बांगलादेश विमान अपघात: मृतांची संख्या 31 वर, विद्यार्थ्यांकडून निदर्शने

0
बांगलादेशातील ढाका येथील एका शाळेवर हवाई दलाचे विमान कोसळून झालेल्या अपघातानंतर अंतरिम सरकारने याची जबाबदारी घ्यावी अशी मागणी करत मंगळवारी संतप्त विद्यार्थ्यांनी केलेल्या निदर्शनांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. या अपघातात किमान 25 मुलांसह 31 जणांचा मृत्यू झाला आहे.

सोमवारी 12 वर्षांखालील मुले शाळेतून घरी परतत असताना चिनी बनावटीचे F7 बीजीआय हे बांगलादेश हवाई दलाचे विमान त्यांच्या शाळेत घुसले आणि आगीच्या भक्ष्यस्थानी पडले, ज्यामुळे तिथे उपस्थित असणारे विद्यार्थी आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

लष्कराने सांगितले की विमानात यांत्रिक बिघाड झाला होता.

अपघातस्थळी दोन सरकारी अधिकाऱ्यांनी भेट दिली तेव्हा शाळेतील विद्यार्थ्यांनी आणि जवळच्या महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांनी त्यांचा निषेध केला. त्यांनी मृतांची अचूक संख्या नेमकी किती आहे हे सांगण्याची मागणी केली आणि ओरड केली, “आमचे भाऊ का मरण पावले? आम्हाला उत्तरे हवी आहेत!”

स्थानिक टीव्ही फुटेजनुसार, राजधानीत इतरत्र, शेकडो निदर्शक विद्यार्थ्यांपैकी काही लाठ्या हातात घेऊन संघीय सरकारी सचिवालयाच्या मुख्य गेटवर घुसले आणि शिक्षण सल्लागाराचा राजीनामा मागितला.

पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार केला, अश्रुधूर सोडला तसेच ध्वनी ग्रेनेडचा वापर केला, ज्यामुळे डझनभर लोक जखमी झाले, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ढाका महानगर पोलिस उपायुक्त तालेबुर रहमान म्हणाले की निदर्शकांना पांगवण्यासाठी त्यांना अश्रुधुराचा वापर करावा लागला. या निदर्शनांमध्ये नेमके कितीजण जखमी झाले यांच्या नेमक्या संख्येबद्दल आपल्याकडे काहीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

बचावकार्य

मंगळवारही बचाव पथक जळलेल्या इमारतींमधून मृत अथवा‌ जखमींचा शोध घेत राहिले आणि परिसरातील रहिवासी हे पाहत होते. काही पालकांना सांत्वन मिळाले नाही.

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आपल्या नऊ वर्षांची मुलगी नुसरत जहाँ अनिकाबद्दल बोलताना अबुल हुसेन रडले. “मी दररोजप्रमाणे काल सकाळी तिला शाळेत घेऊन गेलो. मला कल्पना नव्हती की ही माझी शेवटची भेट असेल,” असं ते म्हणाले.

सोमवारी रात्री तिचे दफन करण्यात आले.

रुबिना अख्तर म्हणाली की तिचा मुलगा रैयान तौफिक जिन्यावरून चढत असतानाच त्याच्या शर्टला आग लागली, मात्र तो चमत्कारिकरित्या बचावला.

“तो तळमजल्यावर धावला आणि आग विझवण्यासाठी गवतावर उडी मारली,” ती म्हणाली. “त्याने त्याचा शर्ट आणि बनियान फाडून काढला, ज्यामुळे तो गंभीर भाजण्यापासून वाचला.”

लष्कराने सांगितले की, जेटने जवळच्या हवाई तळावरून नियमित प्रशिक्षण मोहिमेवर उड्डाण केले होते. यांत्रिक बिघाड झाल्यानंतर पायलटने गर्दीच्या ठिकाणांपासून विमान वळवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते कॅम्पसमध्ये कोसळले. मृतांमध्ये पायलटचाही समावेश होता.

मंगळवारी, लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे की शहरातील 31 जणांचा मृत्यू झाला असून 165 जणांना शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की 68 जण अजूनही रुग्णालयात आहेत आणि त्यापैकी 10 जणांची प्रकृती गंभीर आहे.

विद्यार्थ्यांच्या मागण्या

या घटनेनंतर सरकारने एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला, सर्व प्रार्थनास्थळांवरील झेंडे अर्ध्यावर आणले आणि विशेष प्रार्थनांचे आयोजन केले.

अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दलची बातमी ऐकून आपल्याला खूप दुःख झाले आहे असे पोप लिओ म्हणाले.  मृतांच्या कुटुंबियांच्याआ आणि मित्रांच्या दुःखात सांत्वन मिळावे आणि जखमींनी लवकर बरे व्हावे आणि त्यांच्या उपचारांसाठी प्रार्थना करावी असे निवेदन व्हॅटिकनने प्रसिद्ध केले आहे.

मृत आणि जखमींची नावे जाहीर करावीत, जुनी आणि धोकादायक विमाने रद्द करावीत तसेच हवाई दलाच्या प्रशिक्षण प्रक्रियेत बदल करावा अशी मागणी निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली.

देशाचे अंतरिम प्रशासक मुहम्मद युनूस यांच्या माध्यम कार्यालयातून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सरकार, लष्कर, शाळा आणि रुग्णालयाचे अधिकारी पीडितांची यादी प्रकाशित करण्यासाठी एकत्रपणे काम करत आहेत.

तसेच हवाई दलाला लोकसंख्या असलेल्या भागात प्रशिक्षण विमाने चालवू नयेत असे सांगण्यात येईल, असेही त्यात म्हटले आहे.

जेन्स इन्फॉर्मेशन ग्रुपच्या मते, F-7 BGI हा चीनच्या चेंगडू J-7/F-7 विमान परिवारातील शेवटचा आणि सर्वात प्रगत प्रकार आहे. बांगलादेशने 2011 मध्ये 16 विमानांसाठी करार केला होता आणि 2013 पर्यंत त्याची डिलिव्हरी पूर्ण झाली.

चेंगडू F-7 ही सोव्हिएत काळातील MiG-21 ची परवाना-निर्मित आवृत्ती आहे.

गेल्या महिन्यात अहमदाबादमधील एका मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहात एअर इंडियाचे विमान कोसळल्यानंतर भारत अजूनही या दशकातील जगामधील सर्वात वाईट विमान अपघाताचा सामना करत असताना ही घटना घडली आहे. अहमदाबाद अपघातात 242 प्रवाशांपैकी 241 आणि 19 नागरिकांचा मृत्यू झाला

गेल्या ऑगस्टमध्ये विद्यार्थ्यांच्या प्राणघातक निदर्शनांनंतर तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून पळून जावे लागले होते, त्यानंतर बांगलादेशला अनेक महिने राजकीय अनिश्चिततेचा सामना करावा लागला आहे.

नोबेल पुरस्कार विजेते युनूस यांच्या अंतरिम सरकारने राजकीय पक्षांच्या वाढत्या मागण्यांदरम्यान पुढील वर्षी निवडणुका घेण्याचे आश्वासन दिले आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleग्रीस आणि बाल्कनमध्ये उष्णतेची लाट; कामकाज, पर्यटन विस्कळीत
Next articleIndian Army Prioritizes Modernization of Rocket Artillery

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here