मध्यपूर्वेतील तणाव कमी करण्याच्या उद्देशाने बचावात्मक उपाय म्हणून अमेरिका त्या भागात अतिरिक्त लष्कर तैनात करत असल्याचे व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासचा नेता इस्माईल हनियेहच्या तेहरानमध्ये झालेल्या हत्येनंतर प्रादेशिक तणाव वाढला आहे, बैरूतमधील इस्रायली हल्ल्यात लेबनॉनच्या हिजबुल्ला गटाचा वरिष्ठ लष्करी कमांडर फुआद शुक्र ठार झाला. दोन्ही दहशतवादी गटांना इराणचा पाठिंबा आहे.
हमासच्या इस्रायलवरील हल्ल्यांनंतर गेल्या ऑक्टोबरमध्ये सुरू झालेल्या गाझामधील पॅलेस्टिनी अतिरेक्यांविरुद्धच्या इस्रायलच्या युद्धामुळे मध्यपूर्वेतील संघर्षाची व्यापकता वाढू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे. इराणच्या राजधानीत हनियेहच्या करण्यात आलेल्या हत्येसाठी इराण आणि हमासने इस्रायलला दोषी ठरवले आहे आणि त्यांनी हिजबुल्लाहसोबत मिळून बदला घेण्याची शपथ घेतली आहे. इस्रायलने या हत्येची जबाबदारी स्वीकारलेली नाही किंवा नाकारलेली नाही.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन मध्यपूर्वेतील घडामोडींवर चर्चा करण्यासाठी त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा पथकाला बोलावतील, असे व्हाईट हाऊसने सांगितले. याशिवाय ते जॉर्डनचे राजे अब्दुल्ला यांच्याशीही चर्चा करतील.
अमेरिकेच्या न्यूज सर्व्हिस एक्सियोसने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी जी 7 देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांना सांगितले की इराण आणि हिजबुल्ला लवकरात लवकर म्हणजे कदाचित आजही इस्रायलवर हल्ला सुरू करू शकतात. याबाबत त्यांनी एका फोनकॉलवर तीन स्रोतांकडून मिळालेल्या माहितीचा हवाला दिला. परंतु एक्सियोसच्या म्हणण्यानुसार, ब्लिंकन यांच्या मते इराण आणि हिजबुल्ला हल्ला कसा करतील याबाबतचे चित्र अजूनही अस्पष्ट असून त्यांनाही हल्ल्याची अचूक वेळ माहित नाही.
या अहवालाबद्दल विचारले असता, परराष्ट्र विभागाने परराष्ट्रमंत्र्यांशी झालेल्या टेलिफोनिक संभाषणातील काही वाक्ये वाचून दाखवली, ज्यात मंत्र्यांनी “मध्यपूर्वेतील तणाव कमी करण्यासाठी तातडीच्या उपायानवर” चर्चा केल्याचे म्हटले होते.
पेंटागॉनने शुक्रवारीच जाहीर केले होते की ते या प्रदेशात अतिरिक्त लढाऊ विमाने आणि नौदलाची युद्धनौका तैनात करेल.
या भागातील तणावाचे वातावरण कमी करणे, संभाव्य हल्ल्यांपासून बचाव करणे आणि प्रादेशिक संघर्ष टाळणे हे एकूण उद्दिष्ट आहे, असे व्हाईट हाऊसचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जोनाथन फिनर यांनी सीबीएसच्या फेस द नेशन या कार्यक्रमात सांगितले.
फिनर पुढे म्हणाले की, अमेरिका आणि इस्रायल प्रत्येक शक्यतेसाठी तयारी करत आहेत.
1 एप्रिल रोजी सीरियाची राजधानी दमास्कसमधील आपल्या वाणिज्य दूतावासावर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचे सात अधिकारी ठार झाले होते. त्याचा बदला घेण्यासाठी इराणने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी इस्रायली भूभागावर हल्ला केला. एप्रिलमध्ये प्रादेशिक संघर्षाची “अतिशय जवळून झलक” बघायला मिळाली होती, असे फिनर म्हणाले.
तशी परिस्थिती पुन्हा उद्भवली तर अमेरिकेला तयार रहायला हवे, असे फायनर पुढे म्हणाले.
पेंटागॉनने आपल्या इस्रायली समकक्षांशी केलेल्या दूरध्वनी संभाषणात म्हटले आहे की, अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन यांनी इस्रायलच्या सुरक्षेसाठी आणि इराण, लेबनॉनच्या हिजबुल्ला, हौथी आणि इतर इराणी समर्थित दहशतवादी गटांकडून येणाऱ्या धोक्यांविरूद्ध स्वसंरक्षणासाठी अमेरिका वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला.
ब्लिंकन यांनी इराकचे पंतप्रधान मोहम्मद शिया अल-सुदानी यांच्याशी चर्चा केली आणि “प्रादेशिक तणाव कमी करण्यासाठी, त्यात आणखी वाढ होऊ नये आणि स्थिरता वाढवण्यासाठी सर्व पक्षीय पावले उचलण्याच्या महत्त्वावर भर दिला,” असे परराष्ट्र विभागाने म्हटले आहे.
सुज्ञ नियोजन
हनियेहच्या हत्येचा बदला घेण्याची धमकी देऊनही इराण माघार घेईल अशी आशा बायडेन यांनी शनिवारी व्यक्त केली.
लेबनॉन सोडण्याची इच्छा असलेल्या अमेरिकन नागरिकांनी तातडीने त्या दृष्टीने पावले उचलावीत असे आवाहन अमेरिकेने बुधवारीच केले आहे.
‘भविष्यातील घटनांबाबत कोणालाही कसलाच अंदाज नाही. त्यांच्यासाठी आणि आमच्या सरकारसाठी हे सूज्ञ नियोजन आहे,” असे फायनर यांनी सीबीएसवर सांगितले.
ब्रिटनच्या सरकारनेही आपल्या नागरिकांना लेबनॉन सोडण्याचा सल्ला दिला. प्रादेशिक संघर्षामुळे सुरक्षा धोक्यात आली आहे असे म्हणत कॅनडाने आपल्या नागरिकांना इस्रायलमधील प्रवास टाळावा असे सांगितले.
गाझा आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सुमारे 40 हजार पॅलेस्टिनी मारले गेल्याने, गाझा युद्धातील हमासच्या वरिष्ठ व्यक्तींच्या हत्यांच्या मालिकेतील हनियेहचा मृत्यू हा त्याचाच एक भाग होता आणि यामुळे मध्यपूर्वेतील व्यापक संघर्षाची चिंता वाढली आहे.
समूहाच्या आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीचा चेहरा असलेल्या हनियेहच्या जागी नवीन नेत्याची निवड करण्यासाठी “व्यापक सल्लामसलत प्रक्रिया” सुरू केल्याचे हमासने म्हटले आहे.
अमेरिका आणि फ्रान्स, ब्रिटन, इटली आणि इजिप्तसह इतर आंतरराष्ट्रीय भागीदारांनी आणखी प्रादेशिक तणाव रोखण्यासाठी राजनैतिक संपर्क कायम ठेवले.
जॉर्डनचे परराष्ट्रमंत्री अयमान सफादी यांनी इराणी परराष्ट्रमंत्र्यांशी प्रादेशिक घडामोडींवर चर्चा करण्यासाठी नुकताच इराणचा दौरा केला, असे इराणी राज्य माध्यमांनी सांगितले. सफादी यांचा हा दौरा ही अतिशय दुर्मिळ घटना असल्याचे मानले जात आहे.
गाझा शहराजवळ विस्थापित लोकांना आश्रय देणाऱ्या दोन शाळांना लक्ष्य करणाऱ्या इस्रायली हल्ल्यात रविवारी किमान 25 पॅलेस्टिनी ठार झाले तर अनेकजण जखमी झाले, असे पॅलेस्टिनची अधिकृत वृत्तसंस्था डब्ल्यूएएफएने सांगितले. आणखी एक हल्ला मध्य गाझामधील रुग्णालयाच्या आवारातील तंबूवर झाला, ज्यामध्ये किमान पाच लोक ठार झाले, असे हमासच्या गाझा आरोग्य विभागाने सांगितले.
टीम भारत शक्ती
(रॉयटर्स)