ब्राह्मोसची भरारी: भारत आसियान राष्ट्रांना क्षेपणास्त्रे निर्यात करण्यासाठी सज्ज

0

भारत या वर्षाच्या अखेरीस, दोन आसियान देशांसोबत ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र प्रणालींचा प्रमुख संरक्षण निर्यात करार अंतिम करण्याच्या तयारीत आहे. वरिष्ठ संरक्षण आणि सुरक्षा अधिकाऱ्यांनी या गोष्टीची पुष्टी करत सांगतिले की, करारासंदर्भातील वाटाघाटी अंतिम टप्प्यात पोहचल्या असून, दोन्ही करारांवर डिसेंबरमध्ये अंतिम स्वाक्षरी होण्याची अपेक्षा आहे.

जर हे करार वेळेत पूर्ण झाले तर, ते भारताच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या संरक्षण निर्यात करारांपैकी एक असतील आणि प्रगत शस्त्र प्रणालींचा जागतिक पुरवठादार म्हणून भारताच्या वाढत्या भूमिकेत एक महत्त्वाचा टप्पा ठरतील. या करारांमुळे, इंडो-पॅसिफिकमध्ये भारताचा राजनैतिक आणि सुरक्षा प्रभाव वाढेल, तसेच देशांतर्गत संरक्षण उत्पादनाला आणि निर्यातीला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.

वाढत्या प्रादेशिक मागणीसह एक सिद्ध प्रणाली

भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि रशियाच्या एनपीओ मशिनोस्ट्रोयेनिया कंपनीने संयुक्तरित्या विकसित केलेल्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राने भारतीय लष्कर, नौदल आणि वायुसेनेतील तैनातीद्वारे आधीच आपली क्षमता सिद्ध केली आहे.

हे क्षेपणास्त्र मॅक 3 पर्यंत वेगाने उड्डाण करण्यास आणि सध्या 400 किलोमीटरच्या पलीकडील लक्ष्यांवर अचूक हल्ला करण्यास सक्षम आहे. जमीन, हवा आणि समुद्र या तिन्ही प्लॅटफॉर्मवरून हे मिसाईल डागले जाऊ शकते आणि त्याची हीच क्षमता त्याला त्याच्या श्रेणीमध्ये अतुलनीय लवचिकता प्रदान करते.

ब्राह्मोसची पहिली आंतरराष्ट्रीय विक्री 2022 मध्ये झाली, जेव्हा फिलिपिन्सने किनारी संरक्षण बॅटरीसाठी $375 million चा करार निश्चित केला. प्रणालींचे यशस्वी वितरण आणि कार्यक्षमतेमुळे, आपल्या सागरी आणि प्रादेशिक संरक्षण क्षमता मजबूत करू इच्छिणाऱ्या,  या प्रदेशातील अनेक देशांमध्ये त्यांच्या सागरी आणि प्रादेशिक संरक्षण क्षमता मजबूत करण्याच्या प्रयत्नात स्वारस्य निर्माण झाले आहे.

विश्लेषकांचे म्हणणे आहे की, फिलिपाइन्सच्या सेवेतील या क्षेपणास्त्राच्या कार्यक्षमतेने, शस्त्रास्त्र निर्यातदार म्हणून भारताच्या विश्वासार्हतेचे थेट प्रदर्शन केले आहे.

एका वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्याने सांगितले की- “मनिलासोबतचा ब्राह्मोस करार हे दर्शवितो की, भारत एक उच्च-श्रेणीची आणि लढाईत सिद्ध झालेली क्षेपणास्त्र प्रणाली, वेळेवर आणि पूर्ण तांत्रिक समर्थनासह वितरित करू शकतो. या यशाने शेजारी राज्यांनी समान भागीदारी शोधण्यासाठी थेट प्रेरणा दिली आहे.”

आसियान देश ब्राह्मोसला का प्राधान्य देत आहेत?

प्रादेशिक जलक्षेत्रातील वाढता तणाव आणि प्रादेशिक दाव्यांच्या पार्श्वभूमीवर, अनेक आग्नेय आशियाई देश त्यांची सागरी सुरक्षा आणि प्रतिबंधक क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. ब्रह्मोस हे जलद प्रतिसाद देणारे, अचूक हल्ला करणारे क्षेपणास्त्र आहे, जे किनारी संरक्षण आणि नौदल ऑपरेशन्ससाठी सर्वोत्तम पर्याय आहे.

ब्राह्मोसचा वेग, कमी उंचीवरून उडण्याची त्याची क्षमता आणि पारंपरिक हेव्ही पेलोड यांचा संगम, त्याला अधिक शक्तीशाली बनवतो आणि शत्रूच्या नौदल हालचालींविरुद्ध त्याला एक मजबूत प्रतिद्वंद्वी म्हणून उभे करतो. याव्यतिरिक्त, त्याच्या देखभालासाठी लागणारा कमी खर्च आणि प्रशिक्षण, रसद आणि दीर्घकालीन समर्थन देण्याची भारताची तयारी, यामुळे ते अधिक महागड्या पाश्चात्य प्रणालींना एक आकर्षक पर्याय ठरतो.

प्रादेशिक हितसंबंधांना चालना देणारा आणखी एक घटक म्हणजे भारताची धोरणात्मक तटस्थतेची प्रतिष्ठा. लष्करी युतींशी जोडलेल्या पुरवठादारांप्रमाणे, भारत राजकीय किंवा ऑपरेशनल अटी लादल्याशिवाय प्रगत शस्त्रे पुरवतो, ज्यामुळे भागीदार राष्ट्रांना त्यांची धोरणात्मक स्वायत्तता जपता येते.

औद्योगिक गती आणि आर्थिक परिणाम

अपेक्षित निर्यात करारामुळे, भारताच्या देशांतर्गत संरक्षण उद्योगाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. लखनऊमध्ये नुकत्याच उद्घाटन झालेल्या ब्राह्मोस इंटिग्रेशन आणि चाचणी सुविधेची रचना, प्रतिवर्षी 100 क्षेपणास्त्रे तयार करण्याच्या क्षमतेनुसार करण्यात आली आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या मते, “ब्राह्मोस क्षेपणास्त्र ही केवळ एक शस्त्र प्रणाली नाही; ते उच्च-श्रेणीच्या संरक्षण उत्पादनामध्ये भारताची तांत्रिक परिपक्वता आणि आत्मनिर्भरता दर्शवते.” सिंह यांनी अलीकडेच सांगितले की, ‘क्षेपणास्त्राच्या निर्यात यशातून भारताच्या स्वदेशी क्षमतेवरील जागतिक विश्वास दिसून आला आणि आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र बाजारपेठेत देशाची वाढती उपस्थिती अधोरेखित झाली.”

भारताचे संरक्षण निर्यात धोरण मजबूत करणे

अलीकडील काही वर्षांमध्ये, भारताच्या संरक्षण निर्यातीमध्ये मोठी वाढ झाली आहे, जी आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 2.76 बिलियन युएसडी डॉलरपर्यंत पोहोचली आहे, ही विक्रमी वाढ मागील वर्षाच्या तुलनेत 12% ने जास्त आहे. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत तयार करण्यात आलेली संरक्षण उत्पादने, 100 हून अधिक देशांमध्ये निर्यात केली जात आहेत आणि ब्राह्मोस सारख्या मोठ्या करारांमुळे या गतीला आणखी गती मिळण्याची अपेक्षा आहे.

सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमामुळे आणि 2020 च्या सुधारित संरक्षण संपादन प्रक्रियेमुळे, एक मजबूत देशांतर्गत संरक्षण परिसंस्था तयार करण्यास मदत झाली आहे. ही धोरणे स्वदेशी डिझाईन आणि उत्पादनाला प्राधान्य देतात, काही आयातींवर निर्बंध घालतात आणि खाजगी क्षेत्राच्या सहभागाला प्रोत्साहन देतात, ज्यामुळे शाश्वत निर्यात वाढीचा पाया रचला.

ब्रह्मोस कार्यक्रमाचे यश हे दर्शवते की, सार्वजनिक संस्था आणि खाजगी उद्योगांमधील सहयोगी नवोन्मेष, भारताच्या संरक्षण क्षेत्राला खरेदीदारापासून जागतिक पुरवठादारामध्ये कसे रूपांतरित करू शकतो. प्रत्येक नवीन निर्यात ऑर्डर अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात योगदान देते, तसेच पुरवठा साखळीतील लघु आणि मध्यम उद्योगांना समर्थन देते आणि संरक्षण बाजारपेठेत भारताचे ब्रँड मूल्य वाढवते.

भू-राजकीय आणि धोरणात्मक प्रभावाचा विस्तार

आर्थिक फायद्यांव्यतिरिक्त, ब्रह्मोस क्षेपणास्त्रांच्या निर्यातीला मोठे भू-राजकीय महत्त्व आहे. मित्र राष्ट्रांना अचूक हल्ला करणारी प्रणाली पुरवून, भारत सुरक्षा भागीदारी मजबूत करतो आणि प्रादेशिक स्थिरतेत योगदान देतो. हे भारताच्या नेव्हिगेशन स्वातंत्र्य सुनिश्चित करण्यात आणि इंडो-पॅसिफिकमध्ये जबरदस्तीच्या कृती रोखण्यात मोठी भूमिका बजावण्याची तयारी दर्शवते.

आगामी आसियान करार, हे भारताच्या व्यापक ‘ॲक्ट ईस्ट धोरणा’चा भाग म्हणून पाहिले जातात, ज्यामुळे आग्नेय आशियाई देशांशी संरक्षण आणि धोरणात्मक संबंध अधिक दृढ होतात. खरेदी करणाऱ्या राष्ट्रांसाठी, हे करार त्यांच्या प्रतिबंधात्मक आणि पाळत ठेवण्याच्या क्षमतांना लक्षणीयरित्या अपग्रेड करतात. भारतासाठी ते जबाबदार, विश्वासार्ह आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत संरक्षण भागीदार म्हणून त्याची प्रतिमा अधिक मजबूत करतात.

दोन्ही आसियान राष्ट्रांसोबतचे हे ब्रह्मोस निर्यात करार जेव्हा अंतिम होतील, तेव्हा ते भारताच्या संरक्षण निर्यात प्रवासातील हे एक मोठे पाऊल असेल. हे करार भारताच्या तांत्रिक पराक्रमाला प्रमाणित करतील, औद्योगिक आधार वाढवतील आणि जगातील सर्वात धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या प्रदेशांपैकी एकामध्ये आपला प्रभाव प्रक्षेपित करतील.

जगातील सर्वात वेगवान क्रूझ क्षेपणास्त्र ब्राह्मोस, आग्नेय आशियातील नवीन शस्त्रागारांमध्ये प्रवेश करण्यास सज्ज असताना, भारत संरक्षण मुत्सद्देगिरी आणि औद्योगिक शक्तीच्या एका नवीन युगाच्या उंबरठ्यावर उभा आहे.

मूळ लेखिका- हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleIndia Fast-Tracks Military Modernisation Post Operation Sindoor: DAC Approves Proposals Worth Rs 79,000 Crore
Next articleNaval Commanders’ Conference: Navy Created Deterrent That Kept Pakistan Near Its Coast: Rajnath Singh

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here