अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी शुक्रवारी चीनच्या राष्ट्राध्यक्षांवर आगामी अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत प्रभाव आणि हस्तक्षेप केल्याचा गंभीर आरोप केला आहे. अँटोनी ब्लिंकन म्हणाले की आम्ही यासंदर्भातील पुरावे पाहिले आहेत. यापूर्वी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनीही त्यांच्यावर निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचा आरोप केला होता.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटोनी ब्लिंकन तीन दिवसांचा चीन दौरा संपवून अमेरिकेला परतले आहेत. त्यानंतर त्यांनी चीनवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. ब्लिंकेन म्हणाले की, आगामी अमेरिकन निवडणुकांवर प्रभाव टाकणे आणि हस्तक्षेप करण्याच्या चीनच्या प्रयत्नांचे पुरावे आम्ही पाहिले आहेत. या आधी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी असे प्रयत्न न करण्याचे आश्वासन दिले होते.
अँटनी ब्लिंकन यांनी शुक्रवारी त्यांच्या चीन दौऱ्याचा समारोप करताना सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या दौऱ्याबद्दल सांगितले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सॅन फ्रान्सिस्को येथे झालेल्या शिखर परिषदेदरम्यान राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या संदेशाचा आपण यावेळी चीनच्या दौऱ्यात पुनरुच्चार केल्याचे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री म्हणाले. 2024च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत चीनने हस्तक्षेप करू नये असे बायडन यांनी त्यावेळी आवाहन केले होते.
चीनने आतापर्यंत आपल्या वचनबद्धतेचे उल्लंघन केले आहे का? मा प्रश्नाला उत्तर देताना ब्लिंकन म्हणाले, “आम्ही निवडणुकीत प्रभाव पाडण्याच्या आणि हस्तक्षेप करण्याच्या चीनच्या प्रयत्नांचे पुरावे पाहिले आहेत आणि हे शक्य तितक्या लवकर संपवले जाईल याची आम्हाला खात्री करायची आहे”. “आमच्या निवडणुकीत चीन हस्तक्षेप करत असल्याचे आम्ही पाहत आहोत आणि ते पूर्णपणे अस्वीकारार्ह आहे.
ब्लिंकन म्हणाले की, चीनची अर्थव्यवस्था किंवा तांत्रिक विकास थांबावा या हेतूने चीनकडे प्रगत संगणकीय चिप्स पाठवण्यावर बंदी घालण्यात आली नव्हती. एनव्हीडिया, ॲडव्हान्स्ड मायक्रो डिव्हाइसेस आणि इंटेलसारख्या कंपन्यांच्या विक्रीवर परिणाम होत असल्याने अमेरिकन सरकारने 2022 पासून चीनला काही संगणकीय चिप्स निर्यात करण्यावर बंदी घातली आहे. हे निर्बंध असूनही, अमेरिकेने इंटेल आणि क्वालकॉमला हुआवेईला चिप्स विकण्याची परवानगी दिली आहे.
आराधना जोशी