अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्या समर्थकांना विशेषतः भारतीयांना सुमारे साडेचार वर्षांत दुसऱ्यांदा अभिमान वाटावा यासाठी नवीन कारण मिळाले आहे.
20 जानेवारी 2021 रोजी उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेणारी पहिली महिला, पहिली कृष्णवर्णीय अमेरिकन आणि पहिली दक्षिण आशियाई अमेरिकन अशा कमला यांनी इतिहास घडवला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रविवारी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरुद्ध डेमोक्रॅटिक पक्षाकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून कमला यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर, कमला यांनी एक्सवर पोस्ट केले, “अध्यक्षांची शिफारस मिळणे हा मला सन्मान वाटतो आणि हे नामांकन मिळवण्याचा तसेच जिंकण्याचा माझा हेतू आहे.”
कमला हॅरिस या जमैकन आणि भारतीय वंशाच्या आहेत. निवडणुकीच्या दिवसापर्यंत (5 नोव्हेंबर 2024) 107 दिवस बाकी असताना, भारतीय पुन्हा एकदा कमला यांच्या कारकीर्द आणि कुटुंब याबद्दल असणाऱ्या विविध नोंदींची देवाणघेवाण करत आहेत.
2020 साली कमला पहिल्यांदा अध्यक्षपदासाठी उभ्या राहिल्या होत्या. मात्र निधीच्या कमतरतेचे कारण देत त्या या स्पर्धेतून बाहेर पडल्या.
कमला यांनी हॉवर्ड विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. हे विद्यापीठ संशोधन-केंद्रित, सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण, ऐतिहासिकदृष्ट्या कृष्णवर्णीय विद्यापीठ असल्याचे अभिमानाने जाहीर करते.
कमला यांचे राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाले असून हॉवर्डमधील “सुरुवातीच्या वर्षांमध्ये” आपल्याला राजकारण आवडते याचा त्यांना साक्षात्कार झाला.
हॉवर्ड विद्यापीठाच्या प्रतिष्ठित पदवीधरांमध्ये कमला यांचा समावेश करण्यात आला आहे.
त्या एका विद्यापीठातील प्रमुख ब्लॅक महिला क्लबच्या (अल्फा कप्पा अल्फा) सदस्य देखील आहेत.
1986 मध्ये पदवी शिक्षणानंतर, कमला यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठ, हेस्टिंग्ज कॉलेज ऑफ लॉमध्ये प्रवेश घेतला आणि 1989 मध्ये कायद्याची पदवी मिळवली.
त्यांची धाकटी बहीण माया यूसी बर्कले येथील पदवीधर असून स्टॅनफोर्डमधून कायद्याची पदवी मिळवली आहे.
व्हाईट हाऊसच्या संकेतस्थळावरील चरित्रात 59 वर्षीय उपराष्ट्रपतींची ओळख ‘फायटिंग फॉर द पीपल अँड डिलिव्हरिंग फॉर अमेरिका’ अशी करून देण्यात आली आहे.
कॅलिफोर्नियातील ओकलंड येथे जन्मलेल्या कमला एका वैविध्यपूर्ण समुदायात आणि एका प्रेमळ विस्तारित कुटुंबात वाढल्या.
त्यांचे आईवडील, डोनाल्ड जॅस्पर हॅरिस आणि श्यामला गोपालन हॅरिस हे स्थलांतरित होते. भारतीय आणि कृष्णवर्णीय अशा दोन संस्कृती आणि समुदायांना व्यापणाऱ्या स्थलांतरितांचे आयुष्य त्या जगल्या आहेत.
मूळ तामिळ असणारी त्यांची आई कर्करोग संशोधक होती, तर वडील जमैकन-अमेरिकन प्राध्यापक होते. त्यांचे वडील, वयाच्या 85 वर्षी, स्टॅनफोर्ड विद्यापीठात मानद प्राध्यापक आहेत.
त्या फक्त सात वर्षांच्या असताना त्यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. त्यांची आई प्राथमिक काळजीवाहू पालक होती. कमला आणि तिच्या बहिणीने भारतीय तसेच आफ्रिकन अमेरिकन संस्कृती आत्मसात केल्याची खात्री आईला होती.
कमला यांचे आजोबा (आईचे वडील) पी. व्ही. गोपालन हे सिव्हिल सर्व्हंट होते.
“मी लहान असताना भारतात माझ्या आजी-आजोबांना भेटायला जात असे, तेव्हा आजोबा आणि त्यांच्या मित्रांसोबत मी मॉर्निंग वॉकला समुद्रकिनाऱ्यावर जात असे, कारण तिथेच मला लोकशाही आणि नागरी हक्कांसाठी लढण्याचे महत्त्व सांगितले गेले होते. चालताना मिळालेल्या त्या ज्ञानाने मला आज मी जी काही आहे ती बनले,’’ असे कमला यांनी इंस्टाग्रामवर एका पोस्टमध्ये सांगितले जेथे त्यांचे 15.3 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.
कमला आणि त्यांची बहीण माया यांना त्यांच्या आईकडून प्रेरणा मिळाली होती, ती स्वतःच एक आदर्श होती. कमला यांची आई वयाच्या 19व्या वर्षी भारतातून अमेरिकेला आली आणि त्यानंतर कमला यांचा जन्म झाला त्याच वर्षी आईला डॉक्टरेट मिळाली.
कमला 12 वर्षांच्या असताना आई आणि बहिणीसोबत कॅनडाला गेल्या आणि क्यूबेकमध्ये त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.
त्यांचे आईवडील नागरी हक्क चळवळीत सक्रिय होते. त्यांनी सर्व लोकांच्या हक्कांसाठी आणि स्वातंत्र्यासाठी लढणारी मानसिकता कमला यांच्यात रुजवली.
2004 मध्ये, कमला सॅन फ्रान्सिस्कोच्या जिल्हा वकील म्हणून निवडून आल्या, तिथे त्या एलजीबीटीक्यू+ यांच्यासाठी असणाऱ्या हक्क चळवळीतील राष्ट्रीय नेत्या होत्या. सहा वर्षांनंतर, त्या कॅलिफोर्नियाच्या महाधिवक्ता म्हणून निवडून आल्या, तिथे त्यांनी देशातील सर्वात मोठ्या राज्य न्याय विभागाचा कार्यभार सांभाळला.
2017 मध्ये, त्यांनी युनायटेड स्टेट्स सिनेटमध्ये शपथ घेतली. इथे त्यांनी उपासमारीशी लढा देणे, भाडे सवलत प्रदान करणे आणि मातेच्या आरोग्य सेवेमध्ये सुधारणा करणे यांसाठी कायदा केला.
कौटुंबिक आयुष्याबरोबर आपल्या कारकीर्दीचा अतिशय सुंदर असा समतोल त्यांनी साधला आहे.
2014 मध्ये कमला यांनी डग्लस एमहॉफ या वकीलासोबत लग्न केले. एमहॉफ हे अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीचे पहिलेच पण ज्यू जोडीदार आहे. त्यांचे एक मोठे कुटुंब असून त्यात त्यांची मुले, डग्लसच्या पहिल्या पत्नीची मुले, एला आणि कोल यांचा समावेश आहे. ते दोघेही कमला यांना “मोमाला” म्हणतात.
एका मुलाखतीत, कमला यांनी सांगितले की त्या आणि एमहॉफ यांची पहिली पत्नी कर्स्टिन “प्रिय मैत्रिणी” आहेत.
आपल्या ‘एक्स’ हँडलवर, डग्लस यांनी नम्रतेने स्वतःची ओळख अमेरिकेचा सेकंड जेंटलमॅन म्हणून करून दिली आहे. त्याचबरोबर समर्पित वडील, उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचे अभिमानी पती असेही त्यात नमूद केले आहे.
2009 मध्ये कर्करोगामुळे कमला यांच्या आईचे निधन झाले. परंतु आपल्या आईचा सल्ला पूर्ण करण्यासाठी त्या वचनबद्ध आहे. “माझी आई माझ्याकडे बघायची आणि ती म्हणायची, ‘कमला, तू अनेक गोष्टी करणारी पहिली व्यक्ती असू शकतेस, पण तू शेवटची नाहीस याची खात्री कर.”
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होणे ही जरी त्यांची अत्यंत जवळची महत्त्वाकांक्षा असली, तरी कमला एका मुलाखतीत म्हणाल्या की, “पृथ्वीवरील कोणतेही पद किंवा सन्मान यापेक्षा मला मी श्यामला गोपालन हॅरिस यांची मुलगी आहे असे म्हणणे अधिक मोलाचे वाटेल.”
तृप्ती नाथ