संयुक्त राष्ट्रसंघाच्या मतदानापूर्वी, क्यूबा भारताचा पाठिंबा मिळवण्याच्या प्रयत्नात

0

पुढील आठवड्यात होणाऱ्या, संयुक्त राष्ट्रसंघांच्या महासभेत, अमेरिकेने क्यूबावर लादलेल्या आर्थिक आणि वित्तीय निर्बंधांचा निषेध करणाऱ्या प्रस्तावावर अपेक्षित मतदान होण्यापूर्वी, क्यूबाचे भारतातील राजदूत जुआन कार्लोस मार्सन यांनी त्यांच्या देशाची सद्यस्थिती स्पष्ट केली.

दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “सहा दशकांहून अधिक काळ चाललेल्या आणि ट्रम्प यांच्या प्रशासन काळात 200 हून अधिक अतिरिक्त उपायांमुळे वाढलेल्या निर्बंधांमुळे, आमच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. खाद्यपदार्थ आणि औषधे आयात करण्यापासून ते मूलभूत आर्थिक व्यवहार करण्यापर्यंत, जीवनाच्या प्रत्येक पैलूवर या निर्बंधांचा परिणाम होतो आगे.” 

अमेरिकेची ही नाकाबंदी म्हणजे केवळ निर्बंध नसून, क्यूबाला जागतिक स्तरावर एकटे पाडण्यासाठी तयार केलेले धोरण आहे.

“प्रत्येक अडथळ्यावर मात करूनही, आम्ही 100 हून अधिक देशांमध्ये डॉक्टर, शिक्षक आणि मानवतावादी मदत पाठवत आहोत. लस विकसित करण्यापासून ते आपत्ती निवारणापर्यंत, जागतिक आरोग्यासाठी क्यूबाचे योगदान, निर्बंधांखाली असूनही माणुसकीप्रती असलेली आमची बांधिलकी दर्शवते,” असे मार्सन म्हणाले.

‘क्यूबाला दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या राष्ट्रांच्या’ यादीत कायम ठेवण्याच्या अमेरिकेच्या निर्णयावरही त्यांनी टीका केली. हा आरोप निराधार आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, “हा अयोग्य शिक्का बसल्यामुळे क्यूबाला आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांमध्ये प्रवेश मिळत नाहीये आणि जागतिक बँका हवाना (क्यूबाची राजधानी) सोबतचे व्यवहार सुलभ करण्यास टाळाटाळ करत आहेत.”

“प्रत्येक जागतिक आव्हानात भारत क्यूबाच्या पाठीशी उभा राहिला आहे. परस्पर आदर, एकात्मता आणि साऊथ टू साऊथ सहकार्याच्या तत्त्वांवर आधारित ही ऐतिहासिक मैत्री, आगामी मतदानात पुन्हा एकदा दिसेल, अशा आम्हाला विश्वास आहे,” असेही ते म्हणाले.

आर्थिक भागीदारी आणि तंत्रज्ञान सहकार्य

“डॉलरचे प्रभुत्व असलेल्या वित्तीय प्रणालींना बगल देऊन, हवाना भारतासोबत व्यापार आणि गुंतवणुकीचे संबंध अधिक दृढ करू पाहत आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले की, “आम्ही स्थानिक चलनांमध्ये व्यापार करण्यास आणि भारतासोबत थेट वित्तीय चॅनेल स्थापित करण्यास उत्सुक आहोत. क्यूबाने रशिया आणि चीनसोबत अशाचप्रकारच्या थेट व्यवस्था सुरू केल्या आहेत, आणि UPI तसेच द्विपक्षीय बँकिंग लिंक यांसारख्या यंत्रणांद्वारे भारतापर्यंत हे मॉडेल विस्तारण्याची आम्हाला आशा आहे.”

क्यूबा, ज्याचा जैवतंत्रज्ञान पाया मजबूत आहे, तो कर्करोग, मधुमेह आणि न्यूरोलॉजिकल विकारांवर औषधे विकसित करण्यासाठी आणि उत्पादन करण्यासाठी भारताच्या औषध निर्मिती क्षेत्रासोबत सहकार्य वाढवू इच्छितो.

त्यांनी अधोरेखित केले की, क्यूबाने अनेक पेटंट केलेल्या उपचार पद्धती विकसित केल्या आहेत, ज्या व्यापक ‘ग्लोबल साउथ’ उद्दिष्टासाठी भारतात बनवल्या जाऊ शकतात.

ते पुढे म्हणाले की, “भारताकडे उत्पादन क्षमता आहे; आणि क्यूबा संशोधन आणि नवोपक्रम घेऊन हातमिळवणी करण्यास पुढे सरसावला आहे. एकत्र येऊन आम्ही, लॅटिन अमेरिका, आफ्रिका आणि आशियातील लाखो रुग्णांसाठी परवडणारे औषधोपचार तयार करू शकतो.”

ऊर्जा आणि अन्न सुरक्षा

अक्षय ऊर्जा, साखर प्रक्रिया आणि कृषी आधुनिकीकरणामध्ये, क्यूबा भारतीय गुंतवणुकीसाठी प्रयत्न करत आहे. ‘क्यूबाची सुपीक जमीन आणि हरित तंत्रज्ञानातील भारताचे कौशल्य नैसर्गिक समन्वय साधते,’ असे मार्सन म्हणाले.

“दोन्ही राष्ट्रांमध्ये अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, संयुक्त अन्न उत्पादनाकरिता आम्ही भारतीय कंपन्यांना दीर्घकालीन जमीन भाडेतत्वावर देण्यास तयार आहोत. अक्षय ऊर्जा आणि शाश्वत शेतीमध्ये भारताने केलेली प्रगती हे एक असे यशस्वी मॉडेल आहे, ज्यातून आम्हाला शिकायचे आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

पर्यटन आणि संस्कृती

मार्सन यांनी, दोन्ही राष्ट्रांमधील पर्यटन देवाणघेवाण अधिक वाढवण्यावरही भर दिला. तसेच मुथू ग्रुप (Muthu Group) सारख्या भारतीय हॉटेल चेन, क्यूबातील मालमत्तांचे चांगले व्यवस्थापन करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

ते म्हणाले की, “क्यूबा भारतीय पर्यटकांसाठी नेहमीच खुले आहे आणि व्हिसा प्रक्रिया देखील सुलभ करण्यात आली आहे. अधिकाधिक भारतीयांना आमची संस्कृती, संगीत आणि जिव्हाळा अनुभवताना आम्हाला पाहायला आवडेल.”

“भारतासोबतची आमची मैत्री ऐतिहासिक तर आहेच, पण भविष्याभिमुखही आहे. एकत्र येऊन, आपण समानता, परस्पर लाभ आणि शांतता यावर आधारित एक अधिक न्याय्य, बहुध्रुवीय जगनिर्माण करू शकतो,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मूळ लेखिका- हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleकोचीन शिपयार्डकडून स्वदेशी पाणबुडीविरोधी जहाज ‘माहे’ नौदलाला सुपूर्द
Next articleऔपचारिक युद्ध घोषणेशिवाय ड्रग्ज कार्टेल्सविरुद्ध कारवाई सुरूच राहील: ट्रम्प

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here