बार्सिलोना इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल हेल्थने (आयएस ग्लोबल) सोमवारी प्रकाशित केलेल्या अहवालानुसार 2023 मध्ये युरोपमध्ये उष्माघाताच्या लाटेमुळे 47 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. या खंडातील दक्षिणेकडील देशांना याचा सर्वाधिक फटका बसला.
मागील वर्ष हे जगातील आतापर्यंतचे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले. हवामान बदलांमुळे तापमानात वाढ होत असताना, उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे युरोपमधील नागरिकांना आरोग्याच्या विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. जगातील सर्वात जलद तापमान वाढीचा खंड म्हणून युरोपची ओळख बनली आहे. (ट्वीट)
स्पॅनिश संशोधन केंद्राच्या अहवालानुसार, तापमान वाढीची पूर्वसूचना प्रणाली आणि आरोग्य सेवेतील सुधारणांमुळे वाढत्या उष्माघाताशी जुळवून घेण्यास लोकांना मदत होत आहे. त्यामुळेच गेल्या 20 वर्षांमध्ये करण्यात आलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी जर झाली नसती तर 2023 मधील मृत्युदर 80 टक्के जास्त असता.
आयएस ग्लोबलच्या संशोधक आणि अभ्यासाच्या प्रमुख लेखिका एलिसा गॅलो म्हणाल्या, “आमच्या अभ्यासाने हे दाखवून दिले आहे की चालू शतकात उच्च तापमानाशी जुळवून घेण्याची सामाजिक प्रक्रिया कशी झाली आहे, ज्यामुळे अलिकडच्या उन्हाळ्यात उष्माघाताशी संबंधित असुरक्षितता आणि त्यामुळे मुख्यतः वृद्धांमध्ये होणाऱ्या मृत्युदरात अनपेक्षितपणे घट झाली आहे.”
“उदाहरणार्थ, 2000 सालापासून सुरू असलेल्या आमच्या अभ्यासानुसार, मृत्यू होण्यासाठी किमान तापमान-सर्वात कमी मृत्यूच्या जोखमीसह योग्य तापमान- युरोप खंडात 2000-2004 मध्ये सरासरी 15 अंश सेल्सिअस असणारे तापमान 2015-2019 मध्ये 17.7 अंश सेल्सिअसपर्यंत हळूहळू वाढत गेले आहे. सामान्य सामाजिक-आर्थिक प्रगती, वैयक्तिक वर्तनातील सुधारणा आणि 2003च्या विक्रमी उन्हाळ्यानंतर अंमलात आणलेल्या उष्णता प्रतिबंधक उपायांमुळे सार्वजनिक आरोग्य यंत्रणेत झालेले सकारात्मक बदल यांमुळे कदाचित या शतकाच्या सुरुवातीच्या तुलनेत आपण आता उष्माघाताच्या लाटेचा सामना करू शकतो, असेही त्या म्हणाल्या.
संशोधकांनी 35 युरोपीय देशांतील मृत्यू आणि तापमानाच्या नोंदी वापरल्या. त्यांच्या अंदाजानुसार 47 हजार 690 लोक तापमान वाढीमुळे मृत्यूमुखी पडले.
मृत्यूमुखी पडलेल्यांची आकडेवारी गोळा करताना ग्रीस, बल्गेरिया, इटली आणि स्पेन या देशांमध्ये वाढत्या उष्माघातामुळे सर्वाधिक मृत्युदर असल्याचे दिसून आले. (ट्वीट)
मागील अभ्यासांच्या अनुषंगाने विचार केला तर यावेळी उष्माघाताचा फटका महिला आणि वृद्ध लोकांना मोठ्या प्रमाणात बसल्याचे बघायला मिळाले. विशेषतः, एकूण लोकसंख्येचा हिशोब करता, पुरुषांपेक्षा महिलांमध्ये उष्णतेशी संबंधित मृत्यूचे प्रमाण 55 टक्के जास्त होते. तर वृद्धांमध्ये 65 ते 79 वर्षे वयोगटातील लोकांपेक्षा 80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
रामानंद सेनगुप्ता
(रॉयटर्स)