एलॉन मस्क यांच्या स्टारलिंकशी 100 दशलक्ष कॅनेडियन डॉलर्सचा (68.12 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) करार रद्द करत असल्याचे कॅनडाच्या ऑन्टारियो प्रांताने सोमवारी जाहीर केले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या जकातदरांच्या विरोधात कॅनडाने अशाप्रकारे सूडबुद्धीचे पाऊल उचलले आहे.
10 जिल्ह्यांपैकी सर्वाधिक लोकसंख्या असलेले तसेण कॅनडाचे औद्योगिक केंद्र असलेल्या ऑन्टारियोने असेही म्हटले आहे की ते अमेरिकी कंपन्यांच्या प्रांतीय करारांवर बंदी घालत आहेत.
“आम्ही उगाच गोड बोलणार नाही-येणारे दिवस आणि आठवडे अतिशय खडतर असतील. ट्रम्प यांचे जकातदर आपल्या अर्थव्यवस्थेला उद्ध्वस्त करणार आहे,” असे सांगताना ऑन्टारियोचे प्रमुख डग फोर्ड आपल्याला अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर द्यावे लागले याबाबत ठाम आहेत.
ट्रम्प यांनी घोषित केल्याप्रमाणे मंगळवारपासून तेल वगळता कॅनडाच्या अक्षरशः सर्वच आयातीवर 25 टक्के कर लादला जाणार आहे, ज्यावर 10 टक्के अधिभारदेखील आहे. जर हा प्रकार दीर्घकाळ चालला तर यामुळे कॅनडाची अर्थव्यवस्था मंदीच्या गर्तेत जाईल.
या निर्णयामुळे संपूर्ण कॅनडाला मोठा धक्का बसला आहे, ज्याला आपण अमेरिकेचा जवळचा मित्र आणि पारंपरिक व्यापारी भागीदार असल्याचा अभिमान होता.
फोर्ड यांनी या निर्णयाचा बदला घेण्याबद्दल सांगितले की अमेरिकन आधारित व्यवसायांना नवीन महसुलात कोट्यवधी डॉलर्सचा तोटा सहन करावा लागेल आणि त्यासाठी केवळ ट्रम्पच दोषी असतील.
“आम्ही स्टारलिंकसोबतचा करार रद्द करणार आहोत. आपली अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्यास तयार असलेल्या लोकांसोबत ऑन्टारियो व्यवहार करणार नाही,” असे त्यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले.
ऑन्टारियोने गेल्या नोव्हेंबरमध्ये स्वाक्षरी केलेल्या कराराच्या अटींनुसार, स्टारलिंक अधिक दुर्गम भागांमधील 15 हजार पात्र घरे आणि व्यवसायांना उच्च-गती इंटरनेट प्रदान करणार होती. ट्रम्प यांचे जवळचे सहकारी असलेले मस्क हे फेडरल सरकार संकुचित करण्याच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या मोहिमेचे नेतृत्व करत आहेत.
प्रतिक्रियेसाठी स्टारलिंककडून कोणीही त्वरित उपलब्ध झाले नाही. फोर्ड यांनी 27 फेब्रुवारीला मुदतपूर्व निवडणुका घेण्याचे आवाहन केले आहे, ज्याच्या जनमत चाचण्यांवरून असे सूचित होते की त्यांचा पुरोगामी पुराणमतवादी पक्ष सहजपणे जिंकेल.
फोर्ड यांनी आधीच प्रांताच्या मद्य मंडळाला-जे वर्षाला 1 अब्ज कॅनेडियन डॉलर्सपेक्षा जास्त अमेरिकन मद्याची विक्री करते-मंगळवारपासून त्यांच्या शेल्फमधून सर्व अमेरिकन उत्पादने काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.
पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी शनिवारी जाहीर केले की अमेरिकेच्या या निर्णयाला प्रतिसाद म्हणून कॅनडा 155 अब्ज कॅनेडियन डॉलर्स किमतीच्या अमेरिकन वस्तूंवर 25 टक्के शुल्क लादेल.
बेकायदेशीर स्थलांतरित आणि फेंटॅनिल तस्करीविरुद्ध लढा देण्यासाठी कॅनडा अधिक प्रयत्न करत नाही तोपर्यंत लादलेले दर कायम राहतील – जे मेक्सिकोवरही लादण्यात आले आहेत – असे ट्रम्प यांनी जाहीर केले आहे.
ट्रम्प यांनी सोमवारी सांगितले की त्यांनी मेक्सिकोशी एक करार केला आहे, ज्याद्वारे सीमेवर अधिक कारवाई करण्याच्या बदल्यात दर एका महिन्यासाठी जकात दर रद्द केले जातील.
मेक्सिकोला देण्यात आलेल्या अमेरिकेच्या जकातशुल्कातून त्याच प्रकारची एक महिन्याची सवलत आपल्याला मिळू शकेल याबद्दल कॅनडा फारसा आशावादी नसल्याचे न्यूयॉर्क टाइम्सने एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे.
ट्रम्प यांनी सांगितले की ते सोमवारी ट्रुडो यांच्याशी बोलले आहेत आणि आधी ठरल्याप्रमाणे दुपारी 3 वाजता (2000 जीएमटी) पुन्हा त्यांच्याशी बोलणार आहेत. नंतर ट्रुडो अमेरिका-कॅनडा संबंधांवरील विशेष सल्लागार परिषदेशी बोलणार आहेत.
अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको हे तिन्ही देश महाद्वीपीय मुक्त व्यापार कराराचा भाग असल्याने हे जकातदर अभूतपूर्व आहेत. त्यामुळे याचा निषेध म्हणून, कॅनेडियन लोकांनी दक्षिणेकडील सहली रद्द केल्या असून अमेरिकन दारू आणि इतर उत्पादनांवर बहिष्कार टाकला आणि क्रीडा स्पर्धांबाबतही नाराजी व्यक्त केली आहे.
सूर्या गंगाधरन
(रॉयटर्स)