कैरो/दोहाः इस्रायल आणि हमास हे दोघेही आपापल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने गाझा युद्धबंदीच्या शक्यता रविवारी मावळली. ओलिसांची सुटका करण्याच्या बदल्यात हमासला युद्ध संपवायचे आहे. पण इस्रायलला ते मान्य नाही.
“कैरोमधील शांतता चर्चेची अलीकडील फेरी फिसकटण्याच्या मार्गावर आहे,” असे या चर्चेबद्दल माहिती देणाऱ्या एका अधिकाऱ्याने रॉयटर्सला सांगितले.
हमासचे शिष्टमंडळ रविवारी रात्री युद्धविराम चर्चेबाबत त्यांच्या नेत्यांचा सल्ला घेण्यासाठी कैरोहून निघेल. मात्र मंगळवारी कैरोला परतण्याचा त्यांचा विचार असल्याचे इजिप्तच्या सूत्रांनी सांगितले.
इस्रायलबरोबरच इतर पाश्चिमात्य शक्तींप्रमाणेच हमासला दहशतवादी गट म्हणून घोषित केलेल्या अमेरिकेने हमासला युद्धविराम करार करण्याचे आवाहन केले आहे. कैरोमध्ये असणारे सीआयएचे संचालक विल्यम बर्न्स आता कतारच्या पंतप्रधानांना भेटण्यासाठी दोहाला जात आहेत.
हमासचे राजकीय कार्यालय असलेल्या कतार आणि इजिप्तकडून नोव्हेंबरच्या संक्षिप्त युद्धविरामाचा पाठपुरावा करण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न सुरू आहेत.
पण कैरोमध्ये इजिप्त आणि कतार यांच्या मध्यस्थांशी झालेल्या चर्चेच्या दुसऱ्या दिवशी हमासने पुनरुच्चार केला की कोणत्याही युद्धविरामाच्या करारामुळे युद्ध संपले पाहिजे. इस्रायली अधिकारी मात्र या चर्चेत भाग घेण्यासाठी कैरोला उपस्थित नव्हते.
मात्र शेकडो पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका आणि अनेक आठवड्यांच्या युद्धविरामाच्या बदल्यात 20 ते 33 ओलिसांची सुखरूप सुटका यांचा समावेश असलेल्या अटींना इस्रायलने प्राथमिक मान्यता दिली आहे.
त्यामुळे गाझामध्ये सुमारे 100 ओलिस राहतील, त्यापैकी काहींचा बंदिवासात मृत्यू झाल्याचे इस्रायलचे म्हणणे आहे. नाव किंवा राष्ट्रीयत्व लपवून ठेवण्याची विनंती करणाऱ्या सूत्राने रॉयटर्सला सांगितले की त्यांच्या सुटकेसाठी अतिरिक्त कराराची आवश्यकता भासू शकते.
“इस्रायलने इच्छाशक्ती दाखवली असली तरी हमास आपल्या टोकाच्या भूमिकेवर ठाम आहे”, असे ते म्हणाले. “गाझा पट्टीतून आपले सर्व सैन्य हटवणे, युद्ध संपवणे आणि हमासकडे सत्ता सुपूर्द करणे ही पहिली मागणी आहे.” नेतान्याहू यांच्या मते इस्रायल हे मान्य करू शकत नाही.
इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट म्हणाले की, हमास युद्धविरामाबाबत फार गंभीर दिसत नाही. गॅलंट म्हणाले, “हमासचा आमच्याशी करार करण्याचा हेतू नाही याची गंभीर चिन्हे आम्हाला दिसत आहेत.” याचा अर्थ लवकरच रफाह आणि उर्वरित पट्टीत जोरदार लष्करी कारवाईला सुरूवात होईल.”
इजिप्तच्या सीमेवर दक्षिणेकडे असलेल्या रफाह शहरात दहा लाखांहून अधिक विस्थापित गाझा रहिवाशांनी आश्रय घेतला आहे. याठिकाणी सैन्य पाठवण्यात येईल, असा इशारा इस्रायल अनेक महिन्यांपासून देत आहे. हजारो हमास सैनिक संभाव्य डझनभर ओलिसांबरोबर या शहरात लपून बसले आहेत असा इस्रायलला संशय आहे.
रामानंद सेनगुप्ता
(रॉयटर्स)