मागील आठवड्याच्या शेवटी उसळलेल्या वर्णद्वेषी दंगलीच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनने एक हजार अतिरिक्त विशेष पोलिस अधिकारी तैनात केले आहेत. सोशल मीडियाद्वारे पसरवण्यात आलेल्या अफवांमुळे उसळलेल्या दंगलीनंतर सोशल मीडिया कंपन्यांसाठी नियम अधिक कडक करण्याचा विचार करत असल्याचे सरकारने म्हटले आहे.
पंतप्रधान कीर स्टारमर म्हणाले की, अतिरिक्त पोलिस संख्या आणि जलद न्यायप्रणालीमुळे बुधवारीपासून त्यांनीच ‘अति-उजव्या गद्दार’ म्हणून संबोधलेल्या लोकांना रोखण्यात यश आले आहे.
अधिकारी हाय अर्लटवर
ते पुढे म्हणाले की, पुढील काही काळासाठी ब्रिटनमधील अधिकारी हाय अलर्टवर असतील. स्टारमर यांनी पत्रकारांना सांगितले की, “या आठवड्याच्या शेवटी सुद्धा आपल्याला अत्यंत सतर्क राहावे लागेल.”
वर्णद्वेषी हल्ले आणि अराजकता यामुळे मुस्लिम आणि स्थलांतरितांना प्रामुख्याने लक्ष्य केले जात आहे.
हॉटेल्स आणि मशिदींवरील हल्ले
निर्वासितांना आश्रय देण्याच्या उद्देशाने बांधण्यात आलेल्या हॉटेलचे नुकसान झाले आहे. या हॉटेलच्या खिडक्या फोडण्यात आल्या होत्या. याशिवाय मशिदींवरही दगडफेक करण्यात आली.
सक्त कारवाई
दंगलीत सामील असलेल्यांवर खटला चालवला जाईल, असे स्टारमर यांनी सांगितले. ते म्हणाले, “यापुढे अशा देशविघातक कृत्यांमध्ये भाग घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीसाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा संदेश आहे.”
आतापर्यंत, मुस्लिम, स्थलांतरित, इतर स्थळे यांच्यासह पोलीस आणि पादचारी यांवर झालेल्या हल्ल्यांसंदर्भात आतापर्यंत 480हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे.
अटक केलेल्यांपैकी 150हून अधिकजणांना यापूर्वीच न्यायालयात हजर करण्यात आल्याचे न्याय मंत्रालयाने सांगितले. डझनभर तुरुंगात आहेत आणि आणखी अनेकांना शुक्रवारीपर्यंत शिक्षा सुनावली जाईल.
इंग्लंडमध्ये चाकू हल्ल्यात तीन तरुण मुलींचा मृत्यू झाला. हा संशयित मारेकरी इस्लामवादी स्थलांतरित असल्याची अफवा सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे पसरली. त्यानंतर तिथे दंगली उसळल्या.
विशेष उपाययोजना
कॅबिनेट कार्यालयाचे मंत्री निक थॉमस-सायमंड्स यांनी स्काय न्यूजशी बोलताना अतिरिक्त विशेषीकृत पोलिस अधिकाऱ्यांच्या जमवाजमवीसह विशेष उपाययोजनांविषयी माहिती दिली. याशिवाय देशाच्या ऑनलाईन सुरक्षा कायद्याबाबत सरकार फेरविचार करेल असेही ते म्हणाले.
‘अति-उजव्या’ विचारसरणीच्या लोकांकडून बुधवारी परत एकदा दंगली होऊ शकतील अशी शक्यता वर्तवली जात होती कारण हजारो विरोधकांनी देशभरात रस्त्यावर उतरून निदर्शने केली. सुदैवाने दंगली झाल्या नाहीत.
यानंतरच्या काळात किती अति-उजव्या विचारसरणीचे लोक एकत्र येतील किंवा ते पुढे जातील की नाही याबाबत सध्यातरी कोणतीही स्पष्टता नाही.
स्टँड अप टू रेसिझम गटाच्या म्हणण्यानुसार, आधी झालेल्या निदर्शनांच्या विरोधात शनिवारी 40 निदर्शने होणार आहेत.
तृप्ती नाथ
(रॉयटर्स)