बांगलादेशमध्ये राजकीय अनिश्चितता निर्माण झाली असल्याने लष्करप्रमुख जनरल वेकर-उझ-झमान विद्यार्थी आंदोलक नेत्यांना भेटणार आहेत. हिंसक उठावानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी दिलेला राजीनामा आणि त्यांचे देश सोडून जाणे या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुखांनी हा निर्णय घेतला आहे. ढाकाचे सहसा गजबजलेले रस्ते आज मात्र शांत होते. सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाच्या विरोधात वाढलेल्या निदर्शनांमुळे जुलैच्या मध्यात बंद पडलेल्या शाळा विद्यार्थ्यांच्या कमी उपस्थितीसह पुन्हा सुरू झाल्या आहेत. या हिंसाचारात सुमारे 300 जणांचा मृत्यू झाला असून हजारो लोक जखमी झाले आहेत.
आर्थिक परिणाम आणि अंतरिम सरकार
बांगलादेशची अर्थव्यवस्था मुख्यत्वे करून ज्यावर उभी आहे असे प्रमुख जागतिक ब्रॅण्डचा पुरवठा करणारे कपड्यांचे कारखाने मंगळवारी बंदच होते. वस्त्र उत्पादकांची मुख्य संघटना कारखाने पुन्हा उघडण्याच्यासंदर्भात घोषणा करणार आहे. ज्या विद्यार्थी नेत्यांनी आरक्षणविरोधी चळवळ सुरू केली, ज्यांनी शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी झाली, त्याच विद्यार्थी नेत्यांनी आता नोबेल शांतता पुरस्कार विजेते मुहम्मद युनूस यांना अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार म्हणून नामांकित केले आहे.
विद्यार्थी चळवळीचे प्रमुख आयोजक नाहिद इस्लाम यांनी लष्कर समर्थित प्रशासन नाकारत, युनुस यांनीच अंतरिम सरकारचे नेतृत्व करावे या त्यांच्या मागणीवर भर दिला. इस्लामने असेही नमूद केले आहे की चर्चेनंतर युनुस यांनी जबाबदारी स्वीकारण्यास सहमती दर्शविली आहे.
नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनुस यांची भूमिका
84 वर्षीय युनुस आणि त्यांच्या ग्रामीण बँकेला मायक्रो लोनच्या माध्यमातून गरिबी दूर करण्याच्या त्यांच्या कार्यासाठी 2006चा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला. मात्र, जूनमध्ये युनुस यांना घोटाळ्याच्या आरोपांना सामोरे जावे लागले, जे त्यांनी नाकारले होते. सध्या पॅरिसमध्ये असलेल्या युनुस यांनी सोमवारी बांगलादेशचा 1971 साली पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा ‘दुसरा मुक्ती दिवस’ म्हणून उल्लेख केला. मात्र, हसीना यांना तेथून पळून जाऊन भारतात येण्याची परवानगी दिल्याबद्दल त्यांनी भारताविषयी निराशा व्यक्त केली.
आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया आणि पुढील प्रगती
हसीना सोमवारी दिल्लीजवळच्या लष्करी विमानतळावर पोहोचल्या आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी त्यांची भेट घेतली. त्यांच्या मुक्कामाचा आणि भविष्यातील योजनांचा तपशील अद्याप उघड करण्यात आलेला नाही. भारताचे परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांनी मंगळवारी बंद दाराआड झालेल्या बैठकीत बांगलादेशच्या संकटाविषयी संसदेला माहिती दिली.
लष्करप्रमुख जनरल झमान यांची विद्यार्थ्यांसोबतची बैठक मंगळवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी 12 वाजता (0600 जी. एम. टी.) होणार आहे. सोमवारी दूरचित्रवाणीवरील भाषणात हसीना यांनी दिलेला राजीनामा आणि अंतरिम सरकार स्थापन करण्याची घोषणा केली. हसीना यांच्या देश सोडून जाण्यामुळे आनंदी झालेल्या जमावाने हसीना यांचे निवासस्थान ज्याप्रकारे लुटले त्यातून अशांततेची तीव्रता परत एकदा अधोरेखित झाली.
संयम ठेवणे आणि भविष्यातील निवडणुकांसाठी आवाहन
विरोधी पक्ष असलेल्या बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीचे (बीएनपी) प्रभारी कार्यवाहक प्रमुख तारिक रहमान यांनी या संक्रमण काळात शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन केले आहे. योग्य प्रक्रियेचे पालन करण्याच्या आणि अराजकता टाळण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला. हसीना यांच्या अवामी लीग वगळता इतर प्रमुख राजकीय पक्षांशी पुढील वाटचाल कशी असावी याबद्दल जनरल झमान चर्चा करत आहेत. राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांच्याशीही चर्चा करण्याची तयारी सुरू आहे.
सर्व पक्ष आणि स्टेकहोल्डर्स यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर अंतरिम सरकार लवकरात लवकर निवडणुका घेईल, असे राष्ट्रपती शहाबुद्दीन यांनी जाहीर केले. बीएनपीच्या अध्यक्षा बेगम खालिदा झिया यांची सुटका करण्याच्या एकमताने घेतलेल्या निर्णयाचा देखील राष्ट्रपतींनी उल्लेख केला. झिया यांना 2018 मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात टाकण्यात आले, परंतु वर्षभरातच त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. 78 वर्षीय झिया यांनी आपल्यावरचे आरोप फेटाळले आहेत.
2009पासून सत्तेत असणाऱ्या हसीना यांचे हिन्डन येथे आगमन झाल्यानंतर त्या सुरक्षित स्थळी पोहोचल्या आहेत आणि नंतर त्या ब्रिटनला जाण्याची शक्यता आहे.
रेशम
(रॉयटर्स)