केरळमध्ये ब्रिटिश अभियंत्यांकडून, F-35B जेटच्या दुरुस्तीला सुरुवात…

0

ब्रिटिश रॉयल नेव्हीच्या F‑35B स्टेल्थ फायटर जेटच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात झाली असून, ब्रिटिश एव्हिएशन अभियंत्यांची एक टीम भारतातच विमानाची दुरुस्ती करणार आहे. गेल्या महिन्यात या विमानाने केरळमध्ये आपत्कालीन लँडिंग केले होते. हे अत्याधुनिक फायटर विमान आता तांत्रिक कामासाठी देखभालीसाठी आणि दुरुस्तीसाठी हँगरमध्ये हलवण्यात आले आहे.

“विमानाची दुरुस्ती सुरू झाली आहे आणि त्याकरता ते देखभाल हॅंगरमध्ये हलवण्यात आले आहे. आम्ही भारतीय अधिकाऱ्यांच्या सततच्या सहकार्याबद्दल आणि सहयोगाबद्दल आभारी आहोत,” असे ब्रिटिश उच्चायुक्तालयाच्या प्रवक्त्याने सोमवारी (7 जुलै 2025) सांगितले.

ही घडामोड जवळपास तीन आठवड्यांच्या अनिश्चिततेनंतर घडली आहे. यूकेच्या HMS Prince of Wales युद्धनौकेवरून कार्यरत असलेल्या या पाचव्या पिढीच्या फायटर जेटने, 14 जून रोजी तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केले होते.

हे विमान केरळच्या किनाऱ्यापासून सुमारे 100 नॉटिकल मैल अंतरावर कार्यरत असताना, खराब हवामान आणि संभाव्य इंधनटंचाईमुळे त्याला मुख्य ईमर्जन्सी लँडिंग करावे लागले.

भारतीय अधिकाऱ्यांनी, ज्यामध्ये भारतीय हवाई दलाचा समावेश होता, त्यांनी या आपत्कालीन लँडिंगमध्ये सर्वोतपरी मदत केली आणि तत्काळ लॉजिस्टिक व इंधन पुरवठा देखील केला.

तथापि, उड्डाणपूर्व तपासणी दरम्यान, एक गंभीर हायड्रॉलिक दोष आढळून आला, जो इतका गंभीर होता की तो विमानाच्या सुरक्षित टेकऑफ किंवा लँडिंग क्षमतेवर परिणाम करू शकत होता. रॉयल नेव्हीच्या एका छोट्या टीमने सुरुवातीला दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला, पण समस्येच्या गुंतागुंतीमुळे ते अपयशी ठरले.

यूकेच्या औपचारिक परवानगीनंतर, विमान स्थानिक MRO (Maintenance, Repair and Overhaul) सुविधेत हलवण्यात आले. हे एक दुर्मिळ उदाहरण ठरले, जिथे ब्रिटनच्या फ्रंटलाईन फायटरची देखभाल यूकेच्या नियंत्रणाबाहेरील ठिकाणी केली जात आहे.

या अगोदर, विमान CISF (सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स) च्या सतत देखरेखीखाली विमानतळाच्या Bay 4 मध्ये ठेवण्यात आले होते.

विमानाच्या दुरुस्तीसाठी सुमारे 25 ब्रिटिश अभियंते रविवारी भारतात आले असून, ते आता भारतीय अधिकाऱ्यांबरोबर समन्वय साधून दुरुस्तीच्या तांत्रिक व लॉजिस्टिक रूपरेषेवर काम करत आहेत.

काम पूर्ण होण्याची ठोस वेळ अद्याप दिली गेलेली नाही, पण या प्रकरणाशी परिचित असलेल्या अधिकाऱ्यांनी संकेत दिले आहेत की सुरक्षा तपासण्या आणि प्रणालीच्या पुष्टीकरणानंतर विमान पुन्हा सक्रिय सेवेवर परतले जाईल.

या संपूर्ण घटनाक्रमाकडे आंतरराष्ट्रीय लक्ष वेधले गेले आहे, कारण एकीकडे भारतात F‑35B स्टेल्थ फायटरचे अस्तित्व लक्षवेधी आहे, आणि दुसरीकडे, हे भारत आणि यूकेमधील संरक्षण व एअरोस्पेस क्षेत्रातील सहकार्य अधिक बळकट होत असल्याचे चिन्ह आहे.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleIndian Army Cracks Down on Chinese Components in Drones and Weapons
Next articleड्रोन आणि शस्त्रास्त्रांमधील चिनी घटकांवर, भारतीय लष्कराची कारवाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here