पोखरणजवळ हवाई दलाच्या लढाऊ विमानातून पडली बॉम्बसदृश वस्तू

0
प्रातिनिधिक फोटो

भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानातून बुधवारी “अनवधानाने” राजस्थानमधील पोखरण ग्राऊंड फायरिंग रेंजजवळ एक “एअर स्टोअर” पाडले गेले. “एअर स्टोअर” म्हणजे लढाऊ विमानाला जोडलेली बाह्य उपकरणे किंवा शस्त्रे, क्षेपणास्त्रे आणि बॉम्ब. भारतीय हवाई दलाने एक्सवरील सोशल मीडिया पोस्टमध्ये या घटनेला दुजोरा देत म्हटले आहे की, या घटनेत कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झालेली नाही. ते बॉम्ब, क्षेपणास्त्र किंवा इतर काही शस्त्र होते का याबाबत कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण न करता, “तांत्रिक बिघाडामुळे हवाई सरावाच्या वेळी एअर स्टोअर अनवधानाने लढाऊ विमानातून सोडले गेले,” असे हवाई दलाने म्हटले आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचेही त्यात म्हटले आहे.

लोकवस्तीच्या भागापासून दूर असलेल्या दुर्गम, निर्जन भागात हा अपघात झाला. स्थानिक पोलिसांच्या म्हणण्यानुसार, यावेळी झालेल्या मोठ्या स्फोटामुळे आठ फूट खोल खड्डा तयार झाला. सशस्त्र दलांकडून नियमितपणे या ठिकाणी शस्त्रास्त्रांची चाचणी घेतली जाते. शिवाय पोखरण येथे गोळीबाराचा सराव केला जातो. लष्कर आणि भारतीय हवाई दल यांच्यासाठी या भागात वेगवेगळ्या फायरिंग रेंज आहेत. पोखरण फायरिंग रेंज थरच्या वाळवंटात असून भारतीय सशस्त्र दलांद्वारे शस्त्रास्त्रांची चाचणी घेण्यासाठी आणि गोळीबार सराव करण्यासाठी वापरला जाणारा तो एक वेगळाच भाग आहे.

29 ऑगस्टपासून जोधपूर येथे सुरू होणाऱ्या ‘तरंग शक्ती’ या बहु्राष्ट्रीय लढाऊ हवाई  सरावाच्या दुसऱ्या टप्प्यापूर्वी, विविध हवाई तळांवर तैनात असलेल्या भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांना पोखरणमधील फायरिंग रेंजवर हवेतून जमिनीवरील केल्या जाणाऱ्या बॉम्बस्फोट मोहिमांसाठी प्रशिक्षण दिले जात आहे. याआधी एप्रिलमध्ये भारतीय हवाई दलाने जैसलमेरमधील पोखरण फायरिंग रेंज येथे ‘गगन शक्ती’ हा आपला सर्वात मोठा सराव आयोजित केला होता. या सरावात भारतीय हवाई दलाची सर्व प्रमुख लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर्स आणि विमाने सहभागी झाली होती.

9 मार्च 2022 रोजी 290 किमी पल्ल्याच्या ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या अपघाती प्रक्षेपणाच्या तुलनेत ही घटना किरकोळ आहे. भारतीय हवाई दलाच्या ग्राउंड युनिटने हे क्षेपणास्त्र प्रक्षेपित केल्यानंतर अवघ्या सात मिनिटांमध्ये ते पाकिस्तानच्या पंजाबमधील खानेवाल जिल्ह्यातील मियां चुन्नु शहराजवळ  म्हणजे पाकिस्तानमध्ये 124 कि. मी. आत पडले होते. नियमित देखभालीदरम्यान झालेल्या “तांत्रिक बिघाडामुळे” ही घटना घडली असल्याचे सांगून भारतीय अधिकाऱ्यांनी ही घटना एक अपघात असल्याचे त्वरित मान्य केले. खरंतर या घटनेमुळे गंभीर संघर्ष निर्माण होऊ शकला असता.

टीम भारतशक्ती


Spread the love
Previous articleSecurity Challenges: India In A Multipolar World
Next articleUkraine Hits Pontoon Bridges In Kursk Region In Russia With US Weapons

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here