भारतीय लष्कराला 47 टी-72 ब्रिज लेईन्ग रणगाड्यांनी (बीएलटी) सुसज्ज करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी चेन्नईतील अवडी येथील आर्मर्ड व्हेईकल निगम लिमिटेडच्या (एव्हीएनएल) हेवी व्हेईकल्स फॅक्टरीशी (एचव्हीएफ) 1 हजार 561 कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या निर्णयामुळे संरक्षण उत्पादन क्षेत्रातील स्वावलंबनाच्या मोहिमेला चालना मिळणार आहे.
ब्रिज लेईन्ग रणगाडे हे एक महत्वपूर्ण उपकरण आहे, जे यांत्रिक फोर्सद्वारे आक्रमण/बचावात्मक मोहिमांदरम्यान पूल बांधण्यासाठी वापरले जाते.
“हे रणगाडे आणि आर्मर्ड व्हेईकल फ्लीटला पूल बनवण्याची क्षमता प्रदान करते, ज्यामुळे युद्धभूमीवर गतिशीलता आणि आक्रमण क्षमता वाढते. हे उपकरण भारतीय-स्वदेशी बनावटीचे असल्यामुळे त्याच्या खरेदीमुळे संरक्षण क्षेत्रातील मेक-इन-इंडिया उपक्रमाला चालना मिळेल. एकूण अर्थव्यवस्थेला चालना देण्यात आणि देशातील रोजगाराच्या संधी वाढवण्यातही हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावेल,” असे संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
हा प्रकल्प भारतीय लष्कराच्या बदलत्या परिचालन गरजांनुसार प्रगत संरक्षण उपकरणांच्या निर्मितीतील अवजड वाहन कारखान्याचे (एचव्हीएफ) कौशल्यदेखील अधोरेखित करतो.
या ब्रिज लेयर रणगाड्यांच्या (बीएलटी) तैनातीमुळे लष्कराची लढाऊ सज्जता आणि युद्धभूमीवरील गंभीर परिस्थितीत परिचालन गतिशीलता लक्षणीयरीत्या वाढण्याची अपेक्षा आहे.
अवजड वाहनांच्या कारखान्याला भारताच्या संरक्षण दलांसाठी अत्याधुनिक चिलखती वाहनांच्या निर्मितीचा वारसा लाभला आहे. नवीनतम करार एचव्हीएफच्या प्रभावी पोर्टफोलिओचा विस्तार करतो आणि भारताच्या संरक्षण उत्पादन परिसंस्थेचा आधारस्तंभ म्हणून त्याची स्थिती अधिक बळकट करतो.
टीम भारतशक्ती