लिमा: 1900 मध्ये जन्मलेली 124 वर्षीय व्यक्ती आमच्याकडे असल्याचा राज्य अधिकाऱ्यांचा नवीन दावा जर खरा ठरला तर पेरूच्या अँडियन पर्वतांमध्ये राहणाऱ्या जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीची लवकरच नोंद होऊ शकते.
पेरु या देशाच्या सरकारने असा दावा केला आहे की हुआनुकोच्या मध्य पेरुव्हियन प्रदेशातील स्थानिक रहिवासी मार्सेलीनो अबाद 124 वर्षांचे असल्यामुळे ते जगातील सर्वात वयोवृद्ध जिवंत व्यक्ती ठरू शकतात.
सरकारने एका निवेदनात म्हटले आहे की, “हुआनुकोच्या निसर्गरम्य परिसरात आणि शांततापूर्ण वातावरणात मार्सेलीनो अबाद टोलेंटिनो किंवा ‘मॅशिको’ यांनी जी निरोगी जीवनशैली आणि आंतरिक शांती विकसित केली, ती त्यांच्या चांगल्या आरोग्यात आणि मैत्रीपूर्ण व्यक्तिमत्त्वात प्रतिबिंबित होते. “यामुळे त्यांना, आनंदी वृत्ती आणि कौशल्याने, आयुष्यातील 12 दशकांवर मात करता आली आणि 5 एप्रिल रोजी त्यांनी फक्त 124 मेणबत्त्या विझवल्या.”
पेरुव्हियन अधिकारी म्हणतात की ते आबाद यांना स्वतंत्रपणे पडताळणीसाठी (जगातील वयोवृद्ध जिवंत व्यक्ती ही ओळख मिळण्यासाठी) गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अर्ज करण्यास मदत करत आहेत.
या संस्थेच्या प्रवक्त्याने रॉयटर्सला दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, “गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सकडे सर्वात वयोवृद्ध जिवंत व्यक्ती असल्याचा दावा करणाऱ्या अनेक व्यक्तींकडून अनेक अर्ज प्राप्त होतात. त्यांच्या या दाव्यांची पडताळणी करण्यासाठी अधिकृत कागदपत्रे आणि इतर पुराव्यांची तज्ज्ञ पथकाद्वारे छाननी केली जाईल जेणेकरून “त्यांच्या दाव्यातील खरेपणा कोणत्याही संशयाविना सिद्ध होऊ शकेल.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने सध्या सर्वात वयोवृद्ध जिवंत व्यक्ती म्हणून 111 वर्षीय ब्रिटनच्या व्यक्तीची नोंद करण्यात आली आहे. या महिन्यात व्हेनेझुएलाच्या 114 वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर हा सन्मान त्यांना मिळाला आहे. सर्वात वयोवृद्ध जिवंत महिला 117 वर्षांची असून आतापर्यंतची सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचे वय 122 वर्षे इतके नोंदवले गेले आहे.
चाग्ला या छोट्याशा गावात जन्मलेल्या अबाद यांना पेरू सरकारने 2019 मध्ये त्यांची ओळख पटवून त्यांना सरकारी ओळखपत्र आणि निवृत्तीवेतन मिळवून देईपर्यंत ते या सगळ्या विक्रमांपासून लांबच राहिले होते.
5 एप्रिल रोजी आपला 124 वा वाढदिवस साजरा करताना, मार्सेलीनो अबाद यांनी आपल्या दीर्घायुष्यात फळांनी समृद्ध आहार, तसेच कोकराचे मांस या आहाराचा समावेश असल्याचे सांगितले आहे. अबाद यांना ज्यांच्यातर्फे निवृत्तीवेतन दिले जाते त्यांनी जारी केलेल्या निवेदनात अबाद यांचे वक्तव्य वाचायला मिळते. या शतकवीराला कोकाची पाने चघळण्याचीही सवय आहे, जी पेरूमधील अँडीयन समुदायांमधील एक परंपरा आहे.
अबाद आता ज्येष्ठांसाठी असलेल्या एका घरात राहतात, जिथे या महिन्यात त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक विशेष उत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी त्यांचा फोटो असलेला वाढदिवसाचा केक कापण्यात आला.
रामानंद सेनगुप्ता
(रॉयटर्सच्या इनपुट्सह)