एअर मार्शल एस. पी. धारकर यांनी आज भारतीय हवाई दलाच्या उपप्रमुखपदाचा (व्हीसीएएस) पदभार स्वीकारला. 30 सप्टेंबर रोजी हवाई दल प्रमुख म्हणून बढती मिळालेल्या एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांच्या जागी हवाई दलाच्या उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी ते पूर्व हवाई दलाचे प्रमुख होते. त्यांनी डिफेन्स स्पेस एजन्सीचे (डीएसए) पहिले महासंचालक (डीजी) म्हणूनही काम केले आहे.
एअर मार्शल धारकर हे एक कुशल लढाऊ पायलट असून 3 हजार 600 हून अधिक उड्डाण तासांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. राष्ट्रीय भारतीय लष्करी महाविद्यालय डेहराडून, राष्ट्रीय संरक्षण अकादमी पुणे, वेलिंग्टन येथील संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालय आणि अमेरिकेतील हवाई युद्ध महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत.
जून 1985 मध्ये भारतीय हवाई दलात नियुक्त झालेले एअर मार्शल धारकर हे एक पात्र उड्डाण प्रशिक्षक, लढाऊ स्ट्राइक लीडर, इन्स्ट्रुमेंट रेटिंग प्रशिक्षक आणि परीक्षक आणि हवाई दलाचे परीक्षक आहेत. आपल्या उत्कृष्ट कारकिर्दीत, एअर मार्शल धारकर यांनी आघाडीच्या लढाऊ तुकडीचे तसेच लढाऊ उड्डाण प्रशिक्षण आस्थापनेचे नेतृत्व केले आहे.
डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज आणि सिकंदराबादच्या कॉलेज ऑफ एअर वॉरफेअरमध्ये मध्यम आणि वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांसाठी व्यावसायिक लष्करी शिक्षण घेण्याचा त्यांना निर्देशात्मक अनुभव आहे. या अनुभवी लढाऊ वैमानिकाने हवाई मुख्यालयात सहाय्यक हवाई दल प्रमुख (प्रशिक्षण) म्हणून देखील काम केले आहे.
टीम भारतशक्ती