लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या यूएई, श्रीलंका दौऱ्याला सुरुवात

0

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि श्रीलंकेच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर रवाना झाले असून, द्विपक्षीय लष्करी सहकार्य मजबूत करण्याच्या मार्गांचा शोध घेणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे.

भारतीय लष्कराने म्हटले आहे की, “हा दौरा परस्पर सामंजस्य वाढवणे, समान हिताच्या क्षेत्रांमधील सहकार्य दृढ करणे आणि दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संरक्षण सहकार्य अधिक प्रगत करण्याच्या सामायिक वचनबद्धतेला अधोरेखित करतो.”

लष्करप्रमुखांचा हा दौरा आखाती प्रदेशातील वेगवान घडामोडींच्या पार्श्वभूमीवर होत आहे, ज्यामध्ये येमेनमधील परिस्थितीवरून यूएई आणि सौदी अरेबिया यांच्यातील वाढत्या तणावाचाही समावेश आहे. यूएईच्या प्रेसिडेन्शिअल गार्डचे कमांडर मेजर जनरल अली सैफ हुमैद अलकाबी, यांनी भारताला भेट दिल्यानंतर काही आठवड्यांतच जनरल द्विवेदी यांचा हा यूएई दौरा होत आहे.

जनरल द्विवेदी, या प्रभावशाली आखाती देशाच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांशी व्यापक चर्चा करतील.

भारतीय लष्कराने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “या वास्तव्यादरम्यान, लष्करप्रमुख यूएई सशस्त्र दलाच्या वरिष्ठ नेतृत्वाची भेट घेतील, ज्यात यूएई लँड फोर्सचे कमांडर यांच्या भेटीचाही समावेश आहे. तसेच ते यावेळी यूएई लष्कराची रचना, भूमिका आणि क्षमतांबाबत माहिती घेतील.”

यादरम्यान, ते प्रमुख लष्करी आस्थापनांना भेट देतील आणि तेथील अधिकारी आणि जवानांशी संवाद साधतील, जे भारत आणि यूएई यांच्यातील वाढत्या संरक्षण भागीदारीवर प्रकाश टाकते. यामध्ये यूएई नॅशनल डिफेन्स कॉलेजच्या भेटीचाही समावेश आहे, जिथे लष्करप्रमुख सर्व अधिकाऱ्यांना संबोधित करतील. या कार्यक्रमांचा उद्देश दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांमधील द्विपक्षीय संरक्षण सहकार्य, व्यावसायिक लष्करी देवाणघेवाण आणि धोरणात्मक समज अधिक वाढवणे हा आहे.

डिसेंबर 2020 मध्ये, तत्कालीन लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांनी केलेल्या यूएई दौऱ्यानंतर, भारत आणि यूएई मधील लष्करी सहकार्याला मोठी गती मिळाली, ही त्यांची पहिलीच यूएई भेट होती.

यूएईच्या दौऱ्यानंतर, जनरल द्विवेदी 7 ते 8 जानेवारी दरम्यान श्रीलंकेला भेट देतील. तिथे ते श्रीलंकेच्या लष्कर प्रमुखांसह वरिष्ठ लष्करी आणि नागरी नेतृत्वाची, तसेच संरक्षण उपमंत्री आणि संरक्षण सचिवांची भेट घेतील. यावेळी प्रशिक्षण, क्षमता बांधणी आणि प्रादेशिक सुरक्षा या विषयांवर चर्चा केली जाईल.

श्रीलंका दौऱ्यात, लष्करप्रमुख ‘डिफेन्स सर्व्हिसेस कमांड अँड स्टाफ कॉलेज’मधील अधिकाऱ्यांना संबोधित करतील आणि ‘आर्मी वॉर कॉलेज, बुट्टाला’ येथील अधिकारी आणि प्रशिक्षणार्थींशी संवाद साधतील.

जनरल द्विवेदी आयपीकेएफ (IPKF) युद्ध स्मारकाला भेट देऊन, श्रीलंकेत सेवा बजावताना बलिदान दिलेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करतील.

निवेदनानुसार, लष्करप्रमुखांचा हा यूएई आणि श्रीलंकेचा दौरा, हिंद महासागर क्षेत्र आणि पश्चिम आशियातील मित्र राष्ट्रांशी संरक्षण सहकार्य मजबूत करणे, परस्पर विश्वास जोपासणे आणि एकमेकांशी सुसंगतपणे काम करण्याची क्षमता वाढवणे, याबाबतची भारताची वचनबद्धता अधोरेखित करतो.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleपाकिस्तानकडून 600 किमी पल्ल्याच्या ‘तैमूर’ क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी
Next articleस्पष्टीकरण: ऑपरेशन ॲब्सोल्यूट रिझॉल्व्ह नक्की कसे पार पडले?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here