मानवी तस्करीची वाढती चिंता; ब्राझील, दक्षिण आफ्रिकेचा अमेरिकेशी सामना

0

ट्रम्प प्रशासनासोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, सोमवारी अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही देशांना, मानवी तस्करीच्या वॉच लिस्टमध्ये टाकले, कारण आतापर्यंत त्यांनी या समस्येचे निवारण करण्यासाठी पुरेशी प्रगती केलेली नाही.

दरवर्षी, मानवी तस्करी संबंधी एक अहवाल प्रसिद्ध केला जातो, ज्यामध्ये जगभरातील सक्तीचे श्रम लैंगिक तस्करी आणि आधुनिक गुलामगिरीच्या अन्य प्रकारांना तोंड देण्यासाठी केल्या गेलेल्या सर्व प्रयत्नांचे मूल्यांकन केले जाते.

हा अहवाल, अमेरिकन काँग्रेसकडे सादर करायचा असतो, मात्र ज्या कार्यालयात तो तयार केला जातो, तेथील बहुतांशी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्यामुळे, सदर अहवाल जवळपास तीन महिन्यांच्या विलंबानंतर, सोमवारी प्रकाशित करण्यात आला.

‘टियर 2 वॉच लिस्ट’मध्ये ब्राझील, द.आफ्रिकेचा समावेश

या अहवालाच्या ‘टियर 2 वॉच लिस्टमध्ये’, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेला सामाविष्ट करण्यात आल्यामुळे, त्यांना तस्करीविरोधी प्रयत्नांत अधिक जोर लावावा लागेल, अन्यथा अमेरिकेच्या संभाव्य निर्बंधांचा त्यांना सामना करावा लागेल.

दोन्ही देशांनी, मानवी तस्करी रोखण्याबाबात केलेल्या काही महत्वाच्या हालचालींची, अहवालात नोंद असली, तरी हे प्रयत्न पुरेसे नसल्याचे त्यात म्हटले गेले आहे.

दक्षिण आफ्रिकेसंदर्भातील अहवालात नमूद केले आहे की: देशाने केलेल्या महत्वपूर्ण प्रयत्नांमध्ये, देशातील पहिले उप-प्रांतीय कार्य दल सुरू करणे आणि जास्त तस्करांना दोषी ठरवणे यांचा समावेश आहे. मात्र, सरकारने प्रत्यक्षातील आकडेवारीपेक्षा, कमी पीडितांची ओळख पटवली आहे, कमी प्रकरणांची चौकशी केली आणि तुलनेने कमी खटले दाखल केले.”

तर, ब्राझील सरकारबद्दल अहवालात म्हटले आहे की: गेल्यावर्षीच्या तुलनेत, त्यांनी कमी तपास कार्ये केली आहेत आणि कमी खटले दाखल केले आहेत. तसेच न्यायालयांनी तस्करीसाठी दोषी ठरवलेल्या आरोपींची संख्यादेखील तुलनेने कमी आहे.

ट्रम्प यांचे आरोप

या पार्श्वभूमीवर, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणताही ठोस पुरावा नसताना देखील, दक्षिण आफ्रिकेवर, तिथल्या श्वेत वर्णीय अल्पसंख्याकांचा छळ केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील श्वेत वर्णीय लोकांसाठी, एक शरणार्थी कार्यक्रम सुरू केला आहे असून, देशावर अतिरिक्त शुल्क देखील लादले आहेत.

दुसरीकडे ट्रम्प यांनी, त्यांचे जवळचे मित्र असलेले माजी राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांच्या खटल्यासंदर्भात आणि शिक्षेच्या प्रतिसादात, ब्राझीलवर शुल्क तसेच व्हिसा आणि आर्थिक निर्बंध लादले आहेत.

परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ, यांनी एका निवेदनात म्हटले आहे की: “मानवी तस्करी हा एक गंभीर आणि विनाशकारी गुन्हा आहे, ज्यामुळे काही आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी संस्था आणि अनैतिक कार्य करणाऱ्या अमेरिका-विरोधी राजवटींचा आर्थिक फायदा होतो. त्यामुळे, ट्रम्प प्रशासन अमेरिकेची मूल्ये जपण्यासाठी, अमेरिकेतील कामगारांचे संरक्षण करण्यासाठी आणि आमच्या समुदायांचा बचाव करण्यासाठी सदैव कार्यरत आहेत.”

रुबिओ यांच्या या निवेदनात, देश-विशिष्ट क्रमवारीवर  चर्चा करण्यात आली नव्हती.

मागील काही वर्षांमध्ये, परराष्ट्र विभागाचे अधिकारी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी उपलब्ध असायचे, परंतु यावर्षी कोणीही उपलब्ध नव्हते.

या महिन्याच्या सुरुवातीलाच, डेमोक्रॅटिक पक्षाच्या कायदेकर्त्यांनी, TIP (Trafficking in Persons) अहवाल  प्रसिद्ध होण्यास झालेल्या विलंबाबद्दल चिंता व्यक्त केली होती.

व्यवस्थापन आणि संसाधनांसाठी उप-परराष्ट्र सचिव- मायकल रिगस यांनी, जुलैमध्ये काँग्रेससमोर साक्ष दिली होती की, “या वर्षाच्या सुरुवातीला, परराष्ट्र विभागाने 1,300 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यात आल्यामुळे, अहवाल तयार करणाऱ्या ‘ऑफिस टू मॉनिटर अँड कॉम्बॅट ट्रॅफिकिंग इन पर्सन्स’ या कार्यालयातील कर्मचारी संख्या 71% ने कमी झाली आहे.”

अमेरिकेच्या प्रतिनिधी सारा मॅकब्राईड, यांना कर्मचारी कपातीबद्दल प्रश्न विचारला असता, रिगस यांनी बचाव करताना सांगितले की: “ज्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे, ते मुख्यतः अहवाल लिहिण्याच्या कामात सहभागी होते.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleचीनच्या “K” व्हिसामुळे सोशल मीडियावर वादळ, भारतावरही निशाणा
Next articleFrom Operation Sindoor to Future-Ready Forces: Rajnath Singh Calls Jointness a ‘Matter of Survival’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here