नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारमधील सदस्यांची अंतिम निवड बुधवारी केली जाईल अशी अपेक्षा असल्याचे बांगलादेशमधील विद्यार्थी आंदोलक नेत्यांनी सांगितले. बांगलादेशात, विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे उसळलेल्या हिंसाचारानंतर पंतप्रधान शेख हसीना राजीनामा देऊन भारताच्या आश्रयाला आल्या आहेत.
विद्यार्थी नेत्यांनी शिफारस केलेल्या युनूस यांची बांगलादेशच्या राष्ट्रपतींनी मंगळवारी उशिरा अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली. सध्याच्या संकटावर मात करण्यासाठी तसेच निवडणुकांचा मार्ग मोकळा करण्यासाठी सरकारमधील उर्वरित सदस्यांची निवड लवकरात लवकर करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
बांगलादेशच्या लष्करप्रमुखांनी सोमवारी दूरचित्रवाणीवरील भाषणात हसीना यांच्या राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर आता तिथे अंतरिम सरकार स्थापन केले जाईल. देशभरात अनेक आठवडे झालेल्या प्राणघातक हिंसाचारात सुमारे 300 लोक मारले गेले आणि हजारो जखमी झाले.
बांगलादेशच्या लष्करप्रमुखांनी सोमवारी दूरचित्रवाणीवरील भाषणात हसीना यांच्या राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर आता तिथे अंतरिम सरकार स्थापन केले जाईल. देशभरात अनेक आठवडे झालेल्या प्राणघातक हिंसाचारात सुमारे 300 लोक मारले गेले आणि हजारो जखमी झाले.
84 वर्षीय युनूस यांनी बुधवारी फायनान्शियल टाईम्सला सांगितले की, “सरकारवरील विश्वास त्वरित पुनर्स्थापित करणे महत्त्वाचे आहे,” ते म्हणाले की ते अंतरिम कालावधीनंतर होणाऱ्या निवडणूकीत निवडून येणे किंवा तशा नियुक्तीची आपण मागणी करत नाहीत.
पॅरिसमधील आवश्यक त्या वैद्यकीय तपासण्यांनंतर ते गुरुवारी ढाका येथे परतण्याची अपेक्षा आहे, असे त्यांच्या प्रवक्त्याने सांगितले.
“आम्हाला शांततेची गरज आहे, आम्हाला नवीन निवडणुकांसाठी रोडमॅपची गरज आहे आणि आम्हाला नवीन नेतृत्व घडवण्याची तयारी करण्यासाठी काम करण्याची गरज आहे,” असे युनुस यांनी वृत्तपत्राला सांगितले.
“बांगलादेशच्या पुनर्बांधणीसाठी आपण एकत्र कसे काम करू शकतो आणि ते कशाप्रकारे मदत करू शकतात याबद्दल मी येणाऱ्या काळात सर्व संबंधित पक्षांशी बोलणार आहे,” असेही ते म्हणाले.
परिस्थिती पूर्वपदावर
हसीना यांच्या राजीनाम्यामुळे देशभरात जल्लोष करण्यात झाला. अलिकडच्या वर्षांमध्ये आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या 170 दशलक्ष लोकसंख्येच्या देशात सलग 15 वर्षांची अनिर्बंध सत्ता उपभोगल्यानंतर राजीनामा देऊन पळून गेलेल्या शेख हसीना यांच्या अधिकृत निवासस्थानी जमलेल्या जमावाला कोणीही विरोध केला नाही.
बांगलादेश बँकेच्या सूत्रांनी सांगितले की, सोमवारी झालेल्या गोंधळानंतर हळूहळू स्थिती पूर्वपदावर यायला सुरूवात झाली. मात्र बुधवारी ढाका परिसरात नव्याने निदर्शने सुरू झाली कारण होते केंद्रीय बँकेच्या शेकडो अधिकाऱ्यांनी कथित भ्रष्टाचारामुळे त्यांच्या चार उपगव्हर्नरांना राजीनामा देण्यास भाग पाडले.
यावर बँकेने त्वरित कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
मुख्य विरोधी पक्ष असणाऱ्या बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीच्या(बीएनपी) ढाका येथील सभेला शेकडो नागरिक उपस्थित होते. पक्षनेत्या खलिदा झिया यांची मंगळवारीच राष्ट्रपतींनी नजरकैदेतून सुटका केली.
बांगलादेशशी दृढ सांस्कृतिक आणि व्यावसायिक संबंध असलेल्या शेजारील देश भारताने आपल्या मुख्य दूतावास आणि चार वाणिज्य दूतावासांमधून सध्या अनावश्यक असणारे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना बाहेर काढले असल्याचे भारत सरकारच्या दोन सूत्रांनी सांगितले.
निदर्शनांमुळे जुलैच्या मध्यात बंद झालेल्या ढाका आणि इतर शहरांमधील बहुतेक शाळा आणि विद्यापीठ परिसर पुन्हा सुरू करण्यात आले असून नागरिकांनी कार्यालये आणि बँकांमध्ये जाण्यासाठी बस आणि इतर सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय निवडले आहेत. अनेक दिवस बंद असलेले देशातील मुख्य कपड्यांचे कारखानेदेखील बुधवारपासून सुरू झाले.
1971च्या पाकिस्तानविरोधी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेल्यांच्या वारसदारांना सार्वजनिक क्षेत्रातील नोकरीसाठी देण्यात आलेल्या आरक्षणाच्या विरोधात झालेल्या निदर्शनांमधून हसीना यांना पदच्युत करणारी चळवळ उदयास आली. टीकाकारांच्या मते सत्ताधारी पक्षाने आपल्या जवळच्यांना याचा लाभ व्हावा यासाठी आरक्षणाचा निर्णय घेतला होता.
अंतरिम सरकार
युद्धात भाग घेतलेल्या अनुभवी व्यक्तीला अंतरिम सरकारमध्ये नियुक्त केले जावे अशी शिफारस राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी केली आहे.
बांगलादेशमध्ये निदर्शने सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी सांगितले की, “पाकिस्तानचे सरकार आणि लोक बांगलादेशच्या लोकांसोबत एकजुटीने उभे आहेत. परिस्थिती लवकरात लवकर शांततापूर्ण, सामान्य होण्याची ते प्रामाणिकपणे आशा करत आहेत.”
विद्यार्थी चळवळीतील प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या नाहिद इस्लामने राष्ट्रपतींच्या घोषणेनंतर पत्रकारांना सांगितले की, राष्ट्रपतींना पाठवलेल्या प्रारंभिक यादीत अंतरिम सरकारसाठी विद्यार्थ्यांनी 10-15 सदस्यांची शिफारस केली आहे.
मंगळवारी संध्याकाळपासून 24 तासांच्या आत अंतरिम सरकारमधील सदस्यांना अंतिम रूप दिले जाईल अशी अपेक्षा असल्याचे इस्लामने सांगितले. इस्लामने सांगितले की, विद्यार्थ्यांनी केलेल्या शिफारशींमध्ये नागरी समाजाचे सदस्य आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांचा समावेश आहे.
दुसरीकडे हसीना सोमवारी नवी दिल्लीत दाखल झाल्या असून सध्या राजधानी दिल्लीच्या बाहेर एका सुरक्षित घरात वास्तव्याला आहेत. भारतीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार ब्रिटनला जाण्यासाठी हसीना यांच्या हालचाली सुरू आहे. पण ब्रिटीश गृह मंत्रालयाने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
सूर्या गंगाधर
(रॉयटर्स)
(रॉयटर्स)