एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांनी आज म्हणजे 01 जानेवारी 2025 रोजी भारतीय हवाई दलाच्या पश्चिम हवाई मुख्यालयाच्या प्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारली. एअर मार्शल पंकज मोहन सिन्हा यांच्याकडून एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांनी कार्यभार स्वीकारला. भारतीय हवाई दलामध्ये 39 वर्षांहून अधिक काळ उल्लेखनीय सेवा बजावून सिन्हा 31 डिसेंबर 2024 रोजी सेवानिवृत्त झाले.
भारतीय हवाई दलामध्ये 06 डिसेंबर 1986 रोजी लढाऊ वैमानिक म्हणून रूजू झालेल्या एअर मार्शल मिश्रा यांच्याकडे नवीन भूमिकेसाठी अनुभव आणि कौशल्य यांचे मोठे संचित आहे. ते पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण अकादमी, बंगलोर येथील एअर फोर्स टेस्ट पायलट स्कूल, तसेच अमेरिकेच्या एअर कमांड अँड स्टाफ कॉलेजचे आणि यूकेच्या रॉयल कॉलेज ऑफ डिफेन्स स्टडीजचे माजी विद्यार्थी आहेत.
लढाऊ विमानाचे वैमानिक म्हणून आणि प्रायोगिक चाचणी वैमानिक म्हणून एअर मार्शल मिश्रा यांना 3 हजार तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव असून सुमारे चार दशकांची अत्यंत मोलाची कारकीर्द आहे. 38 वर्षांच्या आपल्या सेवा कारकीर्दीत, एअर मार्शल मिश्रा यांनी विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. यामध्ये फायटर स्क्वॉड्रनचे कमांडिंग ऑफिसर, एअरक्राफ्ट अँड सिस्टीम टेस्टिंग एस्टॅब्लिशमेंट (एएसटीई) चे मुख्य चाचणी वैमानिक, दोन फ्रंटलाइन एअर बेसचे एअर ऑफिसर कमांडिंग, डायरेक्टर (ऑपरेशनल प्लॅनिंग अँड असेसमेंट ग्रुप), प्रधान संचालक (एएसआर) आणि सहाय्यक हवाई प्रमुख यांचा समावेश आहे. हवाई मुख्यालय (वायूभवन) मधील कर्मचारी (प्रकल्प), कमांडंट एएसटीई आणि एकात्मिक संरक्षण कर्मचारी उपप्रमुख (डॉक्ट्रीन, संस्था आणि प्रशिक्षण) म्हणूनही त्यांनी काम केले. या नवीन नियुक्तीपूर्वी ते एकात्मिक संरक्षण कर्मचारी (ऑपरेशन्स)चे उपप्रमुख होते.
एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांना सेवा कार्यकाळामध्ये ‘अतिविशिष्ट सेवा पदक’ आणि ‘विशिष्ट सेवा पदका’ने सन्मानित करण्यात आले आहे.
या महत्त्वपूर्ण नेतृत्व भूमिकेत पाऊल टाकताना, एअर मार्शल मिश्रा हे भारताच्या पश्चिम सीमांचे रक्षण करण्यासाठी जबाबदार असलेल्या वेस्टर्न एअर कमांडच्या देखरेखीसाठी त्यांचे व्यापक परिचालन कौशल्य आणि धोरणात्मक दृष्टीकोन अंगीकारतील अशी अपेक्षा आहे.
टीम भारतशक्ती