 कर्मचाऱ्यांसह 150 फूट बेली पूल, तीन जेसीबी आणि इतर सहाय्यक उपकरणांसह प्रभावित भागात दाखल झाले आहेत. मीपडी-चूरमाळा रोडवरील पुलाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे, ज्यामध्ये हवाई दलाच्या मदतीने प्रवाहाच्या पलीकडे काही उपकरणे पाठवण्यात आली. 30-31 जुलैच्या एका रात्रीत फूट ब्रिजचे बांधकाम पूर्ण झाले.
इंजिनियर्स स्टोअर्स डेपो, दिल्ली कँट येथून 110 फूट बेली ब्रिजचा दुसरा संच घेऊन जाणारे एक C-17 विमान आणि तीन शोध आणि बचाव श्वान पथके देखील पुढील बचावकार्यासाठी कन्नूर येथे दाखल झाली आहेत. नागरी प्रशासनाला आवश्यक असणाऱ्या हवाई आणि भूभागावरील शोध आणि गरजांच्या आधारे अतिरिक्त संसाधनांच्या आवश्यकतांचा अभ्यास केला जात आहे.
दिवसभरात भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने अन्नपदार्थ आणि इतर मदत साहित्य पोहोचवण्यासाठी अनेक उड्डाण केली. संपर्क तुटलेल्या भागातून नागरिकांचे स्थलांतर करण्यातही हवाई दलाची मोठी मदत झाली. नौदल विमान वाहतूकीने SDRF आणि राज्य प्रशासन अधिकाऱ्यांच्या प्रवासासाठी योग्य ती मदत पुरवली. थिरुअनंतपुरम, सुलूर आणि तंजावर येथे हवाई दलाचा अनेक विमाने सध्या उभी करण्यात आली आहेत, ज्यामुळे आवश्यकता असल्यास कमीत कमी कालावधीत बचावकार्यासाठी ही विमाने उपलब्ध होतील.
औषध आणि प्राथमिक उपचारांच्या मदतीव्यतिरिक्त, इसीएचएस पॉलीक्लिनिक, कलपेट्टा पूरग्रस्तांसाठी डॉक्टर, परिचारिका सहाय्यक तसेच रुग्णवाहिका सेवा पुरवत आहे.
अडकलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी भारतीय लष्कर सर्वतोपरी सज्ज असून सर्व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अथक प्रयत्न करत आहे. या आव्हानात्मक काळात केरळ राज्याला आवश्यक ती सर्व मदत देण्यासाठी लष्कर वचनबद्ध आहे. बाधित भागात मदत आणि बचाव कार्यासाठी बचाव पथके अविश्रांत परिश्रम घेत आहेत.
आराधना जोशी
(पीआयबीच्या इनपुट्सह)