बंगळुरू येथे 10 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या ‘Aero India 2025‘ च्या पार्श्वभूमीवर, संरक्षण मंत्रालयाने एअरफोर्स स्टेशन येलाहंका येथे काही महत्त्वपूर्ण सुधारणांची घोषणा केली आहे. ‘एरो इंडियाचे’ या वर्षीचे प्रदर्शन, हे त्याच्या इतिहासातील सर्वात मोठे, तांत्रिकदृष्ट्या अधिक प्रगत आणि उपस्थितांसाठी एक अद्वितीय सादरीकरण असेल, असा दावा संरक्षण मंत्रालयाने केला आहे. यावेळेच्या प्रदर्शनामध्ये- पायाभूत सुविधांच्या सुधारणांपासून ते बहुस्तरीय सुरक्षा उपायांपर्यंत- आयोजक, प्रदर्शक, प्रेक्षक आणि प्रतिनिधींना जागतिक दर्जाचा अनुभव देण्यासाठी कुठलीही कसर सोडण्यात आली नसल्याचे, मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.
डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि नावीन्यता
भूतकाळातील कनेक्टिव्हिटी संबंधित अडचणींची दखल घेत, यावेळी तात्पुरते मोबाइल टॉवर्स आणि नेटवर्क बूस्टर्स अखंडित संप्रेषण सुनिश्चित करतील. यासोबतच एक समर्पित एरो इंडिया 2025 मोबाइल ॲप रिअल-टाइम अपडेट, नेव्हिगेशन सपोर्ट आणि कार्यक्रमाचे वेळापत्रक प्रदान करेल.
या कार्यक्रमात स्टार्टअप्स आणि MSMEs (Micro, Small and Medium Enterprises) वर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल, तसेच स्वदेशी तंत्रज्ञानातील नावीन्यतेला चालना देण्यावर देण्यावर भर दिला जाईल. B2B (Business-to-business) आणि G2B (Government to Business Services) बैठकांची मालिका, राऊंड कॉन्फरन्स आणि सहयोगी उपक्रम एरो इंडियाला जागतिक एरोस्पेस इनोव्हेशनचे केंद्र म्हणून स्थान मिळवून देईल.
हवाई क्षेत्र आणि प्रात्यक्षिके
IAF (भारतीय वायुसेना) ने, AAI (Airports Authority of India) आणि HAL (Hindustan Aeronautics Limited) च्या भागीदारीत, हवाई प्रात्यक्षिकांदरम्यान सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी, एक समर्पित हवाई क्षेत्र व्यवस्थापन योजना तयार केली आहे. यातील प्रमुख उपायांमध्ये तात्पुरते उड्डाण निर्बंध, धोरणात्मक विमान पार्किंग आणि सहभागींसाठी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय इंधन भरण्याच्या योजनांचा समावेश आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे, एरो इंडिया 2025 पर्यावरणीय प्रभाव कमी करण्याच्या उद्देशाने- इको-फ्रेंडली पद्धतींचा समावेश करणार आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी, संपूर्ण कार्यक्रमात वाहनांची ये-जा लक्षणीयरीत्या कमी केली जाईल. याव्यतिरिक्त, 100 हून अधिक इलेक्ट्रिक गाड्या अंतर्गत व्यवहारांसाठी तैनात केल्या जातील, ज्यामुळे उपस्थितांसाठी वाहतुकीचा एक पर्यावरण पूरक मार्ग सुनिश्चित होईल. या उपक्रमांमध्ये विलगीकरण आणि पुनर्वापराच्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या, व्यापक कचरा व्यवस्थापन प्रणालीचाही समावेश आहे, ज्याद्वारे टिकाऊपणावरही भर दिला जाईल.
अधिकृत विधानानुसार, एरो इंडिया 2025, अनेक एजन्सींमधील काळजीपूर्वक नियोजन आणि सहकार्याने, जागतिक एरोस्पेस प्रदर्शनांच्या अद्वितीय सादरीकरणासाठी सज्ज आहे. हा कार्यक्रम पायाभूत सुविधा, सुरक्षा, नावीन्य आणि टिकाऊपणा यावर भर देईल तसेच भविष्यातील त्याच्या आवृत्त्यांसाठी नवीन मापदंड तयार करेल. कार्यक्रमातील सर्व सहभागींना एक अविस्मरणीय अनुभव देऊन जाईल.