ग्रीसमधील सँटोरिनी बेटावर भूकंपाचे तीव्र हादरे; पर्यटकांची धावपळ

0
सँटोरिनी

ग्रीसमधील सँटोरिनी बेटावर सलग चौथ्या दिवशी डझनभर भूकंपाचे धक्के बसल्याने, तिथे उपस्थित लोकांची बेट सोडून जाण्यासाठी पळापळ सुरु झाली. नागरिकांच्या मदतीसाठी सुरु करण्यात आलेल्या अतिरिक्त फेरी बोट्स आणि विमान उड्डाणांचा, अनेक कुटुंबांना फायदा झाला.

शुक्रवार पासूनच एजियन समुद्रातील ‘सॅंटोरिनी आणि अमोर्गोस’ या ज्वालामुखीय बेटांदरम्यान, भूकंपाच्या धक्के जाणवत आहेत,  ज्यामुळे अधिकाऱ्यांना सँटोरिनी आणि जवळपासच्या आयओस, अमोर्गोस आणि अनाफी येथील शाळा शुक्रवारपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश द्यावा लागला.

सोमवारी, 4 रिश्टर स्केलपेक्षा अधिक तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के, सॅंटोरिनीला दर काही मिनिटांनी हादरवत होते. त्यामुळे लोकांना घरांमध्ये किंवा अन्य बंद जागी न राहण्याचा तसेच लहान बंदरांजवळ न जाण्याचा इशारा देण्यात आला. याशिवाय खबरदारी म्हणून भूकंप प्रवण क्षेत्रात, आपत्ती प्रतिसाद युनिट्स तैनात करण्यात आले होते.

भूकंपाचे वारंवार धक्के

तज्ञांनी सांगितले की, सॅंटोरिनी बेटावर होणारी भूकंपीय क्रिया, इथल्या जास्त लोकवस्ती असलेल्या काही उंच डोंगर रांगात पुढील काही आठवडे अशीच सुरु राहील.

सँटोरिनी स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, ”येथील कायमस्वरुपी रहिवाश्यांसाठी ही फार चिंतेची बाब नाही, कारण त्यांना भूकंपाची सवय झाली आहे, पण जे लोक या बेटावर पर्यटनासाठी आले आहेत किंवा काही कामानिमित्त आले आहेत ते बेट सोडण्याची धावपळ करत आहेत, साहाजिकच ही त्यांच्यासाठी भयभीत करणारी घटना आहे.”

“गेल्या तीन-चार दिवसांपासून सातत्याने, दर पाच मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवत आहेत, जे थांबायचे नावच घेत नाहीयेत आणि संपूर्ण बेट गोंधळले आहे,” अशी प्रतिक्रिया बेटावर उपस्थित त्झानिस लिग्नोस (35) नामक इसमाने दिली, ज्याने त्याची बायको आणि मुलासाठी बेटावरुन बाहेर पडण्यासाठी तिकीटांची व्यवस्था केली होती.

“या सततच्या धक्क्यांमुळे आम्हाला एकही रात्र नीट झोपता आले नाही. यावेळी येणार आवाज खूप भीतीदायक होता, की आम्ही  थेट घराबाहेर धाव घेतली. आता इथे राहणे आम्हाला शक्य नाही,” असेही तो म्हणाला.

सोमवारी अनेक लोक परतीच्या फेरींवर चढण्याच्या घाईत होते, ज्यामध्ये लहान बाळं आणि मुलांसह अनेक कुटुंबांचा समावेश होता.

प्रत्यक्षदर्शी झोई लिग्नौ (72), या घटनेवियी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, ”गेले 4 दिवस सतत भूकंपाचे तीव्र धक्के जाणवत आहेत. आम्ही पहिले तीन दिवस धीर धरला होता पण आजचा चवथा दिवस हा सर्वात वाईट होता, म्हणून आम्ही इथून तातडीने निघण्याचा निर्णय घेतला आहे.”

ज्वालामुखीय क्रिया

याप्रकरणी एजियन एअरलाइन्सने सांगितले, की ग्रीसच्या नागरी संरक्षण मंत्रालयाच्या विनंतीनुसार रहिवासी आणि पर्यटकांच्या परतीच्या प्रवासाची सोय करण्यासाठी, ते सोमवारी आणि मंगळवारी सँटोरिनी आणि बाकी ठिकाणाहून तीन अतिरिक्त उड्डाणे सुरु करतील.

“आमचा अंदाज आहे की, ज्वालामुखी सदृश ही क्रिया, पुढील काही दिवस चालू राहील आणि कदाचित यामध्ये एक दीर्घ भूकंपाचा क्रम असू शकेल,” असे टेक्टोनिक भूगर्भशास्त्र आणि आपत्ती व्यवस्थापनाचे प्राध्यापक- इफ्थिमिओस लेक्कास आणि जमिनीवरील परिस्थितीचे मूल्यांकन करणाऱ्या तज्ज्ञांच्या टीमने, ग्रीक दूरदर्शन वाहिनीला सांगितले.

ग्रीस हा देश अनेक भूकंपीय तूट रेषांवर वसलेला आहे, त्यामुळे इथे वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत असतात.

सुमारे 1600 इ.स. पूर्वमध्ये झालेल्या, इतिहासातील सर्वात मोठ्या ज्वालामुखीच्या उद्रेकांपैकी एका उद्रेकातून, सँटोरिनी बेटाची निर्मिती झाली होती. या भागात शेवटचा ज्वालामुखी स्फोट 1950 मध्ये झाला होता.

दरम्यान तज्ज्ञांनी स्पष्ट केले की, अलीकडच्या काही दिवसांत सँटोरिनीजवळ झालेल्या हलक्या ज्वालामुखीय हालचाली या भूकंपांशी संबंधि नाहीत.

(रॉयटर्सच्या इनपुटसह)

+ posts
Previous articleफेडरल निधी गोठवण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयाला न्यायाधीशांची स्थगिती
Next articlePLA Slams US-Philippines Air Drills Amid Rising South China Sea Tensions

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here