पाकिस्तानवरील अवलंबित्व कमी करून अफगाणिस्तानचा इराणकडे व्यापार मोर्चा

0
अलिकडच्या आठवड्यांमधील संघर्षामुळे अफगाणिस्तान पाकिस्तान यांच्यातील सीमा बंद झाल्या आहेत. त्यामुळे पाकिस्तानवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी अफगाणिस्तान आता इराण आणि मध्य आशियातून होणाऱ्या व्यापारी मार्गांवर जास्त अवलंबून असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पाकिस्तानच्या बंदरांवरील अफगाणिस्तानच्या अवलंबित्वामुळे इस्लामाबादला सीमेपलीकडे असलेल्या पाकिस्तानी अतिरेक्यांना आश्रय देण्याबाबत काबुलवर दबाव आणण्याची संधी मिळाली आहे.

परंतु अफगाणिस्तान इराणच्या सवलतींचा वापर करून, भारताच्या पाठिंब्याने मालवाहतूक चाबहार बंदरात हलवत आहे, पाकिस्तानला बायपास करत आहे आणि वारंवार होणारे सीमा तसेच वाहतूक व्यत्यय टाळत आहे.

“गेल्या सहा महिन्यांत, इराणसोबतचा आमचा व्यापार 1.6 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे, जो पाकिस्तानसोबतच्या 1.1 अब्ज डॉलर्सच्या देवाणघेवाणीपेक्षा जास्त आहे,” असे वाणिज्य मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल सलाम जवाद अखुंदजादा यांनी रॉयटर्सला सांगितले.

“चाबहार येथील सुविधांमुळे विलंब कमी झाला आहे आणि व्यापाऱ्यांना विश्वास मिळाला आहे की सीमा बंद झाल्या तरी मालवाहतूक थांबणार नाही.”

तीन महिन्यांची अंतिम मुदत

पाकिस्तानमधील करार पूर्ण करण्यासाठी आणि इतर मार्गांवर व्यापार स्थलांतर करण्यासाठी व्यापाऱ्यांना तीन महिन्यांची मुदत दिली आहे, असे अफगाणिस्तानचे आर्थिक व्यवहारांसाठीचे उपपंतप्रधान मुल्ला अब्दुल गनी बरादर म्हणाले.

इस्लामाबादने “व्यावसायिक आणि मानवतावादी बाबींचा राजकीय फायदा म्हणून वापर” केल्याचा आरोप केल्यानंतर त्यांनी सांगितले की अफगाणिस्तान अंतिम मुदतीनंतर या वादात मध्यस्थी करणार नाही. तसेच “कमी दर्जाची” औषधे आयात केली जात असल्याचा हवाला देत पाकिस्तानकडून येणारी औषधे थांबवण्याचे आदेश मंत्रालयांना दिले.

सर्वात मोठे स्थलांतर चाबहारकडे आहे, जे 2017 पासून इराण आणि भारतासोबतच्या ट्रान्झिट करारांतर्गत वापरले जात आहे. अफगाणिस्तानचे अधिकारी म्हणतात की टॅरिफ कपात आणि सवलतीच्या दरात मिळणखऱ्या स्टोरेजपासून जलद हाताळणीपर्यंत सगळीकडे प्रोत्साहन मिळाल्याने अधिक माल दक्षिणेकडे पाठवता येत आहे.

इराणने अद्ययावत उपकरणे आणि एक्स-रे स्कॅनर बसवले आहेत, तर अफगाणिस्तानच्या मालवाहतुकीला बंदरातील शुल्कात 30 टक्के कपात, स्टोरेज शुल्कात 75 टक्के सूट आणि डॉकिंग शुल्कात 55 टक्के सूट मिळाल्याचे वाणिज्य मंत्रालयाचे प्रवक्ते अखुंदजादा म्हणाले.

‘कोणतेही नुकसान नाही’

अफगाणिस्तानच्या निर्णयामुळे पाकिस्तानचे कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही, असे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी जिओ न्यूजला सांगितले.

“अफगाणिस्तान कोणत्याही बंदरातून किंवा देशातून व्यापार करू शकतो,” असे ते म्हणाले.

दुसरीकडे वाणिज्य मंत्री जाम कमाल खान यांनी रॉयटर्सना सांगितले, “आम्ही सुरक्षेशी तडजोड करू शकत नाही.”

भारताने अफगाणिस्तानातील सत्ताधारी तालिबानशी संबंध वाढवले ​​आहेत, त्यांनी प्रभारी परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी यांचे स्वागत केले आहे आणि मानवतावादी मदत वाढवली आहे.

चाबहार येथील प्रमुख टर्मिनलचा कारभार भारताकडून चालवण्यात येतो, ज्याला ते अफगाणिस्तान आणि मध्य आशियाशी एक धोरणात्मक दुवा म्हणून पाहतो. ऑक्टोबरमध्ये, अमेरिकेने भारताला बंदर चालवण्यासाठी धिर्बंधांमधून सहा महिन्यांची सूट दिली आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह) 

+ posts
Previous articleपाकिस्तान: मुनीर सीडीएफ बनल्याने न्यायाधीशांचा राजीनामा, विरोधकांचा निषेध
Next articleIndian Army Deploys Mono-Rail System to Boost Logistics at 16,000 ft in Kameng Himalayas

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here