ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी रविवारी (पूर्वीचे ट्विटर) एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या मालकाची चौकशी सुरू केल्यानंतर एलोन मस्क आणि ब्राझीलमधील तणाव वाढला आहे. न्यायमूर्ती अलेक्झांडर डी मोरेस यांनी एक्सवरील काही खाती गोठवण्याच्या (ब्लॉक) दिलेल्या आदेशांचे उल्लंघन करून मस्क यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली ती खाती पुन्हा सुरू केल्याच्या प्रकणाची चौकशी झाली आहे.
जर एक्सने ही खाती ब्लॉक करण्याच्या आदेशाचे पालन केले नाही, तर कंपनीला दररोज 1लाख रियाज (19 हजार 740 डॉलर्स) दंड आकारला जाईल, असे न्यायाधीशांनी माध्यमांना जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
मस्क यांनी यापूर्वीच एक्सच्या माध्यमातून न्यायमूर्ती मोरेस यांच्यावर शाब्दिक हल्ल्यांची मालिका सुरू केली आहे. एका ट्विटमध्ये ते म्हणाले, “या न्यायाधीशांनी निर्लज्जपणे आणि वारंवार संविधान तसेच ब्राझीलच्या लोकांचा विश्वासघात केला आहे. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे किंवा त्यांच्यावर महाभियोग घटला चालवला पाहिजे.” न्यायमूर्तींनी कोणती खाती ब्लॉक करायचे आदेश दिले होते याचा तपशील मस्क, न्यायमूर्ती मोरेस किंवा ब्राझीलच्या अधिकाऱ्यांनी उघड केलेला नाही.
मस्क यांनी शनिवारी पहिल्यांदा एक्सवर ब्राझील न्यायालयाच्या निकालाबद्दल पोस्ट टाकली होती, परंतु निर्णय प्रत्यक्षात नेमका कधी जारी करण्यात आला हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार माजी अति-उजव्या विचारसरणीचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांच्या सरकारच्या काळात खोट्या बातम्या आणि द्वेषयुक्त संदेश पसरवल्याचा आरोप असलेल्या ‘डिजिटल मिलिशिया’ची मोरेस चौकशी करत असल्याचे मानले जाते. बोल्सोनारोच्या कथित सत्तापालटाचे झालेले प्रयत्न यासाठी नेमलेल्या चौकशी समितीचेही तेच नेतृत्व करत आहेत. द गार्डियनच्या वृत्तानुसार माजी अध्यक्षांनी ऑक्टोबर 2022 ची निवडणूक हरल्यास बंडखोरी करण्याची योजना लष्करी अधिकाऱ्यांना सादर केली होती अशी साक्ष ब्राझील लष्कराच्या दोन माजी कमांडरांनी दिली आहे.
मस्क यांच्या ट्विट्समध्ये असेही म्हटले आहे की, “या न्यायाधीशांनी प्रचंड दंड ठोठावला आहे. याशिवाय आमच्या कर्मचाऱ्यांना अटक करण्याची आणि ब्राझीलमध्ये एक्सवर प्रतिबंध घालण्याची धमकी दिली आहे.”
“परिणामी, आम्हाला कदाचित ब्राझीलमधील सर्व महसूल गमवावा लागेल आणि तिथे आमचे कार्यालय बंद करावे लागेल. पण नफ्यापेक्षा तत्त्वे अधिक महत्त्वाची आहेत.”
मस्क यांच्याविरुद्ध न्यायाधीशांनी घेतलेल्या भूमिकेचे सरकारने समर्थन केले आहे. राष्ट्रपती लुला यांच्या सरकारने मोरेस यांना पाठिंबा दर्शविला आहे. सॉलिसिटर जनरल जॉर्ज मेसियस यांनी मस्क यांच्यावर टीका केली असून परदेशी प्लॅटफॉर्मना ब्राझीलच्या कायद्यांचे उल्लंघन करण्यापासून रोखण्यासाठी त्यांनी सोशल मीडिया नेटवर्कचे नियमन करावे असे आवाहन केले आहे.
मेसियस यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आपण अशा समाजात राहू शकत नाही जिथे परदेशात स्थायिक असलेल्या अब्जाधीशांचे सोशल नेटवर्क्सवर नियंत्रण असते आणि ते सर्रास कायद्याचे उल्लंघन करत असतात, न्यायालयाच्या आदेशांचे पालन करण्यात अयशस्वी ठरतात आणि आमच्या अधिकाऱ्यांना धमकावतात.”
2024 मध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, ब्राझीलमध्ये लॅटिन अमेरिकेतील सर्वात जास्त लोकसंख्या आणि ऑनलाइन प्रेक्षक आहेत. एकाच वेळी ब्राझिल ही जगभरातील पाचवी सर्वात मोठी सोशल मीडिया बाजारपेठ, अमेरिकेतील दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ आणि लॅटिन अमेरिकन उपखंडातील आतापर्यंतची सर्वात मोठी बाजारपेठ आहे.
अश्विन अहमद
(रॉयटर्सच्या इनपुटसह)