जामनगरचा छोटा विमानतळ, जिथे दिवसाला सरासरी फक्त पाच नागरी विमानांची जा ये असते, तिथे मुकेश अंबानीच्या मुलाच्या साखरपुड्याच्या निमित्ताने सुमारे 600 विमान उड्डाणे झाली आणि त्यासाठी सर्वाधिक मदत झाली ती भारतीय हवाई दलाची.
लष्करी विमानतळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जामनगर विमानतळावर एक छोटे नागरी टर्मिनलदेखील आहे. 23 फेब्रुवारी ते 4 मार्च या पाच दिवसांच्या काळात तिथे भूतो न भविष्यती अशी वाहतूक कोंडी बघायला मिळाली.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नापूर्वीच्या सोहळ्यासाठी या विमानतळावर 24×7 विमान वाहतूक सुलभ करण्यासाठी रिलायन्स समूहाने संरक्षण सचिवांना मदतीची विनंती केली.
संरक्षण सचिवांच्या विनंतीवरून, हवाई दल प्रमुखांनी जामनगर हवाई तळावरून चोवीस तास उड्डाण करण्याची परवानगी मंजूर केली. या कार्यक्रमादरम्यान विमानतळावर सुमारे 30 ते 40 विमानांची वाहतूक अपेक्षित होती. मात्र कार्यक्रमाच्या मुख्य पाच दिवसांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्हींसाठी 600 हून अधिक उड्डाणांची नोंद झाली.
या ठिकाणी असणारी धावपट्टी ही मुख्यत्वे करून लढाऊ विमानांसाठी असून, नागरी विमानांच्या उड्डाणांसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) यांच्याशी समन्वय साधला जातो. एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) नियमित संरक्षण सेवांसाठी कार्यरत विमानांबरोबर असंख्य शेड्यूल्ड आणि नॉन-शेड्यूल्ड विमानांचे व्यवस्थापन करते.
जामनगर हे कच्छच्या आखाताच्या दक्षिणेस गुजरातमधील पाचवे सर्वात मोठे शहर असून सर्वात मोठ्या तेल शुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल संकुलांपैकी एक आहे. एएआयने या विमानतळाचे तात्पुरत्या आंतरराष्ट्रीय विमानतळात रुपांतर केले होते.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पडावा यासाठी, आयएएफच्या कर्मचाऱ्यांनी रस्ते, टॅक्सी ट्रॅक आणि पिट स्टॉप बांधले, ज्यामुळे वाहतूक सुरळीत होईल आणि प्रवासी तसेच मालवाहतूक कार्यक्षमतेने तिथे उतरवता येईल.
याशिवाय, नॉन शेड्यूल विमानांसाठी मुंबई विमानतळ बंद केल्याने अधिक गुंतागुंत निर्माण झाली. त्यामुळे उड्डाणविषयक सुरक्षेच्या समस्या टाळण्यासाठी आयएएफच्या तांत्रिक क्षेत्राचा वापर करणे आवश्यक ठरले.
रिलायन्सकडून पुरवण्यात आलेले मनुष्यबळ कमी पडत असताना भारतीय हवाई दलाने देखील विमानांची वाहतूक अखंडपणे सुरू रहावी यासाठी पावले उचलली. विमानतळ प्राधिकरणाला तात्पुरती कस्टम्स, इमिग्रेशन आणि क्वारंटाइन काउंटर्स उभारावी लागली, तसेच सुमारे 45 दिवसांत विमानतळाचे नूतनीकरण करावे लागले.
या कार्यक्रमाला बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग, इवांका ट्रम्प, शाहरुख खान, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि सचिन तेंडुलकर यांसारखे आंतरराष्ट्रीय ख्याती असणारे पाहुणे उपस्थित होते. या प्रसंगी जागतिक पॉपस्टार रिहानाने अनंत आणि राधिकासाठी आपला कार्यक्रम सादर केला. प्रसारमाध्यमांच्या अंदाजानुसार रिहानाला या कार्यक्रमासाठी 8 ते 9 दशलक्ष डॉलर्स किंवा 66 ते 74 कोटी रुपये देण्यात आले.