अटकेतील भारतीय नौदलाच्या सर्व 8 माजी सैनिकांची कतारकडून सुटका

0

कतारमध्ये भारतीय नौदलाचे आठ सैनिक अटकेत होते. या आठपैकी सात सैनिक भारतात परतले आहेत. या भारतीयांना तिथे फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र यावर्षीच्या जानेवारीत या शिक्षेमध्ये बदल करून विविध कालावधीसाठीच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. या भारतीयांना नेमक्या कोणत्या कारणांसाठी अटक झाली हे कधीही उघड केले गेले नाही.

सरकारकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “कतारमध्ये ताब्यात घेतलेल्या दाहरा ग्लोबल कंपनीसाठी काम करणाऱ्या आठ भारतीय नागरिकांच्या सुटकेचे भारत सरकार स्वागत करते. आठपैकी सातजण भारतात परतले आहेत. या नागरिकांची सुटका आणि त्यांना मायदेशी पाठवण्यासाठी कतारच्या अमीरने घेतलेल्या निर्णयाची आम्ही प्रशंसा करतो.”

भारतात परतलेले हे सर्वजण माजी नौदल अधिकारी आहेत. ते दाहरा ग्लोबल या खासगी कंपनीत काम करत होते. कंपनीने मार्च 2023 मध्ये दोहा येथील कार्यालये बंद केली. हेरगिरीच्या आरोपाखाली कतारच्या गुप्तचर संस्थेने या माजी सैनिकांना ऑगस्ट 2022मध्ये अटक केल्याचे वृत्त आहे.

या भारतीयांना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेमुळे वादळ निर्माण झाले होते. भारत-कतार यांच्यातील संबंध दृढ आणि मजबूत असल्याने, कायदेशीर तोडगा काढण्याचा भारत सरकारचा प्रयत्न यशस्वी होईल अशीच अपेक्षा होती. भारतीयांची सुखरूप झालेली सुटका आणि ही संपूर्ण घटना आपण ज्याप्रमाणे हाताळली, त्यामुळे भारताचा हा एक मोठा राजनैतिक विजय झाल्याचे मानता येईल. सुटकेच्या या संपूर्ण प्रक्रियेतील अजून एक महत्त्वाचा घटक म्हणजे पुढील 20 वर्षांसाठी 78 अब्ज अमेरिकन डॉलरच्या LNG (लिक्विफाइड नॅचरल गॅस) खरेदीच्या करारावर दोनही देशांकडून याच आठवड्यात स्वाक्षरी करण्यात आली.

(अनुवाद : आराधना जोशी)


Spread the love
Previous articleChief Of Army Staff Departs For USA
Next articleGovt Looking For Ethical Hackers To Test India’s Critical Information Infra
Brigadier SK Chatterji (Retd)
Editor, Bharatshakti.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here