‘विनाशकारी’ श्रेणी 5 मधील, Melissa चक्रीवादळ जमैकाच्या दिशेने सरकले

0

जमैकाकडे सरकत असलेल्या ‘मेलिसा’ (Melissa) नावाच्या, श्रेणी 5 मधील वादळ सोमवारपर्यंत जमैकाकडे सरकताना दिसले. यामधील वाऱ्याचा वेग ताशी 175 mph (282 किलोमीटर/प्रतितास) पर्यंत पोहोचला असून, हे बेटावर नोंदवले गेलेले आतापर्यंतचे सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ बनण्याची शक्यता आहे. 

यू.एस. नॅशनल हरिकेन सेंटर (NHC) नुसार, दुपारी 2 वाजेपर्यंत मेलिसा हे एक ‘विनाशकारी’ वादळ बनले होते, जे सॅफिर-सिम्पसन स्केलनुसार सर्वात शक्तीशाली श्रेणीतील चक्रीवादळ आहे.

NHC ला अपेक्षा आहे की, मेलिसा सोमवारी मध्यरात्री किंवा मंगळवारी पहाटे जमैकाला ओलांडून पुढे जाईल, त्यानंतरच्या रात्री ते पूर्व क्यूबा पार करेल आणि बुधवारी बहामास, तुर्क्स आणि कैकोस बेटांवरून पुढे सरकेल.

NHC च्या हवामानशास्त्रज्ञांनी सांगितले की, NHC चे चक्रीवादळाची संथ गती आणि कॅरिबियन समुद्राच्या असामान्यत: उष्ण पाण्यामुळे त्याचा आकार आणि ताकद वाढली आहे, ज्यामुळे जमैकाला कधीही न पाहिलेल्या विनाशकारी वाऱ्यांचा आणि सुमारे 3 फूटापर्यंतच्या पावसाचा निर्माण झाला आहे.

मेलिसाच्या वाऱ्याचा आवाका सध्या जमैकाच्या लांबीपेक्षा मोठा आहे. जमैका हे कनेक्टिकट राज्याएवढे बेट आहे आणि येथील मुख्य विमानतळे समुद्रसपाटीपासून अगदी जवळ आहेत.

ऐतिहासिक पोर्ट रॉयल शहरासह, दक्षिण जमैकाच्या काही भागांसाठी सक्तीच्या स्थलांतराचे आदेश देण्यात आले, ज्यानंतर काही तासांनी, पंतप्रधान अँड्र्यू होल्नेस यांनी अन्य देशांकडे मदतीची मागणी केली तसेच शेतजमिनी, घरे, पूल, रस्ते, बंदरे आणि विमानतळ यांसारख्या पायाभूत सुविधांच्या नुकसानीचा इशारा दिला.

काही रहिवाशांनी रॉयटर्सला सांगितले की, ‘सावधानतेचे इशारे देऊनही चोरीच्या भीतीने त्यांनी आपली घरे न सोडण्याचा निर्णय घेतला.’ तर, अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘सक्तीच्या स्थलांतरणाच्या आदेशांमुळे प्रभावित झालेल्या सुमारे 28,000 नागरिक बचाव वाहने त्यांच्यापर्यंत पोहचण्याची वाट पाहत होते.’

“श्रेणी 5 मधील वादळाचा सामना करू शकेल अशी कोणतीही पायाभूत सुविधा या प्रदेशात नाही,” असेही ते म्हणाले.

होल्नेस यांनी सांगितले की, “त्यांचे सरकार या आपत्तीचा सामना करण्यासाठी, 33 दशलक्ष डॉलर्सचे आपत्कालीन प्रतिसाद बजेटसह आणि गेल्या वर्षीच्या विनाशकारी ‘बेरिल’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या तुलनेत, थोड्या अधिक विमा आणि क्रेडिट तरतुदींसह तयार आहे.”

‘बेरिल’ हे श्रेणी 5 पर्यंत पोहोचणारे अटलांटिक महासागरातील सर्वात लवकर आलेले आणि सर्वात वेगवान चक्रीवादळ होते. हवामान शास्त्रज्ञांनी इशारा दिला आहे की, हवामान बदल, समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढणे आणि हंगामी वादळांसाठी पोषक वातावरण निर्माण होणे, या कारणांमुळे वादळे अधिक मजबूत आणि वेगवान होत आहेत.

अ‍ॅक्युवेदरचे (AccuWeather) मुख्य हवामानशास्त्रज्ञ जोनाथन पोर्टर म्हणाले की, “सुमारे दहा हजार कुटुंबांना 100 mph वरील वेगाने येणारे अति तीव्र वाऱ्याचे झोत आणि कित्येक दिवसांच्या सततच्या मुसळधार पावसाचा सामना करावा लागत आहे.” ‘पायाभूत सुविधांचे नुकसान मदत पोहचण्याच्या कार्यात अडथळा आणू शकते’, असेही त्यांनी सांगितले.

“संथ गतीने पुढे सरकणारी मोठी चक्रीवादळे अनेकदा इतिहासातील सर्वात प्राणघातक आणि विध्वंसक वादळे म्हणून नोंदवली जातात. ही एक अत्यंत गंभीर परिस्थिती आहे जी अधिक जवळ येत आहे,” असेही ते म्हणाले.

‘जमैकाने यापूर्वी, 1988 मध्ये आलेल्या  श्रेणी 4 मधील ‘गिल्बर्ट’ (Gilbert) वादळासह, अनेक मोठी चक्रीवादळे पाहिली आहेत, परंतु श्रेणी 5 मधील वादळाचा थेट तडाखा भयंकर असेल,’ असे जमैकाच्या हवामान सेवेचे इव्हान थॉम्पसन यांनी सांगितले.

‘गिल्बर्ट, या जमैकावर थेट आदळलेल्या शेवटच्या मोठ्या वादळाच्या तुलनेत, मेलिसा चक्रीवादळ खूपच संथ गतीने पुढे सरकत आहे,’ असे पोर्टर यांनी सांगितले. ‘नागरिकांनी पुढील काही दिवस घरात थांबण्याची तयारी ठेवावी, आणि काही समुदायांचा संपर्क आठवड्याभरासाठी तुटू शकतो,’ असा इशाराही त्यांनी दिला.

‘आम्ही हलू शकत नाही’

जमैकाच्या उंच ब्लू माउंटनमध्ये वसलेल्या, येथील शिक्षक डेमियन अँडरसन (47) म्हणाले की, “दुर्गम रस्त्यांमुळे आधीच त्यांचा समुदाय इतर ठिकाणांपासून वेगळा पडला आहे. आम्ही हलू शकत नाही. आम्ही घाबरलो आहोत. यापूर्वी आम्ही अशी अनेक दिवसांची नैसर्गिक आपत्ती कधीच पाहिली नव्हती.”

या बेटांवरील अधिकाऱ्यांनी सांगितले की, ठजवळच्या हैती आणि डोमिनिकन रिपब्लिकने आधीच अनेक दिवसांच्या मुसळधार पावसाचा सामना केला आहे, ज्यात किमान 4 लोकांचा मृत्यू झाला आहे.”

गेल्या अनेक वर्षांपासून, स्थानिक टोळ्यांमध्ये वाढलेल्या हिंसाचारामुळे हैतीची परिस्थिती बिकट झाली आहे. देशाच्या दक्षिणेकडील भागातील 3,650 हून अधिक रहिवाशांना तात्पुरत्या निवारागृहांमध्ये हलवण्यात आले आहे. तसेच, त्यांनी दक्षिण द्वीपकल्पाकडे जाणारी आणि येणारी उड्डाणे थांबवली असून नौकानयन करण्यावर बंदी घातली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

बहामासचे पंतप्रधान फिलिप डेव्हिस, यांनी देखील द्वीपसमूहाच्या दक्षिण आणि पूर्व भागातील नागरिकांच्या स्थलांतराचे आदेश दिले, तर पूर्व क्यूबाचा मोठा भाग, मेलिसाच्या अपेक्षित तडाख्यापूर्वी बचावासाठी तयारी करत आहे.

क्यूबाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “त्यांनी जोरदार वारे आणि पुरामुळे प्रभावीत होऊ शकतील अशा, किनारी आणि डोंगराळ भागात राहणाऱ्या 500,000 हून अधिक लोकांना स्थलांतरित केले आहे आणि पूर्व क्यूबातील शाळा आणि वाहतूक पूर्णत: बंद केली आहे.”

बेटावरील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर- सँटियागो डी क्यूबा, येथील 250,000 हून अधिक लोकांना सुरक्षित निवाऱ्यात हलवण्यात आले आहे, जे चक्रीवादळाच्या अंदाजित मार्गामध्ये थेट येण्याचा धोका संभावतो.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleअफगाणिस्तान-पाकिस्तानमधील इस्तंबूलमध्ये सुरू असणारी चर्चा निष्फळ
Next articleIFC-IOR Central to India’s Indo-Pacific Strategy; Navy to Expand Liaison Network by 2028

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here