लष्करी वैद्यकीय सेवा-‘आयआयटी हैदराबाद’ दरम्यान सामंजस्य करार
दि. ३१ मे: देशाच्या सीमाभागांत दुर्गम ठिकाणी तैनात असलेल्या सैनिकांवर आपत्कालीन स्थितीत तातडीने उपचार करता यावेत, यासाठी ड्रोन आधारित वैद्यकीय सेवा आणि रुग्ण वाहतूक करण्याबाबत व त्यावरील संशोधनाबाबत लष्करी वैद्यकीय सेवा (आर्म्ड फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेस) आणि हैदराबाद येथील भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी-हैदराबाद) यांच्यात परस्पर सामंजस्य करारवर स्वाक्षरी करण्यात आली. लष्करी वैद्यकीय सेवेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल दलजीतसिंग आणि आयआयटी-हैदराबादचे संचालक प्रा. बी मूर्ती यांनी या करारावर स्वाक्षरी केली.
#MoU signed b/n @dgafms & @IITHyderabad to collaborate on research & training & foster innovation in medical devices & address health issues for soldiers in varied terrains. Signed by DG AFMS Lt Gen Daljit Singh & Director IIT Hyderabad Prof BS Murty.
More:https://t.co/dOKfSmM0Ka pic.twitter.com/98RLy6o5ap— A. Bharat Bhushan Babu (@SpokespersonMoD) May 30, 2024
भारताच्या सशस्त्रदलांमधील जवान आणि अधिकाऱ्यांना उत्तम वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्यविषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठी नाविन्यपूर्ण वैद्यकीय उपकरणे विकसित करण्याच्या उद्देशाने नावोन्मेश आणि संशोधनास चालना देण्याचा निर्धार या सामंजस्य करारात करण्यात आला आहे. त्यासाठी आयआयटी-हैदराबादमधील जैव तंत्रज्ञान, जैव वैद्यकीय अभियांत्रिकी आणि जैव माहिती तंत्रज्ञान हे विभाग सशस्त्र दलांना भेडसावणाऱ्या वैविध्यपूर्ण वैद्यकीय आव्हानांचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेले तांत्रिक कौशल्य प्रदान करतील, असे या करारात नमूद करण्यात आले आहे. या करारान्वये सहकार्याच्या प्रमुख क्षेत्रांमध्ये ड्रोन-आधारित रुग्ण वाहतूक, टेलिमेडिसिनच्या क्षेत्रातील नवोन्मेष, वैद्यकीय क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि नॅनो तंत्रज्ञानातील प्रगती यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त, सामंजस्य करारानुसार विद्यार्थी विनिमय कार्यक्रम (स्टुडन्ट एक्सचेंज) पदवीधरांसाठी अल्प-मुदतीचे अभ्यासक्रम आणि शिक्षकवृंद विनिमय (टीचर एक्सचेंज) उपक्रम देखील राबवण्यात येणार आहे.
‘लष्करी सेवेतील जवानांच्या विविध आरोग्यविषयक समस्यांवर वैद्यकीय सेवा पुराविण्यासाठी लष्करी वैद्यकीय सेवा वचनबद्ध आहे. आयआयटी-हैदराबाद सारख्या संस्थांकडे अत्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणांची उपलब्धता आहे. त्यामुळे संशोधन आणि प्रशिक्षणासाठी उपयोग होऊ शकतो. त्यामुळे अंतिमतः सैनिकांच्या आरोग्यविषयक समस्यांचे निराकरण होण्याच्या दृष्टीने उपयोग होणार आहे. त्यामुळे आयआयटी-हैदराबाद आणि लष्करी वैद्यकीय सेवा यांच्यातील करार महत्त्वाचा आहे, असे लेफ्टनंट जनरल दलजीतसिंग यांनी सांगितले. सशस्त्रदलांनी त्यांच्या वैद्यकीय समस्यांचे स्वरूप आमच्यासमोर मांडले. त्या समस्यांवर आम्ही काम सुरु केले असून, सैनिकांना उत्तम आणि तत्पर वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असे आयआयटी-हैदराबादचे संचालक प्रा. बी मूर्ती यांनी सांगितले. लष्करी कर्मचाऱ्यांचे आरोग्य संवर्धन आणि कल्याण साधण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान तसेच संशोधनाचा लाभ घेण्याच्या मार्गावर हे सहकार्य एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
विनय चाटी
(पीआयबी इनपुट्ससह)