
संरक्षणदलप्रमुख जनरल अनिल चौहान यांचे प्रतिपादन
दि. २१ मे: अग्निवीर हे केवळ सैनिक नाहीत, तर नेते, नवोन्मेषक आणि देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षणकर्ते देखील आहेत, असे. प्रतिपादन संरक्षणदलप्रमुख (सीडीएस ) जनरल अनिल चौहान यांनी सोमवारी बेळगावी येथे केले. बेळगावी येथील ‘मराठा रेजिमेंटल सेंटर आणि एअरमेन ट्रेनिंग स्कूल’ (एटीएस) येथे प्रशिक्षण घेत असलेल्या अग्निवीरांशी संवाद साधताना जनरल चौहान यांनी भारतीय सैन्यदलातील ‘अग्निवीरांच्या’ भूमिकेबद्दल आपले मत व्यक्त केले.
‘अग्निवीर म्हणून लष्करात सेवा करण्याचा निर्णय तुम्ही घेतला, या तुमच्या निर्णयामुळे देशाप्रती असलेली तुमची समर्पण भावना दिसून येते. भारतीय लष्कराने ‘अग्निवीर’ योजना उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून सुरु केली आहे. त्यामुळे अग्निवीरांची भारतीय सैन्यदलांतील भूमिकाही महत्त्वाची आहे,’ असेही जनरल चौहान यांनी अधोरेखित केले. ‘मराठा रेजिमेंटल सेंटर’मध्ये प्रशिक्षणासाठी आल्याबद्दल त्यांनी या अग्निवीरांचे कौतुक केले आणि सशस्त्रदलांची निवड करून येथे प्रशिक्षणासाठी येणे हाच तुमचा राष्ट्राप्रती असलेल्या असाधारण कर्तव्याचा दाखला आहे, अशा शब्दांत त्यांनी प्रशिक्षणासाठी आलेल्या अग्निवीरांची प्रशंसा केली.
सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना भेडसावणाऱ्या वैयक्तिक समस्या आणि आव्हानात्मक वातावरणात काम करताना त्यांना सहन कराव्या लागणाऱ्या अडचणींची दाखलही जनरल अनिल चौहान यांनी त्यांच्या भाषणात घेतली. ‘अनेक आव्हाने असूनही अग्निवीरांना त्यांचा हा प्रवास हितकारक वाटेल आणि देशसेवा करताना प्रत्येक टप्प्यावर त्यांचे व्यक्तिमत्व आणि अभिमानाची भावना उंचावेल,’ अशा शब्दांत जनरल चौहान यांनी अग्निवीर आणि त्यांच्या कुटुंबियांना आश्वस्त केले. या वेळी त्यांनी आधुनिक युद्धाच्या बदलत्या स्वरूपाबाबतही नव्याने लष्करात भरती झालेल्या अग्निवीरांना मार्गदर्शन केले. युद्धाचे बदलते स्वरूप अधिक आधुनिक युद्ध केवळ पारंपरिक युद्धापुरतेच सीमित राहिले नाही. त्यात तंत्रज्ञानामुळे मोठे बदल झाले आहेत, असे ते म्हणाले. सायबर युद्ध, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अपारंपरिक युद्ध यामुळे भविष्यातील संघर्षांची जटिलता आणि अनिश्चितता अधोरेखित झाली आहे. या सर्व बाबी आता युद्धाचा अविभाज्य भाग आहेत. त्यांनी तंत्रज्ञान एकत्रीकरण आणि सातत्यपूर्ण अध्ययन आवश्यक असल्याचे सांगून, अत्याधुनिक प्रगतींशी सुसंगत राहण्याबरोबरच, युद्धाप्रति अभिनव दृष्टीकोन प्रदर्शित करण्याची गरज आहे, असेही त्यांनी नमूद केले.
जनरल चौहान म्हणाले, की शिकणे ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. विशेषत: सतत बदलत्या आणि गतिमान युद्धाच्या पार्श्वभूमीवर तंत्रज्ञानाचा अवलंब आणि कौशल्यात सातत्याने वाढ करण्याची जबाबदारीची भावना आवश्यक आहे. या वेळी त्यांनी प्रशिक्षणार्थींना व्यावसायिक उत्कर्ष साधताना सचोटी, शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त आणि एकजुटीची मूल्ये जोपासण्याचा सल्लाही दिला.
विनय चाटी
(पीआयबी)