बांगलादेश हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या नेत्यावर अंत्यसंस्कार

0
मृत्युमुखी

शनिवारी ढाका येथे हजारो शोकाकुल नागरिकांच्या उपस्थितीत, शरीफ उस्मान हादी या युवा नेता आणि संसदीय उमेदवाराला अखेरचा निरोप देण्यात आला. या युवा नेत्याच्या मृत्यूने बांगलादेशचे अति संवेदनशील राजकीय संक्रमण हादरवून गेले आहे. गेल्या वर्षी शेख हसीना यांचे दीर्घकाळचे शासन संपुष्टात आणणाऱ्या विद्यार्थी आंदोलनामागची एक प्रेरक शक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या 32 वर्षीय नेत्यावर गेल्या आठवड्यात एका प्रचार कार्यक्रमादरम्यान मुखवटा घातलेल्या बंदूकधाऱ्यांनी डोक्यात गोळ्या झाडल्या होत्या. सहा दिवस जीवनरक्षक प्रणालीवर राहिल्यानंतर गुरुवारी सिंगापूरमध्ये त्यांचा मृत्यू झाला.

कडक सुरक्षेच्या बंदोबस्तात झालेल्या या अंत्यसंस्कारासाठी देशभरातून लोक जमले होते, ज्यात हंगामी सरकारचे नेते मुहम्मद युनूस, लष्करप्रमुख आणि प्रतिस्पर्धी राजकीय गटांचे प्रतिनिधी यांचा समावेश होता. राजधानीत सर्वत्र अशांतता टाळण्यासाठी पोलीस आणि निमलष्करी दले तैनात करण्यात आली होती, आणि अधिकाऱ्यांनी नंतर या समारंभाची सांगता शांततेत झाल्याची पुष्टी केली.

शोक आणि संक्रमणात बुडालेला बांगलादेश

शोकाकुल नागरिकांना संबोधित करताना, नोबेल शांतता पुरस्कार विजेते युनूस यांनी हादी यांचा लोकशाही नूतनीकरणाचा दृष्टिकोन पुढे नेण्याची शपथ घेतली. “आज आम्ही तुम्हाला वचन देण्यासाठी आलो आहोत की तुम्ही ज्या मूल्यांसाठी उभे राहिलात, ते आम्ही पूर्ण करू,” असे ते म्हणाले, आणि या अंत्ययात्रेचे वर्णन न्याय आणि एकता टिकवून ठेवण्याची राष्ट्रीय प्रतिज्ञा असे केले.

एक प्रतीकात्मक श्रद्धांजली म्हणून, हादी यांना ढाका विद्यापीठाच्या आवारात राष्ट्रकवी काझी नजरुल इस्लाम यांच्या शेजारी दफन करण्यात आले, हे स्थान देशातील सर्वात आदरणीय व्यक्तींसाठी राखीव आहे. सरकारने त्यांच्या सन्मानार्थ एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला.

हादी यांच्या हत्येमुळे मोठ्या प्रमाणात दुःख आणि संतापाची लाट सगळीकडे पसरली आहे. परिणामी प्रसारमाध्यमे आणि सांस्कृतिक संस्थांवर जमावाचे हल्ले झाले. आंदोलकांनी न्याय आणि उत्तरदायित्वाची मागणी करत ढाकाच्या शाहबाग परिसरात गर्दी केली. याशिवाय हिंसाचार इतर शहरांमध्येही पसरला. चितगावमध्ये, आंदोलकांनी भारतीय सहाय्यक उच्चायुक्तांना लक्ष्य केले, ज्यामुळे हसीना यांना पदच्युत केल्यानंतर नवी दिल्लीला पळून गेल्याच्या घटनेमुळे वाढलेल्या भारतविरोधी भावना अधोरेखित झाल्या.

फेब्रुवारीतील निवडणुकीपूर्वी तणावात वाढ

बांगलादेशमध्ये 12 फेब्रुवारी रोजी संसदीय निवडणुका होणार आहेत – हा एक महत्त्वाचा क्षण आहे, ज्याद्वारे जवळपास दोन वर्षांच्या राजकीय अस्थिरतेनंतर स्थिरता परत येईल अशी अनेकांना आशा आहे. मात्र, अंतरिम सरकारला अशांतता रोखण्याच्या आणि धर्मनिरपेक्ष, राष्ट्रवादी तसेच इस्लामी गटांमधील परस्परविरोधी हितसंबंधांचे व्यवस्थापन करण्याच्या त्यांच्या एकंदर क्षमतेबद्दल वाढत्या छाननीचा सामना करावा लागत आहे.

विश्लेषकांचे म्हणणे आहे की, या अशांततेमुळे युनूस यांच्या अधिकाराच्या मर्यादा उघड झाल्या आहेत आणि यामुळे आशियातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून बांगलादेशच्या पुनर्प्राप्तीला धोका निर्माण होऊ शकतो. 175 दशलक्ष लोकसंख्या असलेला हा देश चीननंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा वस्त्र उत्पादक आहे.

हसीना यांच्या नेतृत्वाखालील प्रतिबंधित अवामी लीगने पुढील आंदोलनाचा इशारा दिला आहे, ज्यामुळे हिंसाचारात वाढ होऊन निवडणूक प्रक्रिया विस्कळीत होऊ शकते अशी भीती सर्वत्र व्यक्त केली जात आहे.

अनेक संघटनांकडून उत्तरदायित्वाची मागणी

मानवाधिकार संघटनांनी हादी यांच्या हत्येचा आणि त्यानंतर झालेल्या हल्ल्यांचा निषेध केला आहे. ह्युमन राइट्स वॉचने याला एक “भयंकर कृत्य” म्हटले आहे आणि वाढता हिंसाचार रोखण्यासाठी सरकारने तातडीने कारवाई करावी, असे आवाहन केले आहे. ॲम्नेस्टी इंटरनॅशनलने या हत्येची आणि त्यानंतर पत्रकार तसेच कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्यांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे.

अग्रगण्य वृत्तपत्रांची कार्यालये आणि उदिची शिल्पीगोष्ठीसारख्या सांस्कृतिक गटांसह माध्यमांच्या कार्यालयांना गेल्या काही दिवसांपासून लक्ष्य केले जात आहे. जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांकात 180 देशांपैकी बांगलादेशचा 149 वा क्रमांक लागतो. हक्क कार्यकर्त्यांनी इशारा दिला आहे की, माध्यमांप्रती सातत्याने दाखवला जाणारा   द्वेष निवडणुकीपूर्वी नागरी अवकाश मर्यादित करू शकतो.

देश शोकसागरात बुडालेला असताना, हादी यांचा मृत्यू बांगलादेशच्या लोकशाही संक्रमणातील आशा आणि धोके या दोन्हींचे प्रतीक बनला आहे — हा संघर्ष आता दुःख, अनिश्चितता आणि पुन्हा अशांतता पसरण्याच्या भीतीमुळे झाकोळला गेला आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह) 

+ posts
Previous articleसंरक्षण धोरणातील जोखमीचे व्यवस्थापन करणे हीच भारताची प्रमुख रणनीती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here