Beijing Floods: प्राणघातक पूरानंतर बीजिंगमध्ये रेड अलर्ट जारी

0

सोमवारी, चायनाच्या बीजिंगमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, डोंगराळ भागांतील बहुतेक जिल्ह्यांसाठी सर्वाधिक पातळीचा धोक्याचा इशारा (रेड अलर्ट) जारी करण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. 2012 नंतरच्या सर्वात भयानक पुरामुळे डझनभर जणांचा मृत्यू झाल्यानंतर हा इशारा देण्यात आला.

हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, दुपारपासून पुढील सहा तासांत बीजिंगच्या काही भागांत 200 मिमी (7.9 इंच) पर्यंत पाऊस पडू शकतो. सुमारे 2.2 कोटी लोकसंख्येच्या या शहरात वर्षभरात सरासरी 600 मिमी पावसाची नोंद होते.

डझनभर मृत्यू

गेल्या महिन्याच्या अखेरीस, बीजिंगमध्ये अनेक दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे किमान 44 लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. बहुतांश मृत्यू मीयुन जिल्ह्यातील एका वृद्धाश्रमात झाले, जिथे पाण्याची पातळी अचानक वाढल्यामुळे लोक अडकले गेले. या दुर्घटनेनंतर प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीतील त्रुटी स्वीकारल्या.

सोमवारी, बीजिंगमधील 16 पैकी 6 जिल्ह्यांना सर्वाधिक धोक्याचा इशारा दिला गेला, ज्यात मेंतोगोउ, फांगशान, फेंगताई, शिजिंगशान, हुआईरौ आणि चांगपिंग या पश्चिम आणि उत्तर डोंगराळ भागातील जिल्ह्यांचा समावेश आहे.

स्थानिक प्रशासनाने सांगितले की, “अचानक आलेल्या पूरामुळे दरडी कोसळण्याचा धोका अधिक आहे.”

2012 च्या उन्हाळ्यात, बीजिंगमध्ये आजवरचा सर्वात प्राणघातक पूर आला होता, ज्यात 79 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी फांगशान जिल्हा सर्वाधिक प्रभावित झाला होता, जिथे एका रहिवाशाने अवघ्या 10 मिनिटांत पाण्याची पातळी 1.3 मीटरने वाढल्याची नोंद केली होती.

‘पावसाचा सापळा’

बीजिंगच्या भौगोलिक रचनेला अनेकांनी ‘पावसाचा सापळा’ म्हटले आहे. पश्चिम व उत्तर डोंगररांगांमुळे आर्द्र हवा अडकते आणि त्यातून अधिक तीव्र पावसाची शक्यता निर्माण होते.

दक्षिण ग्वांगडोंग प्रांतातही रविवारी मोठ्या शोध मोहिमेनंतर पाच मृतदेह सापडले. ही कारवाई 1,300 हून अधिक बचावकर्मचाऱ्यांच्या सहभागाने झाली.

शुक्रवारी रात्री बेपत्ता झालेले पाच जण हे अचानक पावसामुळे आलेल्या पुराच्या प्रवाहात वाहून गेले, अशी माहिती अधिकृत शिन्हुआ वृत्तसंस्थेने रविवारी दिली.

हवामान बदलांमुळे होणारी अतिवृष्टी आणि उद्भवणारी तीव्र पूरस्थिती ही चिनी धोरणकर्त्यांसाठी (policymakers) मोठ्या प्रमाणात मोठी आव्हाने उभी करत आहे, असे हवामानशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleAkash Missile Talks in Focus as Marcos Lands in India
Next articleबोईंग: भारतातील संरक्षण व्यवसायासाठी अलेय पारिख यांची नियुक्ती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here