भारत आणि ऑस्ट्रेलिया मधील संरक्षण संबंध दृढ करण्याच्या उद्देशाने, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल- अनिल चौहान, 4 ते 7 मार्च दरम्यान ऑस्ट्रेलियाचा अधिकृत दौरा करणार आहेत. त्यांचा हा दौरा इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील मुद्द्यांवर विशेष लक्ष केंद्रित करेल, तसेच सर्वसमावेशक आणि धोरणात्मक भागीदारी अंतर्गत भारत आणि ऑस्ट्रेलियातील लष्करी सहकार्य वाढविण्याच्या वचनबद्धतेला अधोरिखित करेल.
भेटीदरम्यान जनरल चौहान, ऑस्ट्रेलियन संरक्षण विभाग आणि ऑस्ट्रेलियन डिफेन्स फोर्स (ADF) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी उच्चस्तरीय चर्चा करतील. ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण दलाचे प्रमुख- जनरल ॲडमिरल डेव्हिड जॉन्स्टन, संरक्षण सचिव- ग्रेग मोरियार्टी आणि तिन्ही दलांच्या प्रमुखांचीही ते यावेळी भेट घेतील.
त्यांच्या एंगेजमेंट्सचा एक भाग म्हणून, CDS फोर्स कमांड हेडक्वार्टर्सला भेट देतील, जिथे ऑस्ट्रेलियाच्या ऑपरेशनल कमांड संरचनेबद्दल अधिक जाणून घेतील आणि संयुक्त ऑपरेशन्ससाठी संभाव्य मार्गांचे अन्वेषण करतील. ते ऑस्ट्रेलियन फ्लिट कमांडर आणि जॉइंट ऑपरेशन्स कमांडरशी देखील संवाद साधतील, ज्यामध्ये ते समुद्री सुरक्षा आणि प्रादेशिक स्थैर्य यावर अधिक सखोल चर्चा करतील.
व्यावसायिक लष्करी शिक्षण देण्याबाबात भारताच्या वचनबद्धतेच्या अनुषंगाने, जनरल चौहान इंडो-पॅसिफिकमधील धोरणात्मक आव्हानांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांना, ऑस्ट्रेलियन संरक्षण महाविद्यालयामध्ये संबोधित करतील. याव्यतिरिक्त, ते प्रादेशिक सुरक्षा गतिशीलतेवरील दृष्टीकोनांची देवाणघेवाण करण्यासाठी, ऑस्ट्रेलियातील आघाडीच्या थिंक टँक, लोवी इन्स्टिट्यूटमध्ये गोलमेज चर्चेचे अध्यक्षस्थान भूषवतील.
“जनरल चौहान यांचा हा दौरा, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील संरक्षण सहकार्य मजबूत करण्यावर प्रकाश टाकतो आणि प्रादेशिक सुरक्षा तसेच धोरणात्मक सहकार्यासाठी दोन्ही देशांच्या सामायिक वचनबद्धतेला बळकटी देतो,” असे संरक्षण मंत्रालयाचे म्हणणे आहे.
टीम भारतशक्ती