पाकिस्तानचे जनरल कमर बाजवा यांच्या लष्कर प्रमुखपदाच्या कार्यकाळात, त्यांच्या कुटुंबीयांनी 12.7 अब्ज पाकिस्तानी रुपयांची (PKR) मालमत्ता गोळा केली. कमर बाजवा सेवानिवृत्त होण्याच्या काही दिवस आधी (गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये) त्यांच्या कुटुंबाचा टॅक्स रेकॉर्ड लीक झाला आणि त्याद्वारे ही कमाई समोर आली. विशेष म्हणजे, बाजवा कुटुंबीयांनी अब्जावधींची माया कशी गोळा केली याऐवजी ही कराची माहिती कशी लीक झाली, याच्या चौकशीचे आदेश देण्यास अर्थमंत्र्यांनी विलक्षण घाई केली. “लीक झालेली ही माहिती म्हणजे कायद्याच्या दृष्टीने टॅक्सबाबतच्या गोपनीयतेचे उल्लंघन आहे,” असे वक्तव्य मंत्र्यांनी केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पण बाजवा कुटुंबीयांनी गोळा केलेल्या या संपत्तीच्या आरोपाबाबत काय? सरकारने मात्र या विषयावर ‘अळीमिळी गुपचिळी’ असे धोरण अवलंबिले आहे.
एवढ्या वर्षांत तिथे नेमके काय चालले आहे, हे अनेकांना माहीत असले तरी त्यांनी यावर गप्प राहणे पसंत केले. “डेटावर आधारित शोध पत्रकारितेतील बातम्यांवर काम करणारी पाकिस्तानमधील डिजिटल मीडिया वृत्तसंस्था म्हणून स्वतःचे वर्णन करते, त्या फॅक्टफोकसने मात्र तसे केले नाही.
बाजवा कुटुंबाच्या करनोंदी तपासून फॅक्टफोकसने एक तयार केला आहे. या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, बाजवा यांच्या कार्यकाळात कुटुंबातील सदस्यांकडे 12.7 अब्ज पाकिस्तानी रुपयांची संपत्ती होती. आयेशा अमजदची 2016मध्ये शून्य रुपये असणारी संपत्ती पुढच्या सहा वर्षांत 2.2 अब्ज पाकिस्तानी रुपये (घोषित आणि ज्ञात) झाली, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे.
फॅक्टफोकसचे पत्रकार अहमद नुरानी यांनी अहवालात लिहिल्याप्रमाणे : कमर जावेद बाजवा लेफ्टनंट जनरल बनले तेव्हा, त्यांची पत्नी कर भरणारी नव्हती. लाहोरमधला त्यांचा जवळचा मित्र, साबीर “मिठू” हमीद हा एक चांगला व्यापारी होता; पण अब्जाधीश नव्हता. पुढच्या काही काळात दोन्ही कुटुंबांसाठी सर्व काही बदलले आणि ते एक कुटुंब बनले.
सहा वर्षांत, दोन्ही कुटुंबे अब्जाधीश झाली, आंतरराष्ट्रीय व्यवसाय सुरू केला, अनेक परदेशी मालमत्ता खरेदी केल्या, परदेशात भांडवल हस्तांतरित करण्यास सुरुवात केली, व्यावसायिक प्लाझा, व्यावसायिक भूखंड तसेच इस्लामाबाद आणि कराचीमधील प्रचंड फार्महाऊसेसचे मालक बनले. लाहोरमधील एक प्रचंड रिअल इस्टेट, असा प्रचंड पसारा बाजवा कुटुंबाच्या नावावर आहे. बाजवा कुटुंबाने गेल्या सहा वर्षांत पाकिस्तानात आणि बाहेर जमा केलेल्या – ज्ञात-मालमत्ता आणि व्यवसायांचे सध्याचे बाजार मूल्य 12.7 अब्ज पाकिस्तानी रुपयांपेक्षा जास्त आहे, असे अहवालात म्हटले आहे.
2013च्या इन्कमटॅक्स रिटर्नमध्ये, कमर जावेद बाजवा यांनी घोषित केले होते की, त्यांच्या पत्नीकडे लाहोरमधील दोन आणि इस्लामाबादमधील एक अशा तीन मालमत्ता असून त्यांची किंमत 70,00,000 पाकिस्तानी रुपये इतकी आहे.
मात्र, लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यानंतर, जनरल बाजवा यांनी 2013च्या संपत्ती विवरणात 17 सप्टेंबर 2017, 02 नोव्हेंबर 2017 आणि 08 नोव्हेंबर 2017, अशी तीन वेळा सुधारणा केली. सुधारित संपत्ती विवरणात, जनरल बाजवा यांनी लाहोरमधील एका व्यावसायिक भूखंडाचा उल्लेख केला. 2013मध्ये हा भूखंड खरेदी केला होता, पण तो जाहीर करायचे विसरलो, असा दावा त्यांनी केला.
अहवालानुसार, जनरल बाजवा यांच्या पत्नी आयशा अमजद यांनी 10 ऑगस्ट 2016 रोजी टॅक्स फाइलर म्हणून नोंदणी केली. नोव्हेंबर 2016मध्ये लष्करप्रमुखपदासाठी तिच्या पतीचा विचार केला जाणार होता. 2016चा वार्षिक परतावा आणि संपत्ती विवरण जाहीर करण्याची ही तिची पहिली-वहिली वेळ होती, जी मुळात 28 ऑक्टोबर 2016 रोजी बाजवा यांची लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती होण्याच्या तीन आठवड्यांपूर्वी सादर करण्यात आली.
2016च्या टॅक्स रिटर्न्समध्ये आयेशा अमजाद यांनी ‘इतर मालमत्ता’ या विभागात इतर कोणतेही सविस्तर वर्णन न देता आठ मालमत्तांचा उल्लेख केला. यात 17 एप्रिल 2018मध्ये सुधारणा करण्यात आली. आयेशाने असे जाहीर केले की, मागील आर्थिक वर्षात म्हणजे 2015मध्ये तिच्या जवळील मालमत्तेचे निव्वळ आर्थिक मूल्य शून्य होते.
आयेशाने 2021मध्ये 11 मालमत्ता (वर्षानुवर्षे जमा केलेल्या) तसेच रोख रक्कम, रोखे, दागिने, बँक खात्यातील पैसे आणि विदेशी चलन घोषित केले. अहवालात मालमत्तेचे बाजार मूल्य 2.2 अब्ज पाकिस्तानी रुपये असल्याचा दावा करण्यात आला आहे.
महनूर साबीरच्या (जनरल बाजवा यांची सून) घोषित मालमत्तेचे एकूण मूल्य ऑक्टोबर 2018च्या शेवटच्या आठवड्यात शून्यावरून 2 नोव्हेंबर 2018 रोजी 1,271 दशलक्ष पाकिस्तानी रुपयांवर पोहोचले, तर माहनूरची बहिण हमना नासीरची 2016मध्ये शून्य असणारी संपत्ती 2017पर्यंत अब्जावर गेली असल्याचा दावाही या अहवालात करण्यात आला आहे. शिवाय, जनरल बाजवा यांच्या मुलाचे सासरे साबीर हमीद यांचे उत्पन्न 2013मध्ये दहा लाखांपेक्षा कमी होते परंतु “गेल्या काही वर्षांत ते अब्जाधीश झाले”, असा दावा वेबसाइटने केला आहे.
जनरल बाजवा यांच्या दोन मुलांच्या नावावर असलेल्या मालमत्तेची माहिती मिळू शकली नाही, असे अहवालात म्हटले आहे. याशिवाय जनरल बाजवा यांनी सरकार, लष्कर, डीएचएज् इत्यादींकडून मेजर जनरल, लेफ्टनंट जनरल आणि लष्करप्रमुख म्हणून जी 12.7 अब्ज पाकिस्तानी रुपयांची रक्कम मिळवली आहे ती वगळली असल्याचे, फॅक्टफोकसच्या अहवालात नमूद केले आहे.
म्हणतात नं – राजा तुपाशी, जनता उपाशी!
(अनुवाद: आराधना जोशी)