चिन्मय कृष्ण दास यांचा जामीन बांगलादेश न्यायालयाने फेटाळला

0
चिन्मय
चिन्मय कृष्ण दास यांना गेल्या वर्षी ढाका विमानतळावर अटक करण्यात आली. (छायाचित्र सौजन्यः सेव्ह बांगलादेशी हिंदू एक्स पेज)

 

शेख हसीना गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये त्यांच्या राजवटीविरुद्ध झालेल्या देशव्यापी उठावानंतर भारतात पळून आल्यापासून अल्पसंख्याकांवर सतत होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या हिंदू भिक्षू चिन्मय कृष्ण दास यांचा जामीन बांगलादेशच्या न्यायालयाने फेटाळला आहे.

चट्टोग्राम न्यायालयाने गुरुवारी दोन्ही बाजूंचे 30 मिनिटे म्हणणे ऐकल्यानंतर चिन्मय कृष्ण दास यांचा जामीन अर्ज फेटाळला.

न्यायालयाची सुनावणी

बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाचे वकील अपूर्बा भट्टाचार्य आणि इतर 10 जणांनी दास यांची बाजू न्यायालयात मांडली, ज्यांना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ढाका विमानतळावरून अटक करण्यात आली होती.

दि डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, सकाळी 11 वाजून 40 मिनिटांच्या सुमारास, अपूर्बा भट्टाचार्य यांच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च न्यायालयाचे 11 वकील पोलिस संरक्षणात दोन मायक्रोबसमधून न्यायालयाच्या आवारातून निघाले.

त्याआधी या  हाय-प्रोफाइल प्रकरणात चिन्मय यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सकाळी 10.15 च्या सुमारास वकिलांची टीम न्यायालयात पोहोचली. त्यांनी प्रयत्न करूनही न्यायालयाचा निर्णय त्यांच्या याचिकेच्या विरोधात गेला, असे वृत्तात म्हटले आहे.

चिन्मय कृष्ण दास यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले नव्हते.

मंगळवारी संध्याकाळी कोलकाताच्या एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आलेले दास यांचे वकील रवींद्र घोष यांनी सांगितले की, या निर्णयाविरोधात वकील उच्च न्यायालयात जातील.

“आम्ही उच्च न्यायालयात जाऊ” असे घोष यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.

अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले

बांगलादेशात, ऑगस्ट 2024 मध्ये माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या हकालपट्टीनंतर अल्पसंख्याक समुदायांवर, विशेषतः हिंदूंवर मोठ्या प्रमाणात हल्ले सुरू झाले.

हिंसाचारामुळे लूटमार, जाळपोळ आणि हत्येच्या असंख्य घटना घडल्या आहेत. एका वृत्तात असे सूचित केले आहे की अधिकृतपणे 88 हून अधिक हल्ले झाले आहेत, ज्यात प्रामुख्याने हिंदूंना लक्ष्य केले गेले.

हिंदू बौद्ध ख्रिश्चन एकता परिषदेच्या नोंदीनुसार 4 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट या कालावधीत बांगलादेशात अल्पसंख्याकांवर झालेल्या हल्ल्यांच्या एकूण 2 हजार 010 घटना (69 मंदिरांवरील हल्ले) घडल्या.

इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेसचे (इस्कॉन) प्रमुख भिक्षू आणि बांगलादेश समिलिटा सनातनी जागरण जोटेचे प्रवक्ते, चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांना ढाका पोलिसांनी ऑक्टोबरमध्ये एका सभेत बांगलादेशी ध्वजाचा अनादर केल्याच्या आरोपाखाली अटक केली तेव्हा परिस्थिती आणखी चिघळली.

या अटकेमुळे भारत आणि जगभरातील हिंदू नेत्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून अनेकांनी या निर्णयावर ‘दुर्दैवी’ आणि ‘भ्याड’ अशी टीका केली आहे.

दास यांच्या अटकेनंतर भारताच्या शेजारील देशात आणखी दोन भिक्षूंना अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(आयबीएनएस)


Spread the love
Previous articleन्यू ऑर्लिन्स : किलर ट्रकमध्ये आयसिसचा झेंडा, मृतांचा आकडा वाढला
Next articleमच्छिमारांना मायदेशात आणण्यासाठी भारत बांगलादेशचा पुढाकार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here