‘आकाश प्राईम’ या क्षेपणास्त्र प्रणालीची 15,000 फूटांवर यशस्वी चाचणी

0

भारताच्या हवाई संरक्षण सज्जतेला चालना देत, भारतीय लष्कराने बुधवारी लडाख सेक्टरमध्ये सुमारे 15,000 फूट उंचीवर स्वदेशी बनवटीच्या ‘आकाश प्राईम’ हवाई संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी केली. अत्यंत कठीण हवामानात जमिनीवरून हवेत मार करणाऱ्या स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालींच्या कार्यान्वयनात हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.

सुमारे 4,500 मीटर उंचीवर कार्यक्षमतेने काम करण्यासाठी डिझाईन करण्यात आलेल्या या खास प्रणालीची, लष्करी हवाई संरक्षण दलाने- संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मिळून चाचणी केली. विरळ हवामान आणि गोठवणाऱ्या तापमानाच्या कठीण परिस्थितीतही या क्षेपणास्त्र प्रणालीने जलद गतीने उडणाऱ्या हवाई लक्ष्यांवर दोन अचूक हिट केले.

‘आकाश प्राईम’ ही प्रणाली लष्कराच्या बहुस्तरीय हवाई संरक्षण जाळ्याला अधिक मजबूत करणार आहे आणि तिसऱ्या व चौथ्या ‘आकाश’ रेजिमेंटमध्ये तिचा समावेश केला जाणार आहे.

या सुधारित प्रणालीने ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यानही आपली कार्यक्षमता सिद्ध केली असून, पाकिस्तान लष्कराने वापरलेल्या चिनी बनावटीच्या विमानांपासून आणि तुर्की बनावटीच्या ड्रोनपासून आलेल्या हवाई धोके यशस्वीरित्या परतवले.

मूळ आकाश प्रणालीच्या तुलनेत, ‘आकाश प्राईम’मध्ये स्वदेशी ‘ऍक्टिव्ह रेडिओ फ्रिक्वेन्सी (RF)’ सीकर आहे, जो टार्गेटवर अचूकतेने हल्ला करण्याची क्षमता लक्षणीय वाढवतो.

यात आणखी काही सुधारणांचा समावेश करण्यात आला आहे, जसे की – विशेषतः कमी तापमान आणि उच्च उंचीवरही विश्‍वासार्हतेने काम करण्याची क्षमता, तसेच विद्यमान आकाश प्लॅटफॉर्मवर आधारित सुधारित ग्राउंड सपोर्ट सिस्टम.

या यशस्वी चाचण्यांमुळे, भारतीय लष्कर आणि हवाई दल या दोघांचाही स्वदेशी प्रणालीवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. ही प्रणाली 25 ते 30 किलोमीटर अंतरावरील हवाई धोक्यांना सामोरे जाऊ शकते आणि ती 4,500 मीटर उंचीवर सहजपणे तैनात केली जाऊ शकते.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, यांनी ‘X’ प्लॅटफॉर्मवर या चाचणीचा एक व्हिडीओ शेअर करत, या यशाबद्दल गौरवोद्गार काढले. ’16 जुलै रोजी, आकाश प्राईम प्रणालीने उंचीवर दोन जलदगती मानवरहित हवाई लक्ष्यांचा यशस्वी नायनाट केल्याच्या घटनेविषयी’, त्यांनी आवर्जून नमूद केले.

‘आकाश प्राईम’ ही हवाई संरक्षण प्रणालीची पुढील पिढी असून, ही एक सुधारित आणि युद्धात सिद्ध झालेली प्रणाली आहे, जी आधुनिक आणि अति-उंचीवरील लष्करी मोहिमांसाठी खास सक्षम आहेय

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleIndia Successfully Test-Fires Prithvi-II and Agni-I Ballistic Missiles
Next articleTejas Mk1A फायटरची पहिली ‘विंग असेंब्ली’ HAL कडे सुपूर्द करण्यात आली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here