‘ब्रिक्स’ गटात सहभागी होण्याची इच्छा श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री अली साबरी यांनी सोमवारी व्यक्त केली. भारत या गटाचा हिस्सा बनल्यानंतर भाग हा गट एक “चांगली संस्था” बनला आहे, असे म्हणत त्यांनी भारताचे कौतुक केले. ते पुढे म्हणाले की, आम्ही जेव्हा औपचारिकपणे ‘ब्रिक्स’ गटात सहभागी होण्यासाठी अर्ज करू तेव्हा श्रीलंका प्रथम भारताशी संपर्क साधेल.
आम्ही ब्रिक्ससाठी उत्सुक आहोत. तसेच, मला वाटते की मंत्रिमंडळाने त्याकडे लक्ष देण्यासाठी आणि आम्हाला शिफारस करण्यासाठी एक उपसमिती नेमली होती. आम्हाला ते पाहायचे आहे कारण आम्हाला अनेक पर्याय हवे आहेत. कोणाला नको आहे? त्यामुळे विशेषतः भारत हा त्याचा एक भाग असल्याने, ब्रिक्स ही एक चांगली संस्था आहे “, असे सबरी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
“आम्ही ज्या पहिल्या देशाशी बोलणार आहोत तो भारत आहे आणि आम्हाला ब्रिक्सपर्यंत पोहोचण्यासाठी भारताचा पाठिंबा मागत आहोत. आणि मग अर्थातच मला रशियातील ‘ब्रिक्स“च्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे मला आशा आहे की, मी तिथे असेन आणि मग आपण त्याचे महत्त्व किती याचा विचार करू. आणि हो, सध्या तुम्ही मला विचाराल तर मला वाटते की आपण ब्रिक्सकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे,” असे ते पुढे म्हणाले.
1 जानेवारी 2024 रोजी, रशियाने ब्रिक्सचे अध्यक्षपद स्वीकारले. ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका यांच्याबरोबर इजिप्त, इथिओपिया, इराण आणि संयुक्त अरब अमिराती हे चार नवीन सदस्य या आंतरसरकारी संस्थेचे सभासद आहेत.
इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती हे पूर्ण वेळ नवीन सदस्य म्हणून ब्रिक्समध्ये सामील झाले आहेत. यामुळे संघटनेच्या वाढत्या अधिकाराचे आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींमधील त्याच्या भूमिकेचे एक प्रतीक म्हणता येईल.
16 जून 2009 रोजी ‘ब्रिक’ ची स्थापना झाली, त्यावेळी त्यांच्यातील सदस्य देशांच्या नावातील पहिल्या अक्षरावरून त्याचे नाव ‘ब्रिक’ (BRIC) ठेवले गेले. ब्राझील (B), रशिया (R), भारत (I), चीन (C) हे ब्रिक्सचे सुरूवातीचे सदस्य होते. डिसेंबर 2010 मध्ये या गटात दक्षिण आफ्रिका (S) हा देश सहभागी झाला. त्यानंतर या समूहाचे नाव बदलून ‘ब्रिक्स’ (BRICS) करण्यात आले. इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती हे देखील नवीन सदस्यांमध्ये सामील झाले आहेत. यंदाच्या 1 जानेवारीपासून रशियाने ब्रिक्सच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला आहे.
भारताकडून श्रीलंकेसाठी एखाद्या उच्चस्तरीय दौऱ्याचे आयोजन व्हावे अशी तुमची इच्छा आहे का? असे विचारले असता श्रीलंकेच्या मंत्र्यांनी सांगितले की, त्यांच्या राष्ट्रपतींलनी अलीकडेच भारताला भेट दिली होती आणि आता ते भारतीय पंतप्रधान आणि उच्चस्तरीय शिष्टमंडळाचे स्वागत करण्यासाठी उत्सुक आहेत.
“आम्ही शक्य तितक्या लवकर भारतीय पंतप्रधानांच्या दौऱ्याची वाट पाहत आहोत कारण श्रीलंकेचे अध्यक्ष मागच्या वर्षी भारत भेटीवर येऊन गेले आहेत. त्यामुळे आता भारतीय पंतप्रधानांनी श्रीलंकेचा दौरा करणे जास्त उचित ठरेल. अर्थात यासाठी सगळ्या गोष्टी जुळून येणेही महत्त्वाचे आहे,” असे ते म्हणाले.
श्रीलंका आणि भारत यांच्यातील चांगल्या संबंधांची प्रशंसा करताना श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री अली साबरी म्हणाले की, भारत आर्थिक सुबत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. ही गोष्ट केवळ या प्रदेशासाठीच नव्हे तर श्रीलंकेसारख्या देशांसाठीही चांगली आहे.
ते पुढे म्हणाले, “उभय देशांचे खूप चांगले संबंध आहेत. मला वाटते की पूर्वीपेक्षा ते अधिक चांगले झाले आहेत. दोन्ही देशांमध्ये विविध गोष्टींसाठी भागीदारी करण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या, आम्ही समान फायद्यासाठी एकमेकांशी जोडले जाण्याचा प्रयत्न करत आहोत. मला वाटते की यामुळे भारतीय लोकांना कोलंबोला भेट देण्यासाठी, ते पाहण्यासाठी आणखी अनेक मार्ग खुले होतील.”
आराधना जोशी
(वृत्तसंस्थेच्या इनपुट्सवरून)