मध्यपूर्वेत संभाव्य युद्ध पेट घेणार आहे यावर आपला विश्वास नसल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सांगितले. इराणकडून त्याच्या कट्टर शत्रूवर करण्यात आलेल्या सर्वात मोठ्या हल्ल्यानंतर इस्रायल सूड उगवण्यासाठी विविध पर्यायांवर विचार करत असल्याच्या पार्श्वभूमीवर बायडेन यांचे वक्तव्य आले आहे.
मात्र बायडेन यांच्या मते, मध्यपूर्वेतील युद्ध टाळण्यासाठी आणखी काही प्रयत्न करण्याची गरज आहे, कारण इस्रायलच्या सैन्याने लेबनॉनच्या सशस्त्र गट हिज्बुल्लाहविरुद्धच्या लढाईत आता बैरुतवर नव्याने हवाई हल्ले करायला सुरुवात केली आहे.
हे युद्ध टाळता येईल यावर तुमचा किती विश्वास आहे, असे गुरुवारी विचारले असता बायडेन म्हणाले, “पाऊस पडणार नाही याची तुम्हाला किती खात्री आहे? संपूर्ण युद्ध होणार आहे यावर माझा विश्वास नाही. मला वाटते की आपण ते टाळू शकतो.”
“मात्र त्यासाठी अजून खूप काही करायचे आहे, अजून खूप काही करायचे आहे.”
अमेरिका, युरोपियन युनियन आणि इतर मित्र राष्ट्रांनी याआधीच इस्रायल लेबनॉन संघर्षात 21 दिवसांच्या तात्काळ युद्धबंदीची मागणी केली आहे. दरम्यान, बायडेन म्हणाले की, तेहरानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिका इस्रायलशी त्याबाबतच्या पर्यायांवर चर्चा करत आहे. यामध्ये इस्रायलने इराणच्या तेल सुविधांवर केलेल्या हल्ल्याचाही समावेश आहे.
बायडेन यांनी पत्रकारांना सांगितले की, आम्ही त्यावर चर्चा करत आहोत.
कच्च्या तेलाच्या किंमतींवर परिणाम
त्यांच्या टिप्पण्यांमुळे जागतिक तेलाच्या किंमती वाढल्या असून मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे व्यापाऱ्यांना पुरवठ्यात निर्माण होऊ शकणाऱ्या संभाव्य अडथळ्यांबद्दल चिंता वाटू लागली.
मात्र बायडेन यांच्या मते,”सध्या काहीही होणार नाही.” इराणच्या तेल आस्थापनांवर हल्ला न करण्याचे आवाहन ते इस्रायलला करत आहेत का, असे विचारले असता बायडेन म्हणाले की ते सार्वजनिकरित्या वाटाघाटी करणार नाहीत.
इराणच्या आण्विक स्थानांवर इस्रायलने केलेल्या कोणत्याही हल्ल्याला आपण पाठिंबा देणार नसल्याचे, अध्यक्षांनी बुधवारी स्पष्ट केले.
मतमतांतरांचा गलबला
गुरुवारी, संयुक्त राष्ट्रातील इस्रायलचे राजदूत डॅनी डॅनन यांनी त्यांच्या देशाकडे बदला घेण्यासाठी “बरेच पर्याय” असल्याचे स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की इस्रायल इराणला “लवकरच” आपली ताकद दाखवेल.
अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, इराणला कसे प्रत्युत्तर द्यायचे याचा अंतिम निर्णय इस्रायलने घेतला आहे, यावर वॉशिंग्टनचा विश्वास नाही.
इराण-समर्थित हिजबुल्लाहचा बालेकिल्ला असलेल्या बैरुतच्या दक्षिणेकडील दहिये उपनगरात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुन्हा एकदा हल्ले सुरू झाले. नागरिक आणि सुरक्षा सूत्रांनी सांगितले की, इस्रायलने काही भागातील लोकांना त्यांची घरे सोडण्याचे आदेश दिल्यानंतर हे हल्ले करण्यात आले.
रविवारी करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात ठार झालेला हिजबुल्लाहचा सर्वेसर्वा हसन नरसल्लाहचा उत्तराधिकारी म्हणून हाशेम सफीद्दीनच्या नावाची चर्चा होती. तो ज्या भूमिगत बंकरमध्ये होता त्या ठिकाणाला लक्ष्य करत काल रात्री हवाई हल्ले करण्यात आले असे तीन इस्रायली अधिकाऱ्यांचा हवाला देऊन एका वृत्तात म्हटले आहे.
या हल्ल्यात सफीद्दीन मारला गेल्याचे म्हटले जाते.
मात्र इस्रायलच्या सैन्याने यावर प्रतिक्रिया देण्याचे नाकारले.
हिजबुल्लाहकडून होणारे हल्ले
हिजबुल्लाहने गुरुवारी लेबनॉनमधून इस्रायलच्या दिशेने सुमारे 230 रॉकेट्स सोडल्याचे इस्रायलने सांगितले.
उत्तर इस्रायलच्या भूमध्य सागरी किनाऱ्यावरील हैफा खाडीतील इस्त्रायलचा लष्करी तळ ज्याला “सखनिन तळ” असे म्हणतात त्याला लक्ष्य करत हिजबुल्लाहने सातत्याने रॉकेट हल्ले केले.
गुरुवारी उशिरा, हिजबुल्लाहने सांगितले की त्यांनी हैफामधील इस्रायलच्या “नेशर तळ” ला फदी 2 रॉकेटमधून सतत मारा करत लक्ष्य केले.
संयम राखण्याचे जी7 चे आवाहन
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मंगळवारच्या क्षेपणास्त्र हल्ल्याची किंमत इराणला मोजावी लागेल, अशी शपथ घेतली आहे. इराणला याचे “गंभीर परिणाम” भोगावे लागतील याची खात्री करण्यासाठी आपल्या अतिशय जुन्या मित्राबरोबर आपण काम करू, असा इशारा अमेरिकेने दिला आहे.
इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी गुरुवारी दोहा येथे बोलताना आपण प्रत्युत्तर देण्यास तयार असल्याचे सांगितले.
“कोणत्याही प्रकारचा लष्करी हल्ला, दहशतवादी कृत्य किंवा लाल रेषा ओलांडल्यास आमच्या सशस्त्र दलांकडून निर्णायक प्रत्युत्तर दिले जाईल,” असा इशारा त्यांनी दिला.
गाझा या पॅलेस्टिनी भूभागात जवळपास वर्षभरापासून हमासशी लढा देत असलेल्या इस्रायलने मंगळवारी दक्षिण लेबनॉनमध्ये सैन्य पाठवले. इराणमध्ये दोन आठवड्यांच्या तीव्र हवाई हल्ल्यांनंतर अमेरिका यात सहभागी होऊ शकण्याच्या वाढलेल्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.
युद्धबंदीचे आवाहन
अमेरिका, ब्रिटन आणि मित्र राष्ट्रांचा समावेश असलेल्या सात राष्ट्रांच्या गटाने गुरुवारी इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा निषेध केला आणि इस्रायलच्या सुरक्षेसाठी त्यांच्या वचनबद्धतेची परत एकदा खात्री दिली.
मात्र सोबतच या गटाने संयम, गाझामध्ये युद्धविराम आणि लेबनॉनमधील शत्रुत्व थांबविण्याचे आवाहन केले.
“हल्ले आणि प्रत्युत्तराचे एक धोकादायक चक्र मध्यपूर्वेतील अनियंत्रित युद्धास उत्तेजन देते, जे कोणाच्याही हिताचे नाही,” असे एका निवेदनात म्हटले आहे.
कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल-थानी यांनी देखील इस्रायलची आक्रमकता थांबवण्यासाठी गंभीरपणे युद्धविरामासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
इस्रायलसाठी आणखी शस्त्रे?
अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज फॉरेन अफेयर्स कमिटीच्या अध्यक्षांनी गुरुवारी राष्ट्राध्यक्षांना इस्रायलला शस्त्रे पाठवण्याचा वेग वाढवण्याची विनंती केली. यात मानवी हक्कांच्या चिंतेमुळे अनेक महिने रोखून ठेवलेले 2हजार-पाऊंड (907 किलो) बॉम्बचा समावेश आहे.
एक 2हजार पाऊंड बॉम्ब जाड काँक्रीट आणि धातू फोडून पुढे जाऊ शकतो, ज्यामुळे स्फोटाची एक विस्तृत त्रिज्या तयार होते.
प्रतिनिधी मायकेल मॅकॉल यांनी बायडेन यांना पाठवलेल्या पत्रात, हमास आणि हिजबुल्लाहने खोलवर तयार केलेले भूगर्भीय बंकर आणि बोगदे वापरत असल्याने असे मोठे बॉम्ब ऑपरेशनसाठी आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. हे पत्र रॉयटर्सच्या प्रतिनिधीनेही बघितले आहे.
हिजबुल्लाहचे दावे
गाझा युद्धादरम्यान हिजबुल्लाहने केलेल्या बॉम्बस्फोटानंतर इस्रायलच्या उत्तरेकडील नागरिकांना स्थलांतर करावे लागले होते. हे हजारो नागरिक आता लेबनॉनमधील आपल्या कारवायांमुळे घरी परतण्याचा प्रयत्न करत असल्याचे इस्रायलचे म्हणणे आहे.
इस्रायली हल्ल्यांमुळे 1.2 दशलक्षाहून अधिक लेबनीज नागरिक विस्थापित झाले असून गेल्या वर्षभरात लेबनॉनवर इस्रायली हल्ले सुरू झाल्यापासून जवळपास 2 हजार लोक मारले गेले आहेत, त्यापैकी बहुतांश गेल्या दोन आठवड्यांत झालेल्या हल्ल्यांमध्ये मारले गेल्याचे लेबनीज अधिकाऱ्यांनी सांगितले.
शुक्रवारी पहाटे, लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की गुरुवारच्या हल्ल्यात 27 लोक ठार झाले असून 151 जखमी झाले.
इस्रायली सैन्याने जमिनीवरून केलेल्या अनेक कारवाया जसे की दबा धरून मग अचानक हल्ला करणे आणि थेट चकमकी करणे यांना चोख प्रत्युत्तर दिल्याचे हिजबुल्लाहने म्हटले आहे.
गुरुवारी दक्षिण लेबनॉनमधील लढाईत 17 इस्रायली लष्करी कर्मचारी मारल्याचा दावा या गटाने केला आहे. इस्रायली सैन्याने या दाव्यावर भाष्य केले नाही.
पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, व्याप्त वेस्ट बँकमधील तुलकर्म निर्वासित शिबिरात गुरुवारी इस्त्रायली हल्ल्यात किमान 18 लोक ठार झाले तर इस्रायलने सांगितले की तुलकर्ममध्ये हमासचा एक अधिकारी मारला गेला.
ऐश्वर्या पारीख
(रॉयटर्स)