जगातील सर्वात मोठे तोफ उत्पादक बनण्याचे भारत फोर्जचे उद्दिष्ट

0
जगातील

युरोपसह अनेक देशांना 18 प्रगत टोव आर्टिलरी गनसह (ATAGs) 100 तोफांचा पुरवठा भारत फोर्जने केला असल्याचे कंपनीचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. विशेष म्हणजे, भारतीय लष्कराकडे या तोफा सुपूर्द करण्यापूर्वीच कंपनीने या तोफा युरोपला निर्यात केल्या.

“गेल्या वर्षी आम्ही 18 एटीएजीसह 100 तोफा युरोपियन देशाला दिल्या,” असे कल्याणी यांनी स्पष्ट केले. “आम्ही तयार करत असलेल्या तोफांच्या प्रणाली संदर्भात जगभरातील देशांकडून स्वारस्य वाढत आहे,” असेही ते म्हणाले.

भारत आता केवळ देशांतर्गत अत्याधुनिक तोफांचे उत्पादन करण्यास सक्षम नाही तर युरोपसह विकसित देशांना यशस्वीरित्या निर्यातही करत आहे यावर त्यांनी भर दिला. “भारत एक विश्वासार्ह संरक्षण निर्यातदार म्हणून उदयास येत आहे हे पाहणे ही एक मोठी अभिमानाची भावना आहे,” असे ते म्हणाले. भारत फोर्जला या क्षेत्रात प्रचंड जागतिक संधी दिसत आहेत.

“2030 पर्यंत जगातील सर्वात मोठे तोफ उत्पादक बनण्याचे आमचे ध्येय आहे,” असे ते म्हणाले. “ते साध्य करण्यासाठी, आम्ही भरीव उत्पादन क्षमता निर्माण करत आहोत.”

भारत फोर्ज सध्या अल्ट्रालाइट हॉवित्जरसह (यूएलएच) तोफांच्या प्रणालींची विस्तृत श्रेणी तयार करत असून प्रगत क्षमतांसह पुढच्या पिढीच्या प्रणालींचा सक्रियपणे विकास करत आहे. “आम्ही अशा तोफांवर काम करत आहोत ज्या हालचाल करतानाही मारा करू शकतात,” असे कल्याणी यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले की, गेल्या वर्षी कंपनीच्या संरक्षण विक्रीमध्ये निर्यातीचा वाटा सुमारे 90 टक्के होता. या वर्षी निर्यातीचा महसूल सुमारे 80 टक्के राहण्याचा अंदाज आहे. “जागतिक संरक्षण बाजारपेठ आमच्यासाठी खुली होत आहे. अमेरिकन सैन्य, फ्रेंच सैन्य, ब्रिटिश सैन्य आणि इतर आघाडीच्या संरक्षण दलांसाठी विश्वासू पुरवठादार बनण्याची आमची महत्त्वाकांक्षा आहे,” असे ते म्हणाले.

जागतिक संरक्षण उत्पादनाच्या सध्याच्या स्थितीवर भाष्य करताना कल्याणी यांनी नमूद केले की अनेक देशांना संरक्षण उपकरणे आणि उत्पादन क्षमतेच्या तीव्र कमतरतेचा सामना करावा लागत आहे. “या देशांकडे निःसंशयपणे अत्याधुनिक तंत्रज्ञान असले तरी-जे बऱ्याचदा आपल्यापेक्षा श्रेष्ठ असते-खरे अडथळे उत्पादनात आहे. युक्रेनच्या युद्धात उपकरणांच्या मोठ्या प्रमाणात वापरामुळे पुनर्भरण करण्याची तातडीची गरज निर्माण झाली आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

टीम भारतशक्ती


Spread the love
Previous articleश्वेतवर्णिय आफ्रिकन्सना स्वतंत्र राज्यासाठी हवी ट्रम्प यांची मदत
Next articleभारतीय उद्योगांसाठी IAF कडून, आव्हाने आणि संधींचे सर्वसमावेशक संकलन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here