पाच आठवड्यांनतर अखेर British F-35B जेटचे केरळमधून उड्डाण

0

मागील पाच आठवड्यांपासून, केरळच्या त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळावर तांत्रिक बिघाडामुळे अडकलेल्या, ब्रिटिश रॉयल एअरफोर्सच्या F-35B स्टेल्थ लढाऊ विमानाने, अखेर मंगळवारी यशसस्विरीत्या उड्डाण केले.

जगातील सर्वात महागडे आणि अत्याधुनिक लढाऊ विमान म्हणून ओळखले जाणारे F-35B जेट, ऑस्ट्रेलियातील डार्विनकडे जात होते, अशी माहिती समोर आली आहे.

14 जून रोजी, इंधन कमी झाल्यामुळे पाचव्या पिढीतील या स्टेल्थ लढाऊ विमानाला, केरळ विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावे लागले होते. त्यानंतर दुरुस्तीसाठी हे विमान त्रिवेंद्रम विमानतळावरच थांबवण्यात आले.

ब्रिटनमधून आलेल्या विशेष तांत्रिक पथकाने, विमानाच्या अत्याधुनिक उपकरणांवर दोन आठवड्यांहून अधिक काळ दुरुस्तीचे काम केले. 21 जुलै रोजी हे काम पूर्ण झाल्यानंतर विमान हँगरमधून बाहेर काढण्यात आले आणि दुसऱ्या दिवशी त्याने यशस्वी उड्डाण केले.

यासंबंधी ब्रिटिश उच्चायुक्तालयाच्या प्रवक्त्याने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की: “दुरुस्ती आणि पुनर्प्राप्ती प्रक्रियेत भारतीय यंत्रणा आणि विमानतळ कर्मचाऱ्यांनी दिलेले सहकार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. भारतासोबत आमचे संरक्षण सहकार्य अधिक दृढ करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत.”

हेही वाचा: मोदींच्या UK दौऱ्याला सुरुवात; FTA सह अनेक मुद्दे प्रमुख अजेंड्यावर…

बिघाड नेमका कशामुळे झाला? याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली नसली तरी, सूत्रांच्या माहितीनुसार auxiliary power unit (APU) मध्ये गंभीर बिघाड झाल्यामुळे, विमान उड्डाणास असमर्थ होते. तांत्रिक अडचणींमुळे प्राथमिक प्रयत्न निष्फळ ठरले आणि ब्रिटनमधील तज्ज्ञांना बोलावण्यात आले.

6 जुलै रोजी, केरळात दाखल झालेल्या ब्रिटिश तांत्रिक पथकाने विमानाला हँगरमध्ये हलवून सखोल तपासणी व दुरुस्ती केली. घटनेच्या वेळी हे विमान HMS Prince of Wales या ब्रिटिश नौदल जहाजाच्या ताफ्याचा भाग होते, जो सध्या हिंद महासागरात कार्यरत आहे.

प्रचंड पार्किंग शुल्क

F-35B विमानाच्या पाच आठवड्यांच्या मुक्कामासाठी, सुमारे ₹5 लाखांचे पार्किंग शुल्क ब्रिटिश अधिकाऱ्यांना भरावे लागणार आहे. विमानाचे आकारमान, वजन, पार्किंग कालावधी आणि कर्मचाऱ्यांसाठी पुरवलेल्या सुविधा यावर आधारित हे शुल्क आकारण्यात आले आहे.

प्रति दिनी सुमारे ₹15,000 ते ₹20,000 इतके शुल्क आकारले गेले असून, हे शुल्क Bird Group (दिल्लीस्थित ग्राउंड हँडलिंग सेवा कंपनी) तर्फे ब्रिटनकडून भरण्यात येणार आहे.

AI Engineering Services Ltd. (AIESL) कडूनही, पाच आठवड्यांच्या हँगर वापराचे स्वतंत्र शुल्क आकारले जाणार आहे. ही संस्था विमानांच्या देखभाल व दुरुस्तीची सेवा पुरवते.

Lockheed Martin ने डिझाइन केलेले हे F-35B लढाऊ विमान, शॉर्ट टेक-ऑफ आणि व्हर्टिकल लँडिंगच्या अद्वितीय क्षमतेसाठी ओळखले जाते. या वैशिष्ट्यांमुळे हे विमान आधुनिक हवाई लढायांमध्ये अत्यंत महत्त्वाचे आयुध मानले जाते.

टीम स्ट्रॅटन्यूज
(IBNS च्या इनपुटसह)

+ posts
Previous articlePM मोदींच्या UK दौऱ्याला सुरुवात; FTA सह अनेक मुद्दे प्रमुख अजेंड्यावर…
Next articleग्रीस आणि बाल्कनमध्ये उष्णतेची लाट; कामकाज, पर्यटन विस्कळीत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here