‘सीसीएस’ची मंजुरी: देशांतर्गत विकास व उत्पादनाचा मार्ग मोकळा
दि. ०८ मार्च: शत्रूच्या हवाई टेहेळणीला (रडार) चकवा देण्याची व दृष्टिपथात न येण्याची क्षमता असलेल्या पाचव्या पिढीच्या “ऍडव्हान्स मिडीयम कॉम्बॅट एअरक्राफ्ट’च्या (एएमसीए) देशांतर्गत विकास व उत्पादनाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीने (सीसीएस) गुरुवारी मंजुरी दिली. त्यामुळे ‘स्टेल्थ’ क्षमता असलेले विमान देशांतर्गत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बनविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिका, रशिया, चीन व तुर्कीए या देशांनीच आत्तापर्यंत स्टेल्थ विमानाचे तंत्रज्ञान विकसित केले आहे.
देशाच्या हवाई सुरक्षेसाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या या विमानाच्या आरेखन आणि संशोधन व विकास प्रक्रियेत संरक्षण संशोधन व विकास संस्थेची (डीआरडीओ) ‘एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी’ (एडीए) ही हवाई तंत्रज्ञान विषयक संस्था महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. तर, ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’ (एचएएल) व इतर खाजगी कंपन्या या विमानाच्या उत्पादनाची जबाबदारी उचलतील. भारताला पाचव्या पिढीची अत्याधुनिक विमाने विकसित करण्यात यश आल्यास भारत असे तंत्रज्ञान विकसित करण्याची क्षमता असलेल्या काही मोठ्या देशांच्या पंक्तीत समाविष्ट होऊ शकतो. आत्तापर्यंत अमेरिका (एफ/ ए -२२ रॅप्टर्स), रशिया (एसयु-५७), चीन (चेंगडू जे-२०) यांनीच हे यश मिळवलेले आहे. तुर्कीएनेही ‘कान’ हे त्यांचे पाचव्या पिढीचे विमान देशांतर्गत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकसित केल्याचा दावा केला आहे.
चार वर्षांत प्रतिरूप चाचणी
प्रस्तावित पाचव्या पिढीच्या विमानाच्या आरेखनाची पाहणी २०२२ मध्ये झाली होती. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीच्या मंजुरीसाठी पुढील बाबी रखडल्या होत्या. अखेर, दीड वर्षांनी सुरक्षाविषयक समितीने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर पुढील चार वर्षात तो पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर येत्या वर्षभरात त्याची प्राथमिक उड्डाण चाचणी होण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. हे प्रस्तावित विमान ‘एएमसीए-एमके १’ सध्या उपयोगात असलेले ९०-केएन हे इंजिन वापरून बनवण्यात येणार आहे. (अमेरिकेचे जीई-४१४ इंजिन) तर, ‘एएमसीए-एमके २’ हे विमान देशांतर्गत विकसित केलेले अधिक क्षमतेचे ११०-केएल इंजिन वापरून विकसित करण्यात येईल.
हवाईदल १२६ विमाने घेणार
हवाईदल पाचव्या पिढीची १२६ ‘एएमसीए’ विमाने घेण्याच्या विचारात आहे. त्यामुळे १८ विमानांचा समावेश असलेल्या सात ‘स्क्वाड्रन’ उभारणे शक्य होणार आहे. या पैकी दोन ‘स्क्वाड्रन’ या ‘एएमसीए-एमके १’ विमानांच्या असतील, तर उर्वरित ‘एएमसीए-एमके २’ या विमानाच्या असतील. मार्क-२ विमानाच्या निर्मितीत देशांतर्गत विकसित केलेल्या इंजिनाचा समावेश करण्यात येणार आहे. फ्रान्सची ‘सॅफ्रन’, अमेरिकेची ‘जीई’ व इंग्लंडची ‘रोल्स रॉयल्स’ या कंपन्याही नवीन इंजिन विकसनाच्या स्पर्धेत आहेत. ‘एएमसीए’ ध्वनीच्या वेगाने उड्डाण करू शकेल अशा पद्धतीने विकसित करण्यात येणार आहे. अत्यंत अत्याधुनिक अशी उड्डाण यंत्रणा, देशांतर्गत निर्मित ‘एईएसए रडार’, बाह्य व अंतर्गत शस्त्र वाहून नेण्याची क्षमता, ही या विमानाची वैशिष्ट्ये असतील. या विमानाच्या प्रतिरूपाची उड्डाण चाचणी झाल्यानंतर त्याचे प्रत्यक्ष उत्पादन सुरू होण्यास दहा वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे २०३५ च्या दरम्यान ही विमाने हवाई दलाच्या ताब्यात समाविष्ट होऊ शकतात, असे संरक्षण मंत्रालयातील एका सूत्राने सांगितले.
सध्या हवाई दलाकडे लढाऊ विमानांच्या ३१ ‘स्क्वाड्रन’ आहेत. चीन आणि पाकिस्तान या दोन्ही आव्हानांचा विचार करता भारताला ४२.५ ‘स्क्वाड्रन’ची गरज आहे. त्यामुळे ‘तेजस-मार्क१ व ‘तेजस-मार्क २’ यांच्याबरोबरच ‘एएमसीए’चाही हवाई दलात समावेश करण्यात येणार आहे. ही सर्व प्रक्रिया निर्धारित वेळापत्रकानुसार पूर्ण झाल्यास १८० ‘तेजस-मार्क १’ ही लढाऊ विमाने २०३२ च्या सुमारास हवाईदलात समाविष्ट होतील. त्याच्याबरोबर ‘तेजस-मार्क २’ व ‘एएमसीए’ या विमानांचे हवाईदलाकडे हस्तांतरण करण्याची प्रक्रियाही सुरू होईल. मात्र, हे सर्व निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’ला (एचएएल) उत्पादन क्षमता वाढवावी लागेल.
ध्रुव हेलिकॉप्टरच्या खरेदीलाही मंजुरी
मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीने ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’कडून (एचएएल) ध्रुव-मार्क ३ ही ३४ अत्याधुनिक हलकी हेलिकॉप्टर (एएलएच) खरेदी करण्यासही मान्यता दिली आहे. त्यासाठी आठहजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या पैकी २५ हेलिकॉप्टर लष्करासाठी, तर नऊ हेलिकॉप्टर तटरक्षक दलासाठी खरेदी करण्यात येणार आहेत. सध्या सशस्त्र दलांकडे पाच टन वजनाच्या ३०० हेलिकॉप्टरचा ताफा आहे.
(अनुवाद: विनय चाटी)