दार्जिलिंगमध्ये निसर्गाचा प्रकोप; भूस्खलनामुळे किमान 20 जणांचा मृत्यू

0

पश्चिम बंगालमधील मिरिक आणि दार्जिलिंगच्या डोंगररांगांमध्ये, रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले. यामध्ये लहान मुलांसह किमान 20 जणांचा मृत्यू झाला असून, अनेक लोक जखमी झाले आहेत. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक घरे वाहून गेली असून, वाहतूक मार्ग विस्कळीत झाले आहेत. तसेच बऱ्याचशा गावांशी संपर्क तुटल्याकारणाने शेकडो पर्यटक या भागात अडकून पडले आहेत.

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि जिल्हा प्रशासनाने संकलित केलेल्या अहवालानुसार, पूर आणि भूस्खलनामुळे सारसाली, जसबीरगाव, मिरिक बस्ती, धार गाव (मेची), नागराकाटा आणि मिरिक तलावाच्या परिसरात जीवितहानीची नोंद झाली आहे.

‘धोकादायक’ परिस्थिती 

उत्तर बंगाल विकास मंत्री उदयन गुहा, यांनी या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीविषयी दु:ख व्यक्त केले असून, सद्य परिस्थिती ‘धोकादायक’ असल्याचे सांगितले आहे. त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, “आतापर्यंतचा मृतांचा आकडा 20 असला, तरी तो वाढण्याची शक्यता आहे. मी बाधित भागांच्या पाहणीसाठी जाणार आहे.”

NDRF च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरिकमध्ये पूराचा आणि भूस्खलनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. या भागात किमान 11 मृत्यूची नोंद झाली असून, 7 जखमींना बाहेर काढण्यात आले आहे. दार्जिलिंगमध्ये 7 लोकांचा मृत्यू झाला असून, स्थानिक प्रशासन, पोलीस आणि आपत्ती प्रतिसाद पथकांच्या मदतीने बचाव कार्य अजूनही सुरू आहे.

दार्जिलिंगचे उपविभागीय अधिकारी रिचर्ड लेपचा, यांनी या गोष्टीची पुष्टी केली की, “रविवार रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दार्जिलिंग उपविभागात मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले, ज्यामध्ये 7 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. या भागात बचाव आणि मदत कार्य सुरू आहे.”

परिस्थिती अत्यंत ‘गंभीर’ – मुख्यमंत्री

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी, उत्तर बंगालमधील पूर परिस्थितीला “अत्यंत गंभीर” असे संबोधले.

बंगाली दूरचित्रवाणी वाहिनीशी बोलताना त्या म्हणाल्या की, ‘भूतानमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पाणी वाहून उत्तर बंगालमध्ये आले आहे. ही घटना खूप वेदनादायी आहे, अशा नैसर्गिक आपत्ती आपल्या नियंत्रणाबाहेर असतात.” 

“मी स्वत: तिथल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि मुख्य सचिवांसोबत 5 बाधित जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांशी व्हर्च्युअल बैठका देखील घेण्यात आल्या आहेत,” असेही त्यांनी सांगितले.

पुढे त्यांनी सांगितले, “केवळ 12 तासांत 300 mm पेक्षा जास्त पाऊस झाला, ज्यामुळे 7 ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर आले भूस्खलन झाले.” या आपत्तीची तुलना त्यांनी, गेल्या महिन्यात कोलकात्यात आलेल्या तीव्र पुराशी केली.

कोलकात्यातील दुर्गा पूजा उत्सवानंतर, त्या मुख्य सचिव मनोज पंत यांच्यासोबत सिलीगुडीसाठी रवाना झाल्या.

भूस्खलनामुळे रस्ते बंद झाले असून, हजारो पर्यटक जागीच अडकले आहेत. मुख्यमंत्र्यांनी, पर्यटकांना घाबरून न जाता, संयम ठेवण्याचे आवाहन केले आणि त्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचे आश्वासनही दिले. सोबतच त्यांनी हॉटेल व्यावसायिकांनाही आवाहन केले आहे की, “त्यांनी पर्यटकांकडून जास्त शुल्क घेऊ नये. त्यांची सुरक्षा ही आमची जबाबदारी आहे.” 

मृतांच्या कुटुंबीयांना सरकारी नुकसान भरपाई आणि कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी दिली जाईल, असेही त्यांनी जाहीर केले. परंतु, नुकसान भरपाईची रक्कम अद्याप निश्चित केलेली नाही.

पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडून शोक व्यक्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांनी या आपत्तीत दगावलेल्यांबद्दल दुःख व्यक्त केले आणि दार्जिलिंग आणि आसपासच्या परिसरातील परिस्थितीवर, बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे सांगितले.

त्यांमी X वरील एका पोस्टमध्ये म्हटले की, “दार्जिलिंगमध्ये पूल अपघातामुळे झालेल्या जीवितहानीमुळे खूप दुःख झाले आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याविषयी मी संवेदना व्यक्त करतो. जखमी लवकर बरे व्हावेत अशी आशा करतो. आम्ही बाधितांना शक्य ती सर्व मदत देण्यासाठी कटिबद्ध आहोत.”

सोशल मीडियावरच्या दृश्यांमध्ये, रस्त्यांचे मोठे नुकसान झाल्याचे आणि मातीचे ढिगाऱ्यांमुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्याचे दिसून येत आहे. या विविध दृष्यांवरुन तिथल्या नुकसानीची तीव्रता जाणवते आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि दार्जिलिंग जिल्हा प्रशासनाची बचाव पथके, स्थानिक स्वयंसेवकाच्या सहाय्याने बचाव कार्य करत आहेत.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही X द्वारे आपला शोक व्यक्त केला, तसेच बचाव कार्य जलद आणि सुरळीत व्हावे आणि जखमी लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना केली.

त्यांनी X पोस्टमध्ये म्हटले आहेकी, “पश्चिम बंगालच्या दार्जिलिंगमध्ये अतिवृष्टी आणि भूस्खलनामुळे झालेली जीवितहानी अत्यंत वेदनादायक आहे. मी शोकाकुल कुटुंबांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करते. मी बचाव आणि मदत कार्य यशस्वी होण्यासाठी प्रार्थना करते आणि जखमींना लवकर बरे वाटावे अशी सदिच्छा व्यक्त करते.”

हवामान विभागाकडून ‘रेड अलर्ट’ जारी

भारतीय हवामान विभागाने (IMD) दार्जिलिंग आणि कालिम्पोंगसह उप-हिमालयीन पश्चिम बंगालमध्ये अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ (red alert) जारी केला आहे. पावसामुळे माती भुसभुशीत झाली असल्याकारणाने, भूस्खलन आणि रस्ते बंद होण्याच्या धोक्याचा इशाराही देण्यात आला आहे.

NDRF ने सांगितले की, दार्जिलिंग जिल्हा आणि उत्तर सिक्कीममधील रस्त्यांचा संपर्क अद्याप विस्कळीत आहे. सिलीगुडीला मिरिक-दार्जिलिंग मार्गाशी जोडणारा एक लोखंडी पूल खराब झाला आहे, ज्यामुळे अनेक भागांमधील प्रवेश खंडित झाला आहे. तसेच मिरिकमधील एका गावाशी, पूरामुळे आणि रस्ते बंद झाल्यामुळे पूर्णपणे संपर्क तुटला आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(IBNS च्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleTransforming Defence: Indian Army Embraces AI to Tackle Future Threats
Next articleभविष्यातील धोक्यांचा सामना करण्यासाठी, लष्कराचा AI कडे वाढता कल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here