चीनमधील बौद्ध धर्म: धर्मापेक्षा जीवनशैली आणि आरोग्य कल्याणावर अधिक भर

0
बौद्ध धर्म

चीनमधील सोशल मीडियावर अलीकडेच एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये चेंगदू येथील ‘वेन्शु मॉनेस्ट्री’च्या (मठाच्या) बाहेर एक बौद्ध भिक्षू येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना रोख पैसे वाटताना दिसत आहेत (खालील स्क्रीनशॉटनुसार). हे भिक्षू जिथे बसले होते, तिथे ना कोणते दानपात्र नव्हते, ना कुठल्याही प्रकारचे मदतीचे आवाहन केले जात होते, आणि ना कोणता उपदेश दिला जात होता. काही इंटरनेट युजर्सनी थट्टेने त्यांना “रिव्हर्स बेगर” (दान देणारा भिकारी) म्हटले, परंतु ते भिक्षू केवळ “दान” धर्माचे पालन करत होते, ज्यानुसार कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता दान केले जाते; बौद्ध धर्म नेमकी हीच शिकवण देतो.

हा व्हिडिओ म्हणजे, चीनच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरील एका व्यापक ट्रेंडचे प्रतिबिंब आहे, ज्यामध्ये #中国佛教 (चीनी बौद्ध धर्म), #禅修 (झेन ध्यान), #寺庙生活 (मठातील जीवन) हे हॅशटॅग वारंवार वापरलेले दिसतात. हे सूचित करते की, चिनी लोकांमध्ये बौद्ध धर्माची एक वेगळी प्रतिमा तयार होत आहे; जी धर्मापेक्षा अधिक जीवनशैली, आरोग्य-कल्याण (वेलनेस) आणि भावनिक आश्रयस्थान म्हणून उदयाला येत आहे.

चीनमध्ये विशेषतः तरुणांमध्ये बौद्ध धर्म लोकप्रिय होत असून, वेइबो (Weibo) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, वैयक्तिक प्रार्थना विधी आणि मंदिरातील “चेक-इन” पासून ते आंतरिक शांती, कल्याण आणि दैनंदिन अध्यात्मावर आधारित हजारो पोस्ट्स पाहायला मिळाल्या.

गेल्या आठवड्यात, बीजिंगमधील रहिवासी युन्नानमधील ‘जिंगहोंग जनरल बुद्धिस्ट टेम्पल’ येथे गेल्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. हे चीनमधील सर्वोच्च दर्जाचे ‘थेरवाद’ बौद्ध विहार असून, त्याची पवित्र वास्तुकला आणि शांत वातावरण लोकांचे लक्ष वेधून घेते.

चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील स्क्रीनशॉटमध्ये, युजर्सनी बौद्ध मंदिरे आणि मठांमधील चेक-इन आणि व्हिडिओ शेअर करताना दिसत आहेत.
चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील स्क्रीनशॉटमध्ये, युजर्स बौद्ध मंदिरे आणि मठांमधील चेक-इन आणि व्हिडिओ शेअर करताना दिसत आहेत.

श्रद्धा आणि बाजारपेठेचा संगम

चीनमधील समकालीन ट्रेंडवर लक्ष केंद्रित करणाऱ्या ‘सिक्स्थ टोन’ (Sixth Tone) च्या ऑनलाइन रिपोर्टनुसार, संपूर्ण चीनमधील मंदिरे ही हळूहळू ‘शांततापूर्ण ‘जीवनशैली उपभोगाची’ केंद्रे बनत चालली आहे.

कॅफे, शाकाहारी रेस्टॉरंट्स, ब्रँडेड स्मृतिचिन्हे, वेलनेस सेवा आणि अगदी व्हेंचर कॅपिटलशी जोडलेले काही प्रकल्पही, आता एका वाढत्या “मंदिर अर्थव्यवस्थेचा” भाग बनले आहेत. पवित्र स्थळे मोठ्या प्रमाणात ग्राहक संस्कृतीशी जोडली जात आहेत, ज्यामुळे या ठिकाणांवर भेट देणाऱ्यांचा अनुभव आणि धार्मिक संस्थांची सामाजिक भूमिका दोन्ही बदलत आहेत.

जीवनशैलीतील आर्थिक ताण आणि सामाजिक अनिश्चितता जसजशी वाढत आहे, तसतसे अनेक तरुण चिनी नागरिक आपले भाग्य, शांतता आणि जीवनाचा अर्थ शोधण्यासाठी धार्मिक विधी आणि आध्यात्मिक प्रतीकांकडे वळत आहेत. बौद्ध मंदिरे आणि ताओवादी देवळांमध्ये लोकांची वर्दळ वाढली आहे, परंतु नेहमीप्रमाणेच येथे राजकीय मर्यादा आहेत.

इन्फ्लुएन्सर्स (influencers) वर कारवाई

2021 मध्ये, चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने तथाकथित “फोयुआन” किंवा “बौद्ध जीवनशैली”चा प्रसार करणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सवर कारवाई केली. हे सोशल मीडिया वापरकर्ते अनेकदा प्रार्थना, ध्यान-धारणा आणि मंदिर भेटींचे आकर्षक फोटो शेअर करत असत, ज्यासोबत कधीकधी छुपी व्यावसायिक जाहिरात किंवा उत्पादनांची शिफारसही केली जायची.

‘सिक्स्थ टोन’च्या मते, बौद्ध धर्माचे ‘पॅकेजिंग’ करून, त्याला एक कमाई करणारा वैयक्तिक ब्रँड बनवणे, अधिकाऱ्यांना मान्य नव्हते. सरकारी माध्यमांनी या ट्रेंडवर टीका करत, त्याला “धर्माच्या नावाखाली चालवलेली नफेखोरी” म्हटले, ज्यानंतर ‘डोयिन’ आणि ‘शिओहोंगशु’ सारख्या प्लॅटफॉर्म्सनी असा प्रसार करणारी डझनभर अकाउंट्स आणि संबंधित पोस्ट्स काढून टाकल्या. ही कारवाई व्यावसायिक धार्मिक प्रचारावरील विद्यमान बंदीची अंमलबजावणी म्हणून मांडली गेली.

या कारवाईमागे बौद्ध धर्माबद्दलचा द्वेष नव्हता, तर त्याऐवजी अनियंत्रित ऑनलाइन धार्मिक अभिव्यक्तीविरुद्धचा हा एक व्यापक नियामक प्रयत्न होता. श्रद्धेला परवानगी होती, परंतु या श्रद्धेचे राज्याच्या देखरेखीशिवाय इन्फ्लुएन्सर्सच्या प्रभावाखाली स्वतंत्रपणे व्यवसायात रूपांतर करण्याला विरोध होता.

तिबेटी बौद्ध धर्मातील सर्वात प्रभावशाली संस्थांपैकी एक असलेल्या, ‘लाब्रंग मॉनेस्ट्री’ मठाला भेट देणाऱ्या वरिष्ठ चिनी अधिकाऱ्यांनी तीव्र “सिनिसिझेशन” (चिनीकरण) करण्याचे आवाहन केले. मठाधिपतींना त्यांचा धार्मिक आचार हा राजकीय निष्ठा, चिनी राष्ट्रीय ओळख आणि समाजवादी मूल्यांशी सुसंगत ठेवण्याचे आणि मठाच्या जीवनशैलीत पक्षाच्या विचारधारेचा समावेश करण्याचे आवाहन करण्यात आले.

तिबेटी विद्वान आणि फाउंडेशन फॉर नॉन-व्हायोलेंट अल्टरनेटिव्हजचे संशोधन सहकारी- रिन्झिन नामग्याल यांचा असा तर्क आहे की, या दृष्टिकोनाचे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यांनी ‘स्ट्रॅटन्यूजग्लोबल’शी बोलताना सांगितले की, जेव्हा बौद्ध धर्म त्याचा नैतिक आणि आध्यात्मिक अधिकार गमावतो, तेव्हा तो केवळ एक “सौंदर्याचा सांगाडा” बनून राहण्याची शक्यता निर्माण होते.

मूळ लेखिका – रेशम

+ posts
Previous articleभारत- नेदरलँड्स: संरक्षण औद्योगिक रोडमॅपवर सहमती
Next articleWhat Makes Pakistan Tick? Resilience Amidst Chronic Fault Lines – And What Should India Do

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here