अफगाणिस्तानच्या मध्य बामियान प्रांतात बंदूकधाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन स्पॅनिश पर्यटक ठार तर एक स्पॅनिश पर्यटक जखमी झाला, असे स्पेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केले.
याआधी शुक्रवारी तालिबानच्या अंतर्गत मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल मतीन कानी यांनी सांगितले की, या हल्ल्यात तीन स्पॅनिश पर्यटक आणि एक अफगाण नागरिक ठार झाला आहे.
बंदूकधाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात चार परदेशी नागरिकांबरोबर तीन अफगाणी नागरिकही जखमी झाले, असेही त्यांनी सांगितले. गोळीबार करणाऱ्यांपैकी चार जणांना अटक करण्यात आली आहे, असे ते म्हणाले.
स्पेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की दूतावासातील आपत्कालीन विभाग पूर्णपणे तैनात करण्यात आला असून पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत केली जात आहे.
स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी सोशल मेसेजिंग प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले की, “अफगाणिस्तानमध्ये स्पॅनिश पर्यटकांच्या हत्येच्या बातमीने आपल्याला धक्का बसला आहे.” या हल्ल्यामागची कारणे अद्याप समजू शकलेली नाहीत.
पर्वत रांगांमध्ये वसलेल्या बामियानला युनेस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केले आहे. तिथे दोन विशाल बुद्ध पुतळ्यांचे अवशेष आहेत जे तालिबानने त्यांच्या आधीच्या राजवटीत म्हणजे 2001 मध्ये उध्वस्त केले होते.
2021 मध्ये अफगाणिस्तानवर पुन्हा कब्जा केल्यापासून तालिबानने सुरक्षिततेला पुन्हा एकदा प्राधान्य देण्याचे, देशात येणाऱ्या कमी पण हळूहळू वाढत असलेल्या पर्यटकांना प्रोत्साहन देण्याचे आणि बुद्धांचे पुतळे असलेल्या भागात प्रवेश देण्यासाठी तिकिटविक्री करण्याचे वचन दिले आहे.
अमेरिकन सैन्य निघून गेल्यानंतर आणि 2021 मध्ये तालिबानने ताबा मिळवल्यानंतर शुक्रवारी झालेला हा हल्ला परदेशी नागरिकांवर झालेला सर्वात गंभीर हल्ला होता.
त्याआधी 2022 मध्ये चिनी व्यापाऱ्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या काबूलच्या हॉटेलमध्ये झालेल्या हल्ल्यात चिनी नागरिक जखमी झाल्याचे दावा इस्लामिक स्टेटने केला होता.
2021 मध्ये तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यापासून इस्लामिक स्टेटकडून होणाऱ्या हल्ल्यांनंतरही तिथे मोठ्या प्रमाणात शांतता प्रस्थापित झाली आहे.
अफगाणिस्तानमधील स्थिती सामान्य होण्याच्या दृष्टीने तालिबान कटिबद्ध असल्याचे दिसते. देशात पर्यटकांची पुन्हा एकदा गर्दी होऊ लागली आहे. पर्यटनस्थळ बघण्यासाठी तिकिटविक्री केले जाणारे आणि पर्यटकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या अफगाणिस्तानमधील ठिकाणांपैकी बामियान हे एक ठिकाण आहे.
सूर्या गंगाधर
(रॉयटर्स)