कॅनडाचे वरिष्ठ नेते जगमीत सिंग यांनी आरोप केला आहे की, भारतानेच हरदीप सिंग निज्जरची हत्या केली आहे. जगमीत सिंग यांनी यापूर्वीही भारतावर अशाच प्रकारचे आरोप केले होते. एकीकडे जगमीत सिंग यात भारताचा सहभाग असल्याचे सांगत आहेत, तर दुसरीकडे कॅनडाचे पोलीस निज्जरच्या हत्येमागे भारताचा सहभाग असल्याचा एकही पुरावा सादर करू शकलेले नाहीत.
सोशल मिडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये जगमीत सिंगनी लिहिले आहे, “भारत सरकारने मारेकऱ्यांच्या मदतीने कॅनडाच्या भूमीत एका कॅनेडियन नागरिकाची हत्या केली, तीही एका प्रार्थनास्थळासमोर. आज या प्रकरणात तीनजणांना अटक करण्यात आली आहे. मी हे स्पष्ट करू इच्छितो की, भारत सरकारचा कोणताही प्रतिनिधी किंवा व्यक्ती या प्रकरणात सहभागी असल्याचे आढळले तर, त्याच्यावर कॅनडाच्या कायद्यानुसार काटेकोर कारवाई व्हायला पाहिजे. कॅनडातील लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी, हरदीप सिंग निज्जर याला न्याय मिळणे आवश्यक आहे.”
जगमीत सिंग हे कॅनडाच्या न्यू डेमोक्रॅटिक पार्टी (एनडीपी) या राजकीय पक्षाचे नेते आहेत. जगमीत सिंग यांच्या एनडीपी पक्षाची पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांच्या पक्षाशी युती आहे. गेल्या वर्षी कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनीही निज्जरच्या हत्येत भारताचा सहभाग असल्याचा आरोप केला होता. भारताने कॅनडाच्या पंतप्रधानांचे आरोप ‘बिनबुडाचे’ असल्याचे सांगत ते फेटाळून लावले होते. मात्र त्यामुळे भारत आणि कॅनडा यांच्यामधील संबंधही ताणले गेले. आज कॅनडाच्या पोलिसांनी निज्जरच्या हत्येप्रकरणी तीन जणांना अटक केल्यानंतर, हे प्रकरण पुन्हा तापले आहे.
मात्र, निज्जरच्या हत्येत भारताचा सहभाग असल्याचे सूचित करणारा कोणताही पुरावा कॅनडाच्या पोलिसांनी अद्याप सादर केलेला नाही. कॅनडा पोलिसांनी शुक्रवारी अटक केलेल्या तिघांची छायाचित्रे जारी केली. करणप्रीत सिंग, कमलप्रीत सिंग आणि करण ब्रार हे तीन आरोपी भारतीय नागरिक असल्याचे सांगितले जाते. एडमंटन शहरातील अल्बर्टा भागात या तिघांना अटक करण्यात आली. पोलिसांनी हत्येसाठी कथितपणे वापरल्या गेलेल्या कारचा फोटोही जारी केला आहे.
शीख समुदाय मोठ्या संख्येने असलेल्या व्हँकुव्हर उपनगरातील सरे येथील एका गुरुद्वाराबाहेर 45 वर्षीय निज्जरची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
आराधना जोशी