प्रभावी उभयचर लँडिंग ऑपरेशन्ससह, त्रि-सेवा सराव ‘त्रिशूल’ची भव्य सांगता

0
त्रिशूल
उभयचर दलांच्या ऑपरेशनल तयारीचे मूल्यांकन करताना, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ

गुरूवारी, सौराष्ट्रच्या किनारपट्टीवर प्रभावी उभयचर लँडिंग ऑपरेशन्ससह, महत्वाकांक्षी त्रि-सेवा सराव ‘त्रिशूल’ची सांगता झाली. यावेळी, भारतीय सशस्त्र दलांनी संयुक्त लढाऊ क्षमतेचे शक्तिशाली प्रदर्शन केले. भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या वरिष्ठ कमांडर्सनी सारावाच्या अंतिम टप्प्याचा आढावा घेतला. या सरावामुळे, भारताच्या बहु-क्षेत्रीय समाकलन आणि ऑपरेशनल सुसंगतीच्या प्रगतीची उभारणी स्पष्ट झाली.

लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, जे दक्षिण कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ आहेत, त्यांनी माधवपूर समुद्रकिनाऱ्यावर सरावाच्या अंतिम कार्यवाहीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी एकात्मिक भूदल, हवाई दल आणि सागरी घटकांनी समर्थन दिलेल्या समन्वित लँडिंग्सचे निरीक्षण केले. लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी, वाइस ॲडमिरल कृष्ण स्वामिनाथन (फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, पश्चिम नौदल कमांड) आणि एअर मार्शल नागेश कपूर (एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, दक्षिण पश्चिम एअर कमांड) यांच्यासोबत, ‘INS जलाश्व’ या नौदलाच्या जहाजावर उपस्थित राहत, उभयचर दलांच्या परिचालन सज्जतेचे निरीक्षण केले.

याशिवाय त्यांनी, समुद्रकिनाऱ्यावरील कार्यवाहीच्या प्रारंभिक टप्प्यातील लँडिग ऑपरेशन्सचीही पाहणी केली, ज्यात लँडिंग क्राफ्ट मेकनाइज्ड नावाच्या जहाजातून, पहिली पायदळ तुकडी रणगाड्यासह किनाऱ्यावर उतरली. सरावादरम्यान, एक टी-72 रणगाडा LCM जहाजातून बाहेर पडला, यावेळी आयएनएस जलाश्व हे मोठे जहाज मागे उभे होते. याव्यतिरिक्त, आकाशात जग्वार आणि एसयू-30 एमकेआय या लढाऊ विमानांनी अचूक हवाई कसरती केल्या. यावेळी उभयचर ब्रिगेड आपल्या पूर्ण क्षमतेने कार्यरत होती.

या सरावाने भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि भारतीय वायुसेनेमध्ये अखंड समन्वय दर्शविला. यामुळे वास्तववादी युद्धजन्य परिस्थितीत समुद्रातून जमिनीवर युद्धशक्ती प्रदर्शित करण्याची तिनही दलांची क्षमता प्रमाणित झाली.

याच दरम्यान, आयएनएस विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेवर समांतर, हाय-प्रोफाइल आढावा घेण्यात आला. तिन्ही कमांडर्स-इन-चीफनी, चालू बहु-डोमेन युद्धसरावाचा भाग म्हणून, विमानवाहू नौकेवरून होणाऱ्या उड्डाण कारवाया आणि समुद्रात जहाजांना होणारा इंधन पुरवठा याचे निरीक्षण केले.

दक्षिण कमांड, पश्चिमी नौदल कमांड आणि दक्षिण पश्चिम एअर कमांड यांच्या महत्वपूर्ण सहभागाने, ‘त्रिशूल’ सरावाचे नेतृत्व केले. या सरावात पश्चिम किनारपट्टी, राजस्थानचे वाळवंटी पट्टे, तसेच गुजरातचे कच्छ आणि खाडी प्रदेश यांसारख्या विस्तृत क्षेत्रांमध्ये व्यापक कसरती करण्यात आल्या. याशिवाय, उत्तर अरबी समुद्रातील उभयचर ऑपरेशन्स हा या त्रि-सेवा सरावाचा एक महत्त्वाचा घटक होता.

भारतीय तटरक्षक दल, सीमा सुरक्षा दल आणि इतर केंद्रीय संस्थांनी देखील या सरावात भाग घेतला होता, ज्यामुळे आंतर-संस्था समन्वय आणि बहु-स्तरीय प्रतिसाद क्षमता वृद्धींगत झाल्या. या सरावामध्ये, बहु-डोमेन परिचालन प्रक्रियांमध्ये समन्वय साधणे, प्लॅटफॉर्मची आंतर-कार्यक्षमता वाढवणे, सेवांमधील नेटवर्क एकत्रीकरण मजबूत करणे आणि संयुक्त परिणाम-आधारित ऑपरेशन्स प्रमाणित करणे या सर्व मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले.

पारंपरिक लढाऊ क्षमतांपलीकडे जात, ‘त्रिशूल’ सरावादरम्यान इलेक्ट्रॉनिक युद्ध, सायबर ऑपरेशन्स, ड्रोन आणि ड्रोन विरोधी युद्ध, गुप्तचर यंत्रणा, पाळत आणि टेहळणी तसेच एकात्मिक हवाई संरक्षण सरावांचाही समावेश होता.

या सरावादरम्यान प्रदर्शित केलेल्या, व्यावसायिक आणि संयुक्त कार्यक्षमतेबद्दल लेफ्टनंट जनरल सेठ यांनी प्रशंसा केली. त्यांनी सांगितले की, “त्रिशूलच्या यशस्वी आयोजनाने भारताची संयुक्त युद्ध सज्जता, बहु-डोमेन क्षमता, तंत्रज्ञान आत्मसात करण्याची क्षमता आणि सशस्त्र दलांची ‘आत्मनिर्भर भारताप्रती’ असलेली वचनबद्धता पुन्हा अधोरेखित झाली.”

भूदल, नौदल आणि हवाई दलाच्या संपूर्ण श्रेणीतील एकत्रीकरणाच्या प्रदर्शनासह, या त्रि-सेवा सरावाची सांगता झाली. या सरावाद्वाके समन्वित संयुक्त मारक शक्ती आणि अखंड परिचालन समन्वयाद्वारे, भौतिक आणि आभासी अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये प्रभुत्व मिळवण्याची भारताची सज्जता अधोरेखित झाली.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleINVAR क्षेपणास्त्रांसाठी MoD आणि BDL यांच्यात 2,095.70 कोटींचा करार
Next articleढाक्यातील तणाव वाढताच युनूस यांची दुहेरी मतदानाची घोषणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here