भारतीय नौदलाच्या दक्षिण चीन समुद्रातील सामरिक तैनातीचा भाग
दि. १३ मे: दक्षिण चीन समुद्रातील सामरिक तैनातीचा भाग म्हणून या भागातील देशांच्या प्रवासाला निघालेल्या भारतीय नौदलाच्या युद्धनौका रविवारी व्हिएतनाम आणि मलेशियात दाखल झाल्या. नौदलाच्या पूर्व ताफ्याचे प्रमुख (फ्लॅग ऑफिसर कमांडिंग) रिअर ॲडमिरल राजेश धनकर यांच्या नेतृत्त्वाखाली ही मोहीम सुरू आहे. नौदलाची ‘आयएनएस किल्तन’ ही युद्धनौका रविवारी व्हिएतनाममधील ‘कॅम रान्ह बे’ बंदरावर पोहोचली, तर ‘आयएनएस दिल्ली’ आणि ‘आयएनएस शक्ती’ या दोन युद्धनौका रिअर ॲडमिरल राजेश धनकर यांच्या नेतृत्त्वाखाली मलेशियातील कोटा-किनाबालु या बंदरावर पोहोचल्या. या नौकांचे संबंधित देशातील नौदल अधिकारी आणि भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांनी स्वागत केले.
मलेशियात आगमन
भारतीय नौदलाच्या युद्धनौकांच्या मलेशियातील थांब्यादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय आणि मलेशियाच्या नौदलाचे कर्मचारी, विषय व सामग्रीसंबंधित माहितीचे आदानप्रदान आणि संबंधीत तज्ज्ञांची सत्रे, योग, क्रीडा स्पर्धा आणि परस्परांच्या जहाजांना भेटी (क्रॉस-डेक) यासह विविध व्यावसायिक उपक्रमांमध्ये सहभागी होतील. उभय देशांच्या नौदलांमध्ये परस्पर सहकार्य आणि सामंजस्य अधिक मजबूत करणे हा या भेटींचा उद्देश आहे. भारतीय युद्धनौका बंदराची भेट पूर्ण झाल्यावर, मलेशियाच्या नौदलासह समुद्रात सागरी भागीदारी सरावामध्ये (एमपीएक्स/पासेक्स) सहभागी होतील. नुकत्याच संपलेल्या ‘मिलन-२०२४’ आणि ‘समुद्र लक्ष्मण-२०२४’ या दोन नौदल सरावांचा उद्देशही दोन्ही नौदलांमधील आंतरपरिचालन क्षमता (इंटर ऑपरेटीबिलीटी) वाढवणे हाच होता. ‘आयएनएस दिल्ली’ ही पहिली स्वदेशी बांधणीची ‘प्रोजेक्ट-१५’ श्रेणीतील ‘पथनिर्धारीत क्षेपणास्त्र विनाशिका’ आहे. तर, ‘आयएनएस शक्ती’ ही नौदल ताफ्याला रसद पुरविणारी नौका आहे.
‘किल्तन’ व्हिएतनाममध्ये
दिल्ली आणि शक्ती भारतीय नौदलच्या दोन युद्धनौका मलेशियात पोहोचल्या असतानाच, ‘आयएनएस किल्तन’ ही नौदलाच्या पूर्व ताफ्यातील तिसरी युद्धनौका रविवारी व्हिएतनाममधील ‘कॅम रान्ह बे’ येथे पोहोचली. ‘व्हिएतनाम पीपल्स नेव्ही’ आणि स्थानिक भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांनी या नौकेवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे स्वागत केले. भारत आणि व्हिएतनाममध्ये सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी आहे. हे संबंध वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने ही भेट आयोजित करण्यात आली आहे. भारतीय नौदल आणि व्हिएतनाम पीपल्स नेव्ही यांच्यात समुद्रातल्या सागरी भागीदारी प्रात्यक्षिकाने या भेटीची सांगता होईल. या प्रात्यक्षिकामुळे आंतरपरिचालन आणि अनुभवांची देवाणघेवाण वाढेल. ‘आयएनएस किल्तन’ ही स्वदेशी पाणबुडीविरोधी संरक्षक युद्धनौका असून याची रचना भारतीय नौदलाच्या नौदल संचालनालयाने केली आहे. तर, बांधणी कोलकात्याच्या ‘गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स’ यांनी केली आहे. ‘आयएनएस किल्तन’ ही चार पी-२८ पाणबुडीविरोधी युद्धनौकांच्या श्रेणीतले तिसरे जहाज आहे.
भारतीय नौदलाच्या युद्धनौकांच्या या भेटीमुळे भारताचे या दोन्ही सागरी देशांशी असेलेले दीर्घकालीन सहकार्य आणि मैत्री आणखी दृढ होईल. या महत्त्वाच्या प्रदेशात भारतीय नौदलाच्या जहाजांची उपस्थिती भारतीय नौदलाच्या ‘ॲक्ट ईस्ट’ आणि ‘सागर’ या धोरणांबाबत वचनबद्धता अधोरेखित करते.
विनय चाटी
(पीआयबी ‘इनपुट्स’सह)