भारतीय सैन्यामध्ये 100 अतिरिक्त ‘K-9 Vajras’ नामक स्वयंचलित तोफखान्यांचा समावेश करण्यात येणार असून, भारतीय लष्कराची क्षमता यामुळे कित्येक पटीने वाढणार आहे.
भारतातील ‘लार्सन अँड टुब्रो’ (Larsen & Toubro- L&T) या कंपनीद्वारे हाजीरा नामक सुविधेवर आधारित या तोफखान्यांची निर्मिती केली जाणार आहे. या तोफा विशेषत: सर्वाधिक उंचीच्या तसेच सर्वात कमी व सर्वोच्च तापमान असलेल्या प्रदेशात, लष्कराच्या ऑपरेशनल गरजा पूर्ण करण्यासाठी अपग्रेड केल्या गेल्या आहेत. ‘कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी’ (Cabinet committee on security- CCS) ने गुरुवारी या खरेदी व्यवहाराला मंजुरी दिली असून, कराराच्या अंतिम स्वरूपाचा मार्ग मोकळा झाला.
L&T कंपनीने “मेक इन इंडिया” (Make In India) उपक्रमाला अधोरेखित करत या तोफांच्या निर्मितीमध्ये हॉविट्झर्समधील स्वदेशी सामग्रीचे प्रमाण देखील वाढवले आहे. ‘K9 वज्र तोफा’ याआधी वाळवंटी क्षेत्रात तसेच लेह-लडाख सेक्टरमध्ये चिनी आघाडीसोबतच प्रभावीपणे तैनात केल्या गेल्या आहेत. ज्यामुळे भारतीय लष्कराची (Indian Army) ऑपरेशनल तयारी आणखी मजबूत झाली आहे.
K-9 वज्र तोफखाना, अत्यंत उष्ण आणि अतिशय थंड अशा दोन्ही परिस्थितीत प्रभावी असल्याचं सिद्ध झालं आहे. दक्षिण कोरियाच्या हानव्हा संरक्षणातून हस्तांतरित केलेल्या तंत्रज्ञानावर या तोफांची निर्मीती केले गेली आहे. दरम्यान, लार्सन अँड टुब्रो (L&T) ने संरक्षण क्षेत्रातील सरकारच्या आत्मनिर्भरता (आत्मनिर्भरता) उपक्रमात योगदान देऊन K-9 तोफांच्या उत्पादनाची संख्या वाढवण्याच्या कराराला मान्यता देत, भारतीय लष्कराच्या बळकटीकरणात खूप मोठा हातभार लावला आहे.
2017 मध्ये L&T कंपनीला याविषयीचा प्राथमिक करार प्रस्तावित करण्यात आला होता. त्यांनतर 2021 मध्ये एकूण शंभर ‘K-9 वज्र तोफांची’ पहिली तुकडी भारतीय लष्कराकडे यशस्वीरित्या वितरित केली गेली. भारताच्या संरक्षण क्षमतांना बळ देण्यासाठी आणि भारतीय लष्कराची ताकद वाढवण्यासाठी ‘K-9 वज्र तोफांची’ कायमच खूप मोठी भूमिका राहिली आहे.
टीम भारतशक्ती
अनुवाद- वेद बर्वे